‘मातोश्री’च्या खोक्यांचे काय?

    08-Oct-2022   
Total Views |

Uddhav and Matoshree 
 
 
 
ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याच्या नावाखाली घेण्यात आलेल्या सभेत शिंदे गटावर जी काही खालच्या पातळीवर जाऊन शिवराळ भाषेत टीका करण्यात आली, त्यातून ठाकरे गटाचं खरं रूप पुन्हा एकदा जनतेसमोर आलंच. ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या टीकेला शिंदे गटानेदेखील तितक्याच आक्रमक, पण संतुलित भाषेत उत्तर दिले. बंडखोरीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर अवतरलेल्या शिंदे गटाने आपण ठाकरे परिवारावर टीका करणार नाही, असं घोषित केलं होतं. पण, आपल्याच भूमिकेला छेद देत शिंदे गटाकडून आता थेट उद्धव आणि आदित्य ठाकरे यांना ‘टार्गेट’ केलं जात आहे. ‘बीकेसी’वरील सभेत खासदार राहुल शेवाळेंनी आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप केवळ गंभीरच नाही, तर त्यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे असल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय ठरला आहे.
 
 
काही महिन्यांपूर्वी शासकीय खर्चाने स्कॉटलंडमध्ये परिषदेचे कारण देऊन गेलेल्या आदित्य ठाकरे यांनी सरकारी पैशाची उधळपट्टी केली आहे. इतकंच नाही, तर कुठलाही संबंध नसताना ते स्कॉटलंडमधील परिषदेला का गेले? तसेच त्यांच्यासोबत ते एका महिला खासदाराला देखील घेऊन गेले होते, असा गंभीर आरोप राहुल शेवाळे यांनी केला. ‘50 खोके’ म्हणून शिंदे गटाला वारंवार हिणवणार्‍या उद्धव आणि आदित्य ठाकरे या पितापुत्राला आरसा दाखवण्याचे काम शिंदे गट चपखलपणे करत आहे. ठाकरेंसाठी मुंबई महापालिका म्हणजे शिवसेनेच्या अर्थार्जनाचे प्रमुख साधन. सातत्याने मुंबई महापालिकेची सत्ता ठाकरे परिवाराच्याच हातात राहिल्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या प्रत्येक प्रकरणाचे धागेदोरे ‘मातोश्री’पर्यंत जोडले जातात. आतापर्यंत विरोधी पक्षाकडून केले जाणारे आरोप आता थेट कित्येक वर्षे ‘मातोश्री’च्या पूर्वी छत्रछायेत असणार्‍या ठाकरेंच्या निकटवर्तीयांकडून केले जात आहेत. त्यामुळे त्याचे गांभीर्य अधिक.
 
 
“युवराजांच्या जन्मापासूनच त्यांना खोके घेण्याची सवय आहे, त्यामुळे खोक्यांचे आरोप करत असाल तर ते तुम्हालाच महागात पडेल,” असा सूचक इशाराही शेवाळेंकडून देण्यात आला. त्यातून शिंदे गट आता त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांवर थेट प्रत्युत्तर देत असून या वादातून आता ‘मातोश्री’वरील खोक्यांचा मुद्दाही पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 
 
                                                              यात्रेतील ‘मातोश्री’प्रेमाची जत्रा 
 
 
‘न भूतो न भविष्यती’ परिस्थितीत काँग्रेसला आणून ठेवल्यानंतर ‘भारत जोडो’ यात्रेच्या निर्धाराने अखेरीस काँग्रेसचे युवराज खा. राहुल गांधी रस्त्यावर चालून आता माध्यमांत झळकू लागले. आता राहुल गांधींच्या याच यात्रेला पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या मातोश्री साक्षात सोनिया गांधी मैदानात उतरल्या. काही वर्षांपासून सोनिया गांधी आजारी असल्याचे काँग्रेसकडून सातत्याने सांगितले जाते. परदेशात उपचारांसाठीही त्या अधूनमधून रवाना होतात. एवढेच नाही तर त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. तेव्हा, अशा स्थितीतही सोनिया गांधींना ‘भारत जोडो’ यात्रेत काँग्रेसने ‘हात’ धरुन आणलेले दिसतेच.
 
 
आता मुलगा एवढा पायपीट करतोय म्हटल्यावर आईलाही दया येणे स्वाभाविकच म्हणा. म्हणूनच मग आपल्या नाकर्त्या मुलाच्या समर्थनार्थ सोनिया गांधींनाही मैदानात उतरावे लागले. एवढेच नाही तर यावेळी मायलेकाने फोटोसेशनही अगदी जोरात केले. जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आईला भेटायला गुजरातमध्ये जातात, तेव्हा मोदींवर दिखाऊपणाचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने होताना दिसतो. मात्र, जेव्हा सोनिया गांधी राहुल गांधींच्या यात्रेत सहभागी झाल्या, तेव्हा मात्र सोनियांच्या बुटाची दोरी बांधतानाचे राहुल यांचे छायाचित्र अगदी पद्धतशीरपणे समाजमाध्यमांवर झळकावले गेले. म्हणजेच काय तर राहुल गांधी किती साधे, सरळ आणि सर्वसामान्य पुत्रासारखेच आहेत, त्यांना त्यांच्या आईची किती काळजी, आईवर प्रेम करणारा असा हा ममत्व आणि आपुलकीने भारलेला नेता.... असा राहुल गांधी यांच्या प्रतिमारंजनाचाच हा सगळा स्टंट म्हणायला हवा.
 
 
यापूर्वीही एका कार्यक्रमात राहुल सोनियांना शाल पांघरतानादेखील दिसले होते आणि त्याचाही पुरेपूर प्रसार काँग्रेसकडून करण्यात आला होता. त्यामुळे एकीकडे श्रावणबाळासारखा आव आणून आईची सेवा करण्याचा दिखावा करणार्‍या राहुल गांधींनी आपल्याच आईला आजारी असतानाही काँग्रेस अध्यक्षपदावर राहायला मागील काही वर्षे भाग पाडले. अशी ही घराणेशाहीची घरगुती अ‍ॅडजस्टमेंट म्हणा! राहुल गांधींच्या यात्रेत त्यांच्या मातोश्रींचे दर्शन झाले, आता पुढील काही दिवसांत त्यांच्या दीदीश्री देखील अशाच ‘हात’ उंचावताना दिसतील. त्यामुळे ’काँग्रेस‘ नामक या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत अध्यक्ष कुणीही झाला तरी काँग्रेसच्या मातोश्रींपुढे नतमस्तक व्हावेच लागेल, हेच वास्तव!
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.