मोदी-हिंदूद्वेष्ट्या ‘प्रपोगंडा’चा ‘टाईम’

    07-Oct-2022   
Total Views |
 Propaganda
 
 
पाश्चात्य देशांतील माध्यमे नेहमीच भारतविरोधी ‘प्रपोगंडा’ चालवताना दिसतात. त्यांचा एकमेव उद्देश राष्ट्रवादी सरकारविरोधात वातावरण तयार करून पाश्चात्यांच्या व उद्योगपतींच्या तालावर नाचणार्‍या सरकारच्या स्थापनेचा असतो. नुकताच परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारताविषयीच्या भेदभावपूर्ण वार्तांकनासाठी ‘वॉशिंग्टन पोस्ट’सह अमेरिकेतील मुख्य प्रवाहातील माध्यमांवर जोरदार निशाणा साधला होता.
 
 
आता तर ‘टाईम’ मासिकाने भारतात ‘प्रपोगंडा’ पसरवणार्‍या ‘अल्ट न्यूज’च्या मोहम्मद झुबेर आणि प्रतीक सिन्हाच्या माध्यमातून आपला मोदी व हिंदूद्वेष्टेपणा सिद्ध करून दाखवला आहे. ‘टाईम’ने ‘अल्ट न्यूज’च्या मोहम्मद झुबेर आणि प्रतीक सिन्हा 2022 सालच्या ‘नोबेल शांतता पुरस्कारा’साठी योग्य उमेदवार असल्याचे म्हटले आहे. ‘टाईम’ने यासंदर्भात एक यादी तयार केली असून त्यात झुबेर व सिन्हासह व्लादिमीर झेलेन्स्की, ‘डब्ल्यूएचओ’, डेव्हिएड एटनबरो, ग्रेटा थनबर्ग, अलेक्सी नवल्नी व इतरही अनेक नावे आहेत. पण, ‘टाईम’ने यादी तयार करताना अनेक हिंदूंच्या हत्येसाठी जबाबदार असलेल्या मोहम्मद झुबेरलाच थेट एका पीडित म्हणून सादर केले. ’टाईम’ने आपल्या लेखात म्हटले की, “भारतीय फॅक्ट चेक-संकेतस्थळ-‘अल्ट न्यूज’चे सह-संस्थापक, पत्रकार प्रतीक सिन्हा आणि मोहम्मद झुबेर हिंदूराष्ट्रवादी पक्ष-भाजपवर मुस्लिमांशी भेदभावाचे सतत आरोप लावल्या जाणार्‍या भारतात चुकीच्या माहितीशी निरंतर संघर्ष करत आहे. झुबेरना चार वर्षांपूर्वी ट्विटरवर पोस्ट केलेल्या एका ‘मीम’साठी जून 2022 मध्ये अटक करण्यात आली होती. जगभरातील पत्रकारांनी या अटकेचा निषेध केला. मोहम्मद झुबेर करत असलेल्या ‘फॅक्ट चेक’विरोधातील सूड म्हणून त्यांना अटक केले गेले.”
 
 
‘टाईम’ने ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’च्या दि. 28 जूनच्या एका विधानाचा दाखला दिला. “ ‘अल्ट न्यूज’ची सतर्कता दुष्प्रचाराच्या माध्यमातून समाजाचे ध्रुवीकरण करणार्‍यांना पसंत पडली नाही, असे ‘एडिटर्स गिल्ड ऑफ इंडिया’ने म्हटले होते. पत्रकारांचे रक्षण करणार्‍या समितीने झुबेरच्या सुटकेचे आवाहन केले अन् त्यांची अटक भारतातील माध्यम स्वातंत्र्यविरोधी ठरवली,” अशा प्रकारे भारताच्या काही डाव्या माध्यमांच्या भेदभावपूर्ण प्रतिक्रियेच्या आडून ‘टाईम’ने भारत आणि मोदी सरकारला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला.
 
 
मात्र, झुबेरने नुपूर शर्मांची संपादित आणि एकच बाजू दाखवणारी चित्रफित समाजमाध्यमांवर सामायिक करून संपूर्ण देशाला द्वेषाच्या आगीत लोटल्याच्या घटनेवर ‘टाईम’ने पडदा टाकला आहे. इतकेच नव्हे, तर मोहम्मद झुबेरने अरब देशांनाही भारताविरोधात भडकावण्याचा प्रयत्न केला. झुबेरमुळे देशात ‘सर तन से जुदा’ची दहशत पसरली. इस्लामी कट्टरपंथीयांनी उदयपूरमच्या कन्हैयालाल आणि अमरावतीच्या उमेश कोल्हेंसह किमान सहा हिंदूंचे शीर धडावेगळे केले. तथापि, ‘टाईम’मध्ये सन्या मन्सूरने लिहिलेल्या लेखानंतर अफवाचे पीक आले, पण त्यात ‘शांततेचा नोबेल पुरस्कार’मिळवणार्‍यांच्या अधिकृत यादीसारखे काही नाही. ही फक्त ‘टाईम’ने उल्लेख केलेली काही अंदाजित नावे आहेत, पण त्याकडे लक्ष न देता झुबेर अन् सिन्हासमर्थक अंदाजांनाच सत्य मानू लागले आहेत. त्यांना अंदाज आणि शॉर्टलिस्टेडमधील फरक समजत असल्याचे दिसत नाही. खरे म्हणजे, भारतीयांना भ्रमित करणे अन् आपल्या ‘इकोसिस्टीम’मधील लोकांच्या बाजूने वातावरण तयार करण्याचा हा पाश्चात्य माध्यमांचा एक डाव आहे.
 
 
पाश्चात्य माध्यमे नेहमीच भारतविरोधी मजकूर प्रकाशित करत असतात, झुबेर अन् सिन्हाचे अंदाजित नावही त्यापैकीच. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने संपूर्ण जगात हाहाकार माजवलेला असताना ‘टाईम’ने आपल्या मुखपृष्ठावर ‘संकटात भारत’ मथळ्याखाली स्मशानातील छायाचित्रे प्रकाशित करत भीती पसरवण्याचे काम केले. त्याआधी ‘टाईम’ने आपल्या एका अंकात पंतप्रधान नरेंद्र मोदींवर मुस्लिमांचे अधिकार संपवण्याचा आरोप लावत त्यांनी देशाला धर्मनिरपेक्षतेकडून हिंदू राष्ट्रवादाकडे लोटल्याचे म्हटले. इतकेच नव्हे, तर मे 2019 मध्ये ‘टाईम’ने पंतप्रधान नरेंद्र मोदींना ‘इंडियाज् डिव्हायडर इन चीफ’ असे म्हणत लेख लिहिला होता. म्हणजेच, ‘टाईम’ला भारत व प्रामुख्याने राष्ट्रवादी, हिंदुत्ववादी मोदी सरकारविरोधात ‘प्रपोगंडा’ पसरवायला आवडत असल्याचे दिसून येते. म्हणूनच ‘टाईम’ने त्यांच्या याच ‘प्रपोगंडा’ला हातभार लावणार्‍यांची नावे नोबेलसाठी योग्य असल्याचे म्हटले.
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.