नरेंद्र चपळगावकर यांची ही सर्व लेखन कारकिर्द फार मोठ्या इतिहासाचा एक दीर्घ पट मांडते, त्यावर वर्तमानाची अक्षरं कोरते आणि भविष्याचे मोठे संचित सांभाळून ठेवते. ओघवती भाषा, सरळ निवेदन शैली, व्यक्तिचित्रणातले बारकावे आणि घटना-प्रसंगांचे विश्लेषण करण्याची न्यायबुद्धी या सार्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन एक लखलखीत विचार वैभव म्हणून मराठी साहित्यात मानाचे पान आहे.
दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद हा रसिक वाचक आणि लिहित्या लेखकांसाठी एक औत्सुक्याचा विषय असतो. एकेकाळी निवडणुकीच्या मैदानात उतरून, प्रचाराची राळ उडवून अध्यक्षपदासाठी लढणार्या लेखकांमधून मतदार कोणाला जिंकून देणार याचं कुतूहल शिगेला पोहोचत असे. आता निवडणुका आणि प्रचार बंद झाला, तरी एकमताने सन्मानपूर्वक निवड कोणत्या साहित्यिकाची होणार, याचे कुतूहल तसूभरही कमी झालेले नाही. हे प्रश्नार्थ कुतहल यावर्षी लवकरच उलगडले.
ज्येष्ठ विचारवंत, न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर या तोलामोलाच्या मान्यवर व्यक्तिमत्त्वाची यथोचित निवड वेळीच जाहीर झाली. या निवडीने वैचारिक साहित्यावर प्रेम करणार्या वाचकांना मनापासून आनंद झाला आहे. आजवर दैनिके, मासिके, दिवाळी अंक यातून नित्यनेमाने लेखन करणार्या नरेंद्र चपळगावकरांचे लेखन सर्वपरिचित आहे. ही सारी भरीव साहित्यसंपदा पुस्तकरूपाने डौलात सगुण साकारलेली आहे. ही न्याहाळताना एक सत्य गवसतं... ते म्हणजे उजेडाचा एकेक कवडसा हाती यावा तसं प्रगल्भ विचारांचा एकेक कवडसा एकेका लेखाच्या रूपात ओंजळीत येतो. कुठलेही अवजड वैचारिक जडजंजाळ ओझे वाचकांवर न लादता.. लेखकाच्या शब्दाशब्दातून मनावर एक प्रसन्नेतची सुखद शिंपण होत राहते.
नरेंद्र चपळगावकर यांनी नैमत्तिक लेखन, अभ्यासपूर्वक मांडलेले चिंतन, कायदेविषयक माहितीपर लेखन आणि न्यायमूर्ती म्हणून काम करताना समोर आलेल्या जीवंत कथांचे चित्रण असे मिळून खूप मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली आहे. त्यांच्या नावावर जमा असलेल्या पुस्तकांची यादी लांबलचक आहे.
’अनंत भालेराव : काळ आणि कर्तृत्व’, ’तीन न्यायमूर्ती आणि त्यांचा काळ’, याशिवाय स्वामी रामानंदतीर्थ यांचे चरित्र रेखाटन करणारे - ’कर्मयोगी संन्यासी’ आणि ’मनातली माणसं’ ’संस्थानी माणसं’, ’हरवलेले स्नेहबंध’ या बहुसंख्य पुस्तकांमधून त्यांनी अनेक नामवंत मान्यवर अलौकिक व्यक्तींच्या जीवनाचा शोध घेऊन त्याचे वर्तमानाच्या काळावर उमटणारे ठसे शोधत जीवंत चित्रण केले आहे.
’आठवणीतले दिवस’, ’कहाणी हैदराबाद लढ्याची’ यामधून आठवणींचा धांडोळा घेत वर्तमान आणि इतिहासाचे मुक्त चिंतन वाचायला मिळते. ’तुमच्या माझ्या मनातलं ’, ’त्यांना समजून घेताना’ या ललित लेखनातून अनुभवांचा जरतारी काठ चमकदारपणे वाचकांना मोहवून ठेवतो. ’दीपमाळ’ या पुस्तकातून अनपेक्षितपणे भाषा आणि साहित्य यांची समृद्ध जाण दर्शवणारी समीक्षा काही परामर्ष मांडू पाहते. ’संघर्ष आणि शहाणपण’, ’समाज आणि संस्कृती’, ’सावलीचा शोध’ या पुस्तकातून सामाजिक अंगाने केलेली चिंतनगर्भ मांडणी विचारांना एका नेणत्या मार्गावर आणून ठेवते.
’नामदार गोखल्यांचा भारत सेवक समाज’, ’नामदार गोखल्यांचं शहाणपण’, ’न्यायमूर्ती केशवराव कोरटकर’, ’महात्मा गांधी आणि भारतीय राज्यघटना’ या पुस्तकातून समाजावर प्रभाव निर्माण करणार्या अद्वितीय व्यक्तींचे कार्य एका अभ्यासू निरीक्षकाच्या नजरेतून उतरल्याने या व्यक्तिमत्त्वांभोवती असलेले खास वलय लख्खं होत जाते.
