आज, दि. 11 नोव्हेंबर रोजी ‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज अॅण्ड रिसर्च’च्या (उखडठ) वतीने पुणे येथे ‘एकात्म मानव दर्शन संकल्पना कोश’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. कर्वेनगर येथील महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सभागृहात सायंकाळी 6.30 वाजता हा प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. भारतीय संकल्पनांचा नेमका अर्थ उलगडणार्या ‘एकात्म मानव दर्शन - ग्लॉसरी ऑफ कंसेप्ट्स’ या विशेष कोशाचे प्रकाशन रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रकाशन समारंभास अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित राहाणार आहेत. त्यानिमित्ताने या कोशामागची संकल्पना आणि कोशाचा प्रवास यांचा आढावा घेणारा हा लेख...
प्रत्येक ज्ञानशाखेत होणारी संकल्पना कोशाची निर्मिती हे पायाभूत स्वरुपाचे काम असते. बौद्धिक शिस्त आणि संशोेधन या आधारावर अशा कोशांची निर्मिती होणे अपेक्षित असते. कोणत्याही समाजात ज्ञानाच्या क्षेत्रात अशा मूलभूत स्वरुपाचे कार्य ज्या प्रमाणात होते, त्यावर त्याची प्रगती व विकास अवलंबून असतो. सातत्याने होणारी कोशनिर्मिती ही त्या समाजाच्या प्रगल्भतेची खूण असते. शब्दकोश, पर्याय-शब्दकोश, ज्ञानकोश, संकल्पना कोश असे कोशाचे विविध प्रकार असतात.
1973 साली साम्यवादाचे प्रणेते कार्ल मार्क्स यांची स्मृतिशताब्दी जगभर साजरी झाली. त्यानिमित्ताने मार्क्सवादाचे गाढे अभ्यासक व विचारवंत बॉटमोर यांनी जगभरातील मार्क्सवादाच्या 80 अभ्यासकांच्या सहकार्याने सुमारे 650 पृष्ठांचा ‘ऊळलींळेपरीू ेष चरीुळीीं ढर्हेीसहीं’ नावाचा संकल्पना कोश प्रसिद्ध केला. मैलाचा दगड ठरलेल्या या ग्रंथात मार्क्सवादाशी संबंधित 400 संकल्पनांचा ऊहापोह केला आहे. त्यातील प्रत्येक नोंदीखाली संदर्भ ग्रंथांची सूची देण्यात आली आहे. जागतिक स्तरावर मान्यता पावलेला हा ग्रंथ म्हणजे संकल्पना कोश निर्मितीचा आदर्श आहे. 1980च्या सुमारास प्रसिद्ध झालेल्या या कोशाचे विस्तृत परीक्षण ‘महाराष्ट्र टाईम्स’चे तत्कालीन संपादक गोविंद तळवलकर यांनी केले होते. विचारांच्या क्षेत्रातील अमूल्य ठेवा असलेला हा ग्रंथ मी विकत घेऊन वाचला. तो वाचत असताना पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या प्रबंधासंदर्भातही अशाच स्वरुपाचा संकल्पना कोश सिद्ध होणे आवश्यक आहे, असा विचार माझ्या मनात आला. म्हणूनच बॉटमोर यांच्या या विचारप्रवर्तक ग्रंथाचे सविस्तर परीक्षण मी सा. ‘विवेक’साठी लिहिले व ते प्रसिद्ध ही झाले. (विचारशक्ती धारदार करणारा ग्रंथ- सा. ‘विवेक’ दि. 20 जानेवारी, 2013) त्या लेखात मी वरील आशयाची सूचना केली होती आणि रामभाऊ म्हाळगींसारख्या ज्ञानमार्गी संस्थेने अशा स्वरुपाच्या संकल्पना कोश निर्मितीचा प्रकल्प हाती घ्यावा, असेही सूचविले. मात्र, माझी ती सूचना फलद्रुप झाली नाही.
पुढे ‘एकात्म प्रबोध मंडळ, मुंबई’ या संस्थेचे संस्थापक-सदस्य रवींद्र महाजन, दिलीप केळकर, भूषर दामले व मी अशा एका गटाने दर महिन्याला दोन तास बैठक घेऊन ‘एकात्म मानव दर्शन’ या प्रबंधाचा तपशीलवार अभ्यास करावा, असे ठरले. जवळ जवळ दोन वर्षे या मासिक बैठका सुरू होत्या. याच काळात या विषयावर एक संकल्पना कोश तयार करावा, अशी कल्पना पुढे आली. या संदर्भात मुंबईत प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे यांच्या उपस्थितीत दोन दिवसांची चिंतन बैठक घेण्यात आली व त्यात अशा प्रकारच्या प्रकल्पाचे काम हाती घ्यावे असे ठरले. या विषयात व अशा बौद्धिक कामात ज्यांना रस आहे, अशांच्या सहकार्याने आम्ही जवळ जवळ संकल्पनांची यादी तयार केली. धर्म, संस्कृती आणि तत्वज्ञान, राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शिक्षण, शासन-प्रशासन अशा गटात त्या संकल्पनांची वर्गवारी केली. प्रत्येक गटासाठी एकेका तज्ज्ञ अभ्यासकांचा बोध घ्यावा, असे ठरविले. या कोशाच्या प्रमुख संपादकपदी माझी नियुक्ती करण्यात आली.
