नवी दिल्ली:हैदराबादमधील ‘आयसीएफआय फाऊंडेशन फॉर हायर एज्युकेशन’ (आयएफएचई) येथे कायद्याचे शिक्षण घेणार्या हिमांक बन्सल या हिंदू विद्यार्थ्यांस 15 ते 20 जणांच्या टोळक्याने ‘अल्ला हू अकबर’ अशा घोषणा देण्यास भाग पाडून ‘मॉब लिचिंग’ करण्याचा प्रयत्न केला. हिमांक याने कथितरित्या ईशनिंदा केल्याचे धर्मांध टोळक्याचे म्हणणे होते.
समाजमाध्यमांवर ‘आयएफएचई’मधील विद्यार्थी हिमांक बन्सल यास मारहाण करण्याची चित्रफीत ‘व्हायरल’ झाली आहे. त्यामध्ये हिमांक बन्सल यास जबर मारहाण करणारे आणि त्यास ‘अल्ला-हू-अकबर’ अशी घोषणा देण्यास भाग पाडणारे टोळके दिसत आहे. सोबतच हिमांक याने या घटनेविषयी शिक्षण संस्थेच्या प्रशासनास लिहिलेले पत्रदेखील सार्वजनिक झाले आहे.
पत्रात म्हटले की, “1 नोव्हेंबर रोजी दुपारी 3.30च्या सुमारास 15 ते 20 जण माझ्या वसतिगृहाच्या खोलीत घुसले. त्यांनी माझा अपमान केला आणि माझ्याशी भांडण सुरू केले. माझ्या गुप्तांगास लाथ मारली. त्यांनी संपूर्ण घटना ‘रेकॉर्ड’केली आणि मला माझे कपडे काढण्यास सांगितले. तसे न केल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे हिमांक याने म्हटले आहे.माझ्याकडून कथितरित्या झालेल्या मोहम्मद पैगंबर यांच्या अपमानाविषयी मारहाण केल्याचे हिमांक याने म्हटले आहे.
त्याचप्रमाणे याविषयी कोठे वाच्यता केल्यास मला जीवे मारण्याची, माझे प्रेत गायब करण्याची आणि कुटुंबास शोधून ठार मारण्याचीदेखील धमकी दिल्याचे पत्रात म्हटले आहे. या सर्व प्रकारास आपल्याच वर्गातील एक विद्यार्थिनी जबाबदार असल्याचेही हिमांक याने पत्रात म्हटले आहे. सदर विद्यार्थिनीने आपल्या बोलण्याचे ‘स्क्रिनशॉट’ ‘व्हायरल’ केले. यामुळे आपल्या खासगी जीवनाचा भंग झाला असून त्यामुळेच त्या टोळक्याने मारहाण केल्याचे हिमांक याने म्हटले आहे.
...हा तर दहशतवादच: कपिल मिश्रा
भाजप नेते कपिल मिश्रा यांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, “हा स्पष्टपणे द्वेष आणि हिंदूफोबिया आहे.” महाविद्यालयाच्या आवारामध्ये एका तरुण विद्यार्थ्यास ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास भाग पाडून त्याचे ‘मॉब लिंचिंग’ करण्याचा प्रयत्न करणे हे हिंदूद्वेषातून घडल्याचे मिश्रा यांनी म्हटले आहे.