नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक आणण्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकार सज्ज झाले आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांसह राज्याचे मंत्री २० देशांचे दौरे करणार असून त्याद्वारे ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटमध्ये १० लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक साध्य करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे.
उत्तर प्रदेशात पुढील वर्षी १० ते १२ फेब्रुवारीदरम्यान ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिटचे आयोजन करण्यात आले आहे. या जागतिक परिषदेमध्ये जगभरातील गुंतवणूकदारांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध मंत्री २० देशांच्या दौऱ्यावर रवाना होणार आहेत. परदेशात उत्तर प्रदेशच्या ब्रँडिंगबाबत विविध आंतरराष्ट्रीय शहरांतील गुंतवणूकदारांसोबत बैठका होणार आहेत. मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्रीही परदेशात जाऊन कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेऊन राज्यातील गुंतवणुकीविषयीच्या संधींविषयी माहिती देणार आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे येत्या २८ नोव्हेंबर रोजी परदेश दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ते लंडन, न्युयॉर्क, शिकागो आणि सॅन फ्रान्सिस्को येथे जाणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा हा पहिलाच अमेरिका व ब्रिटनचा दौरा आहे. मुख्यमंत्र्यांसोबत उत्तर प्रदेश प्रशासनातील उच्च अधिकारी, व्यापार व उद्योग विभागाचे अधिकारी, राज्यातील उद्योजकांचा समावेश असणार आहे. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत नेदरलँड आणि फ्रान्सची राजधानी पॅरिस येथील आयंड हेवनला भेट देणार आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक हे ८ डिसेंबर ते १४ डिसेंबर या कालावधीत गुंतवणुकदारांना भेटण्यासाठी मेक्सिको सिटी, रिया दी जानेरो (ब्राझील) आणि मॅनेस आयर्स (अर्जेंटिना) येथे जाणार आहेत.