याच सुमारास पं. दीनदयाळ यांच्या ‘एकात्म मानव दर्शन’ या प्रबंधाच्या मांडणीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष सुरू झाले. (2014-15) त्याचे औचित्य साधून नागपूरला रेशीमबागेत दीनदयाळजींच्या समग्र चिंतनावर आधारित या विषयातील अखिल भारतीय अभ्यासकांची एक चिंतन बैठक झाली. त्यावेळी रा. स्व. संघाचे तत्कालीन अ. भा. बौद्धिक प्रमुख डॉ. भागय्याजी व ज्येष्ठ विचारवंत मा. गो. वैद्य यांच्याबरोबर सविस्तर चर्चा झाली. त्यांनी या प्रकल्पासाठी उपयुक्त सूचना केल्या. त्याच वर्षी पुनरुत्थान विद्यापीठ, अहमदाबाद येथे झालेल्या बैठकीत रा. स्व. संघाचे ज्येष्ठ प्रचारक रंगाहरीजी यांची भेट झाली. त्यांनीही या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले.
प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्यानंतर या विषयात जे योगदान देऊ शकतात, अशा अभ्यासकांची यादी तयार केली. त्यांच्याशी भेटीगाठी, संपर्क, संवाद सुरू झाला. मी स्वत: यासाठी पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे असा प्रवास केला. पुण्यात शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. द. ना धनागरे यांची दोनदा सविस्तर भेट घेतली. त्यांनी अशा प्रकारच्या कोशनिर्मितीसाठी कराव्या लागणार्या पूर्वतयारीची, अभ्यासाची कल्पना दिली. एवढेच नव्हे, तर या विषयावर एक विस्तृत टिपण तयार करून दिले. त्यात अशा प्रकल्पामागील भूमिका, संकल्पनांचे विवरण करण्याची पद्धत, त्यातील शिस्त, संदर्भग्रंथाच्या नोंदी याची चर्चा केली. औरंगाबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी मराठी विभागप्रमुख व लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनीही या संदर्भात बहुमोल मार्गदर्शन केले व संकल्पनांची सूची अद्ययावत करण्यास साहाय्य केले.
या सर्वांचा उपयोग करून मी एक सविस्तर टिपण तयार केले. नमुन्यादाखल काही नोंदीही जमविल्या. अशी सर्व सामग्री एका धारिकेत-प्रस्तापित संकल्पनांच्या सूचीसह ग्रंथाला लेखकांकडे पाठविल्या. एकेका अभ्यासकाने आपापल्या अभ्यास विषयानुसार, चार ते पाच संकल्पनांच्या नोंदी कराव्या असेही ठरवले. ही टिपणे गट प्रमुखांकडे जावीत व त्यांनी ती वाचून, त्यात आवश्यक त्या सुधारणा करून, संपादक मंडळाकडे द्यावीत असे ठरले. संपादक मंडळाने प्रत्येक नोंदीसंदर्भात अंतिम निर्णय घ्यावा व ती ससंदर्भ व परिपूर्ण होतील असा धोरणात्मक निर्णय झाला. सर्वजण सद्भावनेने कामाला लागले, अशा प्रक्रियेतून सुमारे 40-45 नोंदी संपादकांकडे आल्या व त्यांच्या मसुद्यांवर चर्चाही झाली. हे सर्व सामूहिक चर्चेतून व चिंतनातून आकारास येत गेले. रा. स्व. संघाचे तत्कालीन सहसरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांना या प्रकल्पाची पूर्ण कल्पना दिली. त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले व सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. योगायोग असा की, त्यांच्याच हस्ते या ग्रंथाचे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात आज होणार्या समारंभात या कोशाचे लोकार्पण होत आहे.
काही अपरिहार्य कारणांमुळे मात्र जरी या जबाबदारीतून मुक्त व्हावे लागले असले तरी एकात्म प्रबोध मंडळाने ते कार्य रवींद्र महाजन व नाना लेले यांच्या नेतृत्वाखाली पुढे चालू ठेवले. अनेक अभ्यासकांनी या प्रकल्पाला आपला सहभाग नोंदवला आहे. पुनर्रचित संपादक मंडळाने एकूण संकल्पनांची फेरमांडणी करून 131 संकल्पनांवर लक्ष केंद्रित केलेे. 2018 साली नव्या टीमने पुढे नेलेले हे काम आता पूर्णत्वास आले आहे. रवींद्र महाजन व नाना लेले यांच्या संपादकत्वाखाली या प्रकल्पाची परिपूर्ती झाली आहे. या ग्रंथाच्या निर्मितीची जबाबदारी पुणे येथील ‘सेंटर फॉर इंटिग्रल स्टडीज’ या संस्थेने स्वीकारली आहे. संस्थेचे कार्यवाह हरीभाऊ मिरासदार यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्रंथाची निर्मिती झाली आहे.
या ग्रंथ प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने ‘एकात्म मानव दर्शना’त आलेल्या विविध विषयांवर एकदिवसीय चर्चासत्राचे त्याच दिवशी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या चर्चासत्रात जे. नंदकुमारजी, महेश शर्माजी, डॉ. विनायकराव गोविलकर, प्राचार्य अनिरुद्ध देशपांडे विविध विषयांची मांडणी करणार आहेत. या चर्चासत्राचा समारोप रा. स्व. संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या मार्गदर्शनाने होणार आहे.
ज्ञानाच्या क्षेत्रात व विचारविश्वात या वैचारिक स्वरूपाच्या ग्रंथाचे स्वागत होईल, असा विश्वास वाटतो. हा ग्रंथ अधिकाधिक विद्यालयात, महाविद्यालयांत संशोधन केंद्रात जावा, अशी अपेक्षा यानिमित्ताने करावीशी वाटते. राष्ट्रीय पुनर्निर्माणाच्या कार्यात ‘एकात्म मानव दर्शन’ व हा संकल्पना कोश यांचे वैचारिक योगदान नक्कीच महत्त्वाचे ठरेल. हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करण्यास ज्यांचे सहकार्य लाभले, त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन व या ग्रंथ प्रकाशन समारंभास शुभेच्छा!