’न्यायाच्या गोष्टी’ हे पुस्तक तर न्यायमूर्तींच्या खास प्रत्यक्ष अनुभवांचे कथारूप एका अनोख्या विश्वाचे दर्शन घडवते. या न्यायविषयक कथा मराठी साहित्याचे कथादालन समृद्ध करणार्या आहेत. या कथांच्या पलीकडे चपळगावकरांनी केलेले कायदाविषयक लेखन सर्वसामान्य माणसाला अत्यंत उपयुक्त असून किचकट कायद्याची सहजसुलभ ओळख करून देणारे आहे. यामध्ये ’राज्यघटनेचे अर्धशतक’, ’विधिमंडळे आणि न्यायसंस्था: संघर्षाचे सहजीवन’. ही पुस्तके खूप चिरंतन मोलाची म्हणावी लागतील.
’संस्थानी माणसं’ हे पुस्तक अतिशय रंजक असून संस्थानिकांचा वैभवी इतिहास मांडतानाच, तो इतिहास घडवणार्या त्या काळातील माणसांचा वेधही साक्षेपाने घेणारे आहे. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लेखकाने आपली इतिहासाकडे पाहण्याची दृष्टी स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते, इतिहास दोन पद्धतीने सांगता येतो. महत्त्वाचा घटनाक्रम सांगून त्यांची कारणमीमांसा मांडणे आणि दुसरी पद्धत म्हणजे इतिहास घडवणार्या किंवा इतिहासाने घडवलेल्या व्यक्तिमत्त्वांचा परिचय जाणून घेणे. याच तत्वानुसार या पुस्तकात संस्थानिकांच्या वास्तव जीवनाचे दर्शन अगदी थेट घडले आहे. ’सत्तेचा सूर्यास्त’ या प्रकरणात बहुप्रसिद्ध अशा हैदराबाद संस्थानच्या अंताची चित्रदर्शी कहाणी वर्णिली आहे. सातवे निजाम मीर उस्मान अली खान- आला हजरत यांची हैदराबाद संस्थान भारतात सामील न करता स्वतंत्र ठेवण्याची अखेरची धडपड सत्ता आणि संघर्षाचे विदारक नाट्य आहे. यात होरपळीत माणूस म्हणून त्या निजामाची पडझड मनाचा ठाव घेते. तसेच, महाराजा किशनप्रसाद, दौलताबादचा शामराज रायबहादूर, कासीम रझवी या व्यक्तिमत्त्वांचा वेध घेताना इतिहासाची पाने डोळ्यासमोर अशी फडफडतात की; पुन्हा पुन्हा हा इतिहास खुणावत राहतो. वाचावासा वाटतो. याच पुस्तकातील नवाब अलीयावर जंग यांच्यावरील लेख अतिशय वेधक आहे. विशेषतः ते महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कार्यरत असल्याने त्यांच्याविषयीचे चित्रण वाचताना अनेक संदर्भ स्पष्ट होत जातात. एकूणच या पुस्तकात संस्थानिकांच्या मावळत्या काळातील हरवलेल्या संस्कृतीचा पट रोमहर्षकपणे वाचकाला खिळवून ठेवतो.
याच अनुषंगाने ’हरवलेले स्नेहबंध’ या पुस्तकात राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांच्यावरील लेख चित्तवेधक झाला आहे. लेखकाच्या स्नेहबंधात बांधली गेलेले एकेक दिग्गज व्यक्तिमत्त्वं आपण या ना त्या पुस्तकात वाचली आहेत. काहींना डोळ्यांनी पाहिले आहे. तिच लोकोत्तर माणसं हळूहळू काळाच्या पडद्याआड गेली. चिपळूणकरांनी आपल्या या क्षितीजापार गेलेल्या पण मनातच घर करून बसलेल्या स्नेहीजनांची मनस्वी अशी स्मरणचित्रे रेखाटली आहेत. विशेषतः या पुस्तकात पी. व्ही. नरसिंह राव, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री, य. दि. फडके, श्री. पु. भागवत अशा स्नेहीजनांच्या सहवासातील गहीवर लेखकाने भावूकतेने टिपले आहेत.
’सावलीचा शोध’ हे पुस्तक अनेक अर्थाने महत्त्वाचे आहे. यामध्ये भारतात ख्रिस्ती धर्माचा प्रवेश आणि प्रचार कसा झाला, याचा साक्षेपी इतिहास मांडताना पोर्तुगीज, इंग्रज यांनी भारतावर केले राज्य व त्याअनुषंगाने साधारण 19व्या शतकाच्या सुरुवातीला समाजात अग्रभागी असलेले काही ख्रिस्ती व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे कार्य यांचा मागोवा घेतला आहे.
नरेंद्र चपळगावकर यांची ही सर्व लेखन कारकिर्द फार मोठ्या इतिहासाचा एक दीर्घ पट मांडते, त्यावर वर्तमानाची अक्षरं कोरते आणि भविष्याचे मोठे संचित सांभाळून ठेवते. ओघवती भाषा, सरळ निवेदन शैली, व्यक्तिचित्रणातले बारकावे आणि घटना-प्रसंगांचे विश्लेषण करण्याची न्यायबुद्धी या सार्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांचे लेखन एक लखलखीत विचार वैभव म्हणून मराठी साहित्यात मानाचे पान आहे.
मराठवाडा साहित्य संमेलनाची अध्यक्षीय भाषणे प्रेमाने संग्रहित करून, वाचून, जपून त्यांचे संपादन करणारे नरेंद्र चपळगावकर आज स्वतः अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष या नात्याने आपले प्रांजळ विचार मांडण्यास सिद्ध झाले आहेत. त्यांची प्रगाड विद्वत्ता आणि प्रगल्भ विचारशैली, अनुभवांचे ज्येष्ठत्वं हे सारे सारे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय पदास विभूषित करणारे ठरले आहे.
- अमृता खाकुर्डीकर