1969 मध्ये देशाच्या राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार होती आणि अपेक्षेप्रमाणे तत्कालीन सत्ताधारी पक्षाच्या उमेदवाराचा विजय होणे अपेक्षित होते. मात्र, संख्याबळ असूनही काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराचा पराभव झाला आणि काँग्रेसच्याच नेत्या इंदिरा गांधींच्या पाठिंब्यावर उभे असलेले अपक्ष उमेदवार व्ही. व्ही. गिरी यांचा विजय होऊन ते राष्ट्रपतीपदी विराजमान झाले. दुसरे ताजे उदाहरण राजस्थानचे. तेथील गेहलोत विरुद्ध पायलट संघर्षही असाच खुर्चीसाठी उफाळून येणारा. तात्पर्य हेच की, जेव्हा काँग्रेसकडे थोडेसे का होईना, पण संख्याबळ असते, तेव्हा ही मंडळी आपापसात भांडूनच आपल्याच माणसांचा पराभव करतात, हाच काँग्रेसचा इतिहास.
मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर होऊ घातलेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आपला उमेदवार न देता आपण उद्धव ठाकरेंच्या उमेदवाराला सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. तशी रीतसर घोषणाही प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी कालच केली. मात्र, आजवरचा इतिहास पाहिला तर सत्तेसाठी आपल्याच पक्षात हाणामारी करणारी मंडळी सत्तेचा घास दुसर्या पक्षाच्या पोटात इतका सहजासहजी जाऊ देतील का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.तीनच महिन्यांपूर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसकडे हक्काची मते असतानाही केवळ अंतर्गत संघर्ष आणि लाथाळ्यांमुळे पक्षाचे क्रमांक एकचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे पराभूत झाले होते, तर आश्चर्यकारकरित्या दुसर्या पसंतीचे उमेदवार भाई जगताप निवडून आले होते.
आता याला जादूगिरी म्हणायचे की आणखी काही, हे काँग्रेसच जाणो. पण, ज्या काँग्रेस नेत्यांनी खुर्चीसाठी आपल्याच पक्षातील सहकार्यांचा विश्वासघात केल्याचा इतिहास देशासमोर आहे, त्यांच्या शब्दांवर ठाकरे गटाने विश्वास ठेवावा का? कारण, जे स्वपक्षीयांचे झाले नाही ते तुमचे होणार का? याचे आत्मचिंतन उद्धव ठाकरेंनी करणे गरजेचे आहे. पण, तसे होण्याची शक्यता शून्यच. कारण, अजूनही ‘महाविकास आघाडी’ नावाचा फसलेला राजकीय प्रयोग कसा योग्य होता, हे जनतेच्या गळी उतरवण्यासाठीच्या धंद्यांपैकीच काँग्रेसचा हा निर्णय, ज्याचे परिणाम पालिका निवडणुकीतही दिसून आले तर नवल वाटायला नको.
मुंबई काँग्रेसची हतबलता...
आपलं चांगलं झालं नाही तरी चालेल, पण आपल्या शेजार्याचं वाईटचं पाहिजे, अशा वृत्तीने वागणारी जमात मागच्या अडीच वर्षांत राज्याच्या राजकीय क्षेत्रात प्रामुख्याने दिसून आली. परस्परांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून काम करणार्या शिवसेना आणि दोन्ही काँग्रेसला भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी रडीचा डाव खेळावा लागला आणि नाईलाजास्तव का होईना, पण सत्तेसाठी ‘महाविकास आघाडी’चा फसवा प्रयोग करावा लागला. सातत्याने परस्पर विरोधी भूमिका घेणार्या मंडळींनी कशीबशी अडीच वर्षे सत्तेचा सारीपाट मांडला आणि सत्तेचे सगळे लाभ पदरात पाडून घेतले. पण, त्यांची मनं मात्र जुळली नाहीत. म्हणूनच कधी काँग्रेसची मुंबईतील आघाडी शिवसेनेच्या विरोधात उघड प्रचार करताना दिसते, तर कधी तेच दोन घटक परस्परांची मदत घेण्यासाठी वाटाघाटी करायला बसतात, हे चित्र आता महाराष्ट्रासाठीही नवीन नाही.
मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या विरोधात लढाई करण्याची भूमिका घेणारी काँग्रेस, त्याच शिवसेनेला आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेत सहभागी होण्यासाठी विनवण्या करताना दिसली. त्यालाच समांतर म्हणजे आम्ही ‘भारत जोडो’त सहभागी होऊ तुम्ही दसरा मेळाव्यात मदत करा, अशी भूमिका ठाकरे गट मांडतो. मुंबईपुरतं बोलायचं तर काँग्रेसला कुणाला तरी हाताशी धरल्याशिवाय तरणोपाय नाही, कारण त्यांची संघटना कमकुवत झालेली आहे. अंधेरी पोटनिवडणुकीतही आम्ही ठाकरे गटाच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत, अशी घोषणा करणार्या काँग्रेसवर जर निवडणूक लढवण्याची वेळ आली असती तर त्यांच्याकडे उमेदवार आणि संघटन सज्ज होते का? याचा विचार त्यांनीच केला पाहिजे. मागील काही निवडणुकीत अंधेरीत सातत्याने काँग्रेसची मते कमी होत गेल्याचे आकडेवारीवरुन स्पष्ट होते. त्यामुळे मजबुरीने का होईना, पण काँग्रेसला शिवसेनेच्या समर्थनाचा निर्णय घ्यावा लागला, हे स्पष्ट आहे.
यावरुन काँग्रेसने आगामी पालिका निवडणुकीतही शिवसेनेचीच साथ देण्याचा निर्णय घेतला तर कदापि आश्चर्य वाटायला नको. कारण, मुंबईतील काँग्रेस ही आता औषधापुरतीच उरली असून तीही आता ठाकरेंच्या उरलेल्या शिवसेनेच्या जीवावर जगणार असेल, तर कितीही ‘भारत जोडो’ यात्रा केल्या तरी उपयोग शून्यच!