ब्रिटनमधील केवळ दोन टक्के लोकसंख्या असलेल्या अल्पसंख्य हिंदू समुदायातील व्यक्ती पंतप्रधानपदी पोहोचली तर त्याचे ‘द गार्डियन’ आणि लेखाचे लेखक पंकज मिश्रा यांना कौतुक वाटत नाही. उलट त्या व्यक्तीच्या हिंदू ओळखीवरच ‘द गार्डियन’ निशाणा साधते, हिंदूपणावरुन त्या व्यक्तीला धारेवर धरते. यावरुनच ‘द गार्डियन’चा अल्पसंख्यकहितैषी भंपकपणा आणि हिंदुद्वेष्टेपणा दिसून येतो.
लिसेस्टर आणि बर्मिंगहममधील हिंदूविरोधी दंगलीत धर्मांध मुस्लीम आरोपींचा बचाव करत हिंदूंची बदनामी करणार्या ब्रिटनमधील ‘द गार्डियन’ वृत्तपत्राने पुन्हा एकदा आपला हिंदूद्वेष दाखवून दिला. नुकतीच आपल्या हिंदूपणाचे जाहीर प्रकटीकरण करणार्या हुजूर पक्षाच्या ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड करण्यात आली. ऐन दिवाळीत ऋषी सुनक यांची ब्रिटनच्या पंतप्रधानपदी निवड झाल्याने भारतीयांनी त्याबाबत आनंदही व्यक्त केला. पण, ‘द गार्डियन’ला ऋषी सुनक यांचे हिंदू असणेच खटकले आणि त्या वृत्तपत्राने ऋषी सुनक यांना त्यांच्या हिंदूपणावरुन लक्ष्य केले. एरवी ‘द गार्डियन’, ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ वा इतरही अनेक जागतिक वृत्तमाध्यमे आपल्याला अल्पसंख्याकांची काळजी वाटत असल्याचे कंठशोष करुन सांगत असतात. अल्पसंख्याकांनी चुका केल्या, गुन्हे केले, हिंसाचार केला, दहशतवादी कारवाया केल्या, तरी ते मासूमच असल्याचे सांगत बहुसंख्याकांनाच दोष देण्यासाठी ‘द गार्डियन’सारखी वृत्तपत्रे आघाडीवर असतात.
विशेष म्हणजे, त्यांच्या दृष्टीने अल्पसंख्य म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणातील विशिष्ट समुदायाचे किमान प्रमाण नव्हे, तर ते ज्यांना अल्पसंख्य म्हणतील तोच समुदाय अल्पसंख्य असतो. सध्याच्या घडीला ‘द गार्डियन’ आणि बाकीची जागतिक माध्यमेदेखील वेगवेगळ्या देशांतील मुस्लिमांनाच केवळ अल्पसंख्य मानतात. त्याहून कमी लोकसंख्या असली तरी हिंदू, बौद्ध, शीख, जैन, पारशी यांसारख्या इतर धर्मीयांना ते अल्पसंख्य मानत नाहीत. म्हणूनच अमेरिका, ब्रिटन वा भारतातही अल्पसंख्याकांवर पक्षी मुस्लिमांवर अन्याय-अत्याचार होत असल्याचे खोटेनाटे दावे, अहवाल त्यांच्याकडून सदान्कदा प्रसिद्ध केले जातात. ब्रिटनच्या एकूण लोकसंख्येपेक्षा तिप्पट लोकसंख्या असूनही भारतातील मुस्लिमांना अल्पसंख्य ठरवून त्यांचे शोषण केले जात असल्याची रडारडही त्यांच्याकडून सुरू असते. पण, ब्रिटनमधील एकूण लोकसंख्येच्या केवळ दोन टक्के लोकसंख्या असलेल्या एका अल्पसंख्य हिंदू समुदायातील व्यक्ती पंतप्रधानपदी पोहोचली, तर त्याचे ‘द गार्डियन’ आणि लेखाचे लेखक पंकज मिश्रा यांना कौतुक वा अल्पसंख्य समुदायाचा विजय असल्याचे वाटत नाही. उलट त्या व्यक्तीच्या अल्पसंख्य हिंदू ओळखीवरच ‘द गार्डियन’ निशाणा साधते, हिंदू असण्यावरुन त्या व्यक्तीला धारेवर धरते. यावरुनच ‘द गार्डियन’चा अल्पसंख्याकहितैषी भंपकपणा आणि हिंदूद्वेष्टेपणा दिसून येतो.
‘द गार्डियन’ने ऋषी सुनक यांच्यावर टीका करताना त्यांना ‘हिंदू सुप्रीमॅसिस्ट्स’ म्हटले. ऋषी सुनक भारतातील राष्ट्रवादींसाठी ‘देसी ब्रो’ (भारतीय असलेले परदेशी भाऊ) आहेत, असे ‘द गार्डियन’मधील लेखाचे लेखक पंकज मिश्रा यांनी लिहिले. महत्त्वाचे म्हणजे, राष्ट्रवादी हिंदूंना हिणवण्यासाठी, कमी लेखण्यासाठी कम्युनिस्ट आणि इस्लामिस्टांकडून ‘हिंदू सुप्रीमॅसिस्ट्स’ संज्ञेचा वापर केला जातो. किंवा जे जे राष्ट्रवादी हिंदू असतील ते ते ‘हिंदू सुप्रीमॅसिस्ट्स’ असतात आणि अन्य जात, पंथ, वर्ग समूहातील व्यक्ती राष्ट्रवादी असूच शकत नाही, असेही ‘द गार्डियन’ला यातून बिंबवायचे आहे. ऋषी सुनक ब्रिटनमध्ये राहूनही गोमांस भक्षण करत नाहीत, मद्यपान करत नाहीत, यानेही ‘द गार्डियन’ला मिरच्या झोंबल्याचे दिसते. त्याला ‘द गार्डियन’ने ‘अप्पर कास्ट टॅबू’-उच्चवर्णीयांची संस्कृती म्हणत हिणवले. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की, मुस्लिमांनी वा ख्रिश्चनांनी आपापल्या धार्मिक श्रद्धा जपल्या, नमाज पढला, रोजा ठेवला, मोहरममध्ये चाबकाने फटके मारले तर त्याचे चांगलेच कौडकौतुक केले जाते, ‘द गार्डियन’ही त्यात सहभागी होते. पण, हिंदूंनी किंवा ऋषी सुनक यांनी हिंदूंमध्ये पवित्र मानल्या जाणार्या गोमातेचे पूजन करत गोमांस भक्षण केले नाही, तर मात्र त्यावर ‘द गार्डियन’ थयथयाट करते, त्याला ‘अप्पर कास्ट टॅबू’ म्हणते.
उल्लेखनीय म्हणजे, ‘द गार्डियन’मधील लेखाचे लेखक पंकज मिश्रा यांनी इथे ‘हिंदू’ शब्द न वापरता उच्च वर्णीयांचे नाव घेत शिव्या घातल्या आहेत. त्यातून ‘द गार्डियन’चा हिंदू-हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा डाव असल्याचेही स्पष्ट होते. गोमातेचे पूजन केवळ उच्चवर्णीयच करतात, तर अन्य जाती-पंथाचे हिंदू तसे करत नाहीत, उलट ते गोमांस भक्षणच करतात, असे ‘द गार्डियन’ला यातून सांगायचे आहे. जेणेकरुन हिंदूंमधल्या विविध समुदायांमध्ये आपण इतरांहून वेगळे आहोत, अशी भावना वाढीस लागेल, असा ‘द गार्डियन’चा अजेंडा आहे. इतकेच नव्हे, तर ऋषी सुनक सदैव श्रीगणेशाची मूर्ती आपल्या जवळ बाळगतात, त्यावरही ‘द गार्डियन’ने टीका केली आहे.
ऋषी सुनक हुजूर पक्षाच्या विविधतेला आपलेसे करणारा दृष्टिकोन उद्ध्वस्त करत असल्याचेही ‘द गार्डियन’ने आपल्या लेखात म्हटले. पण, प्रत्यक्षात ऋषी सुनक यांचे हिंदूपण ‘द गार्डियन’ला खटकत असल्याचे व त्यावर टीका करुन, ते इतरांसारखे गोमांस भक्षण करणारे, मद्यपान करणारे नसल्यावरुन आपणच त्यांच्यामुळे समोर आलेली मानवी समुदायांतली विविधता मातीमोल करत असल्याची जाणीव ‘द गार्डियन’ला नाही. पुढे ‘द गार्डियन’ने सुटाबुटात राहत असल्याने ऋषी सुनक महात्मा गांधींसारखे धार्मिक हिंदू दिसत नाहीत, असेही म्हटले. मुळात धार्मिक हिंदूची अमुक एक ओळख असते, असे हिंदू शास्त्रांत सांगितलेले नाही. तसेच महात्मा गांधी धार्मिक हिंदू ओळखीचे प्रमाण नाही. धार्मिक हिंदू कोणीही असू शकतो, तो त्याला आवडेल ते कपडे परिधान करु शकतो, आवडेