नरेंद्र चपळगावकर... त्या नावाआधी तुम्ही वकील, न्यायमूर्ती, विचारवंत, लेखक, भाऊ, मित्र, काका, बाबा, आजोबा आणि मग साहेब यातलं हवं ते लावू शकता. यातलं सगळं ते मनसोक्त जगले आहेत...
मी लहानपणापासून माझ्या काकांना कुटुंबातले एक ‘सेलिब्रिटी’ म्हणूनच पाहिलंय. अजूनही मी काकांसमोर अघळपघळ राहू शकत नाही आणि त्याचं कारण म्हणजे माझ्या संपूर्ण कुटुंबात त्यांना मिळणारा मान! ते आजोबांसारखे विद्वान तर होतेच, पण त्यासोबत अजून दोन गोष्टी पुढच्या पिढीत झाल्या ते म्हणजे काका उच्च न्यायालयातले नावाजलेले वकील आणि मग नंतर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले.
बीडला दरवर्षी उन्हाळ्यात आणि दिवाळीत आम्ही सगळे एकत्र जमत असू. तेव्हापासून काका म्हणजे विशेष आहेत हे जाणवे, घरातला त्यांना मिळणारा मान पाहिलाय. अगदी त्यांचे सख्खे लोक सुद्धा त्यांना ‘नानासाहेब’ म्हणत असत.
लहानपणीचा एक प्रसंग मनावर कोरला गेलाय. घरातल्या एका कार्यक्रमात स्वयंपाकघरात मी, श्रीधर आणि बुद्धी गरम बनलेल्या गुलाबजामच्या पातेल्यात हात घालताना त्यांनी पाहिलं. मी सगळ्यात मागे असल्याने माझ्या पाठीवर त्यांनी धपाटा मारला आणि माझी अस्मिता भडकली. सत्य कथन करण्यासाठी मी त्यांना खरमरीत पत्र लिहिले की, पहिला गुलाबजाम श्रीधरने खाल्ला, मग बुद्धीने मग माझा नंबर होता. नेमकं तुम्ही तेव्हा आलात आणि मला धपाटा दिला वगैरे वगैरे. हे पत्र त्यांनी खरंच वाचलं असावं. कारण, बाबानंतर येऊन म्हणाले की, अरे काकांना खूप वाईट वाटलं तुला धपाटा दिल्याबद्दल........ मग मलाही वाईट वाटलं होतं. पण, मग त्यासाठी नक्की काय करायचं हे न कळल्याने माफी मागायचं राहून गेलं.
पुढे हळूहळू काका ’कळायला’ लागले. औरंगाबादला जास्त राहणं व्हायला लागलं, थोडं वाचन वाढलं मग वकील झालो..
वकिलीतले काकांचे मोठेपण कळायला लागले, तसेच त्यांचे न्यायदानातले सुद्धा. एकदा एका प्रकरणात माझ्या प्रतिपक्षाच्या वकिलाने माझ्या विरोधात काकांचं जजमेंट दाखवलं, जे अगदी माझ्या विरुद्ध होतं. आता व्यावसायिक गरज म्हणून मला त्या जजमेंटच्या विरोधात बोलणं आवश्यक होतं. वरून जज साहेब खोचकपणे म्हणाले, “मी तुमची अडचण समजू शकतो” आणि त्यांनी माझा कडक विरोध नोंदवून प्रकरण माझ्याविरुद्ध निकाली काढलं.
माणूस आणि मित्र म्हणून त्यांचं मोठेपण 1996 नंतर औरंगाबादला आल्यावर त्यांच्यासोबत राहायला लागल्यावर कळाले. प्रचंड मित्रपरिवार, स्नेही, संबंधित, ओळखीचे आणि ते ही भारतभर पसरलेले, हे सगळं वाढवणं, टिकवणं त्यांना कसं आणि केव्हा शक्य झालं, हे मला अजूनही कळालेलं नाही.
1979 साली काकांनी बीडहून मुंबईला वकिलीला जायचं ठरवलं ते न्या. कुर्डुकर आणि न्या. कानडे यांच्या आग्रहामुळे. जाताना आशीर्वाद घेण्यासाठी ते गावातल्या वरिष्ठ वकिलांना भेटण्यासाठी गेले. सर्वांचे आशीर्वाद आणि कामाला सुरुवात करायला सात नवीन ब्रिफ, एवढ्या भांडवलावर काकांनी मुंबईत वकिली सुरुवात केली आणि लवकरच उत्तम जम बसवला. सुरुवातीच्या काळात ते आमदार निवासात, तेव्हाचे आमदार आवरगांवकर यांच्या खोलीत राहात असत. नंतर वेळ अशी आली की, काकांकडे येणार्या माणसांची गर्दी जास्त व्हायला लागली. काही दिवसांतच आकाशवाणीवर (एआयआर) काकांचा एक कार्यक्रम ऐकून पंजाबमध्ये राहणार्या एका व्यक्तीने त्यांच्या भावाला फोनवर कळवले की, “त्यांचा एक फ्लॅट मुलुंडला रिकामा आहे.
चपळगांवकर साहेबांना संपर्क करून त्यांना आवश्यक असल्यास देणे.” त्यांच्यामुळे काका त्यांचं कुटुंब मुंबईत नेऊ शकले.
औरंगाबाद खंडपीठ स्थापनेसाठी तत्कालीन मुख्य न्यायमूर्ती व्यंकटराव देशपांडे, नावंदर वकील, भादेकर वकील व इतरही खूप लोक झटत होते. काका तेव्हा वयाने लहान असले तरी मराठवाड्यातल्या उत्तम वकिलांत गणले जात, त्यामुळे काकांना तो लढा फार जवळून पाहता आला आणि त्यात भरीव योगदानही देता आलं. 1981 साली खंडपीठ स्थापन झाले, तेव्हा पहिलं प्रकरण चालवण्याची संधी म्हणा की मान, काकांना मिळाला. तेव्हा त्यांच्या विरोधात महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन महाभियोक्ता अरविंद सावंत होते आणि पुढं हे दोघेही उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले, हा एक सुवर्ण योगायोग म्हणावा लागेल.
फार लहान असल्यापासून त्यांना कायम लोकांसोबत चर्चेत नाहीतर वाचनात मग्न पाहिलंय. संध्याकाळी न्यायालयातून घरी आल्यावर ताबडतोब आवरून त्यांना अनंतराव भालेराव यांच्याकडे जायचं असायचं, जिथं भगवंतराव देशमुख, सुधीर रसाळ अशी त्यांची वरिष्ठ, पण जिवाभावाची मंडळी जमायची आणि गप्पा रंगायच्या. मला खूप नंतर कळलं की, ते ज्या लोकांसोबत चर्चेत/गप्पांत रंगलेले असायचे ते लोक किती मोठे होते. अनेकदा प्रश्न पडे की, हा माणूस बीडमधला वकील आणि देशभरातले नामांकित राजकारणी, व्यावसायिक, लेखक, प्रकाशक किंबहुना सामाजिक मान्यता पावलेल्या सर्व मोठ्या व्यक्ती यांच्या ओळखीच्या कशा? यांना एवढा वेळ कधी मिळत होता आणि यातून यांनी स्वतःच्या व्यवसायासाठी वेळ काढून तो एवढा कसा वाढवला?
1986 साली बाबा आजी-आजोबांना घेऊन दक्षिण भारतात यात्रेला गेले होते. त्यांची पूर्ण व्यवस्था काकांच्या दक्षिणेतल्या स्नेहींनी केली ती काकांच्या एका पत्रावर. अगदी स्टेशनवरून गाडी पाठवून त्यांना आणण्यापासून ते पुढच्या स्टेशनवर सोडेपर्यंत त्यांना कोणतीच अडचण आली नव्हती, बाबा अजूनही त्याची आठवण काढतात.
1990 साली दुपारी बाबांनी घरी शिपायामार्फत निरोप पाठवला की, नाना मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती झाले. दुसर्या दिवशीच्या मराठवाड्यातल्या तमाम वर्तमानपत्रांत पहिल्या पानावर काकांच्या फोटोसह ही बातमी छापलेली होती. तो पेपर बाबांनी अनेक वर्षे जपलेला आठवतो. आजोबांचं अजून एक स्वप्न काकांनी पूर्ण केलं होतं. दोन वर्षांच्या ‘अतिरिक न्यायमूर्ती’ या काळानंतर ‘नियमित न्यायमूर्ती’ म्हणून घ्यायची शपथ काकांनी मुंबईला न घेता आजोबांसाठी औरंगाबादला घेतली. ती शपथ घेऊन काका कॉरिडोरमधून खासगी दालनाकडे जाताना, आजोबांनी सामान्य वकिलाप्रमाणे काकांना लवून नमस्कार करताना अनेकांनी पाहिलंय!
वीसेक वर्षांपूर्वी काकांनी आजोबांचे आत्मवृत्त लिहायचे ठरवले. पण, काही केल्या आजोबा तयार होईनात. तरी जवळपास वर्ष दीड वर्षे आजोबांचा मूड सांभाळून काकांनी त्यांच्याकडून घडून गेलेली गोष्ट मिळवली. त्या नंतरही काकांनी ’स्वामी रामानंद तीर्थ’ यांचं चरित्र ’कर्मयोगी संन्यासी’ लिहिलं. ते लिहिताना त्यांनी दिवसरात्र घेतलेली मेहनत मी पहिली आहे. ’निवडणुकीचा कायदा’ असो, ’तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा कार्यकाळ’ ते काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेलं ‘पंतप्रधान नेहरू’ या पुस्तकांसाठीची मेहनत त्यांना 80व्या वर्षीसुद्धा तरुण बनवत असावी.
आमच्या घराण्यात कुणालाही औरंगाबादला काही काम असो, अडचण असो, मदतीसाठी हक्काचे घर म्हणजे ‘13, जयनगर’ हा पत्ता असे. काका-काकूसुद्धा आल्यागेलेल्याचं मनापासून करत असतात. काका मुंबईला गेल्यापासून ते औरंगाबादला आल्यावरही अनेक वर्षे आजीआजोबा हट्टाने बीडच्या घरी राहिले. तेव्हा वेळ मिळेल तसे बीडला जाऊन त्यांना हवं नको ते पाहणे, आवश्यक त्या दुरुस्त्या करवणे हे त्यांचं सतत चालूच असे. औरंगाबादला मोठं घर बांधल्यावर मात्र काकांनी आजीआजोबांना औरंगाबादला आणले. खास आजीच्या सोयीसाठी स्वयंपाकघराजवळ एक मोठी खोली बनवली आणि इमर्जन्सीसाठी तिथे त्यांच्या लाडक्या नातींच्या खोलीत बेल वाजेल, अशी व्यवस्था केली.
स्वातंत्र्यसैनिक आणि वकील म्हणून आजोबांना, चपळगांवकर घराण्याला मराठवाड्यात जी ओळख होती, ती काकांनी एका वेगळ्याच उच्च स्थानी नेली. आजोबा मला एकदा म्हणाले होते, “इथे न्यायालयात, समाजात आपल्याला खूप मान आहे, तो वाढवणं नाही जमलं तरी हरकत नाही, पण तो कमी होईल असे काही आपल्या हातून होणार नाही याची काळजी घ्या.”
लहानपणापासून काका म्हणजे घरातला मोठा मुलगा आणि मोठा भाऊ या भूमिकेत पाहिलेत. माझ्यासाठी ते माझे मोठे काका आहेत. त्यांच्यामुळे मला ओळख आहे आणि मला त्याचा अभिमान आहे!
(लेखक मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अॅडव्होकेट आहेत.)
- शैलेश चपळगावकर