नवी दिल्ली ( T20 World Cup Final 2022 ) : इंग्लंडने १९९२ च्या विश्वचषकात पाकिस्तानकडून झालेल्या पराभवाचा चांगलाच वचपा काढला आहे. १९९२च्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर इंग्लंडचा पराभव केला. आता ३० वर्षांनंतर इंग्लंडने मेलबर्नमध्येच पाकिस्तानचा पराभव करून हिशेब चुकता केला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने २० षटकांत ८ गडी गमावून १३७ धावा केल्या. पाकिस्तानची फलंदाजी फ्लॉप ठरली. सहा फलंदाजांना दुहेरी आकडाही स्पर्श करता आला नाही.
शान मसूदने सर्वाधिक ३८ धावा केल्या. त्याचवेळी कर्णधार बाबरने ३२ धावांची खेळी खेळली. इंग्लंडकडून ( T20 World Cup Final 2022 )सॅम कुरनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. प्रत्युत्तरात इंग्लंडने १९ षटकांत पाच गडी गमावून लक्ष्य गाठले. बेन स्टोक्स ४९ चेंडूत ५२ धावा करुन नाबाद राहिला. आंतरराष्ट्रीय टी-२० मधील हे त्याचे पहिले अर्धशतक होते.
इंग्लंडने दुसऱ्यांदा टी - २० विश्वचषक ( T20 World Cup Final 2022 ) जिंकलेला आहे. याआधी हा संघ २०१० मध्येही टी-२० विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनला होता. तेव्हा इंग्लिश संघाचा कर्णधार पॉल कॉलिंगवूड होता. इंग्लंडचे हे एकूण तिसरे विश्वचषक विजेतेपद आहे. २०१९ मध्ये, इंग्लंड संघ एकदिवसीय चॅम्पियन देखील बनला. त्याचवेळी पाकिस्तानची ही तिसरी फायनल ठरली. २००७ मध्ये झालेल्या पहिल्या टी-२०विश्वचषकात पाकिस्तानला भारताविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. पुढे २००९ मध्ये, संघ टी-२० चॅम्पियन बनला. आता २०२२ मध्ये पाकिस्तान संघाला फायनलमध्ये पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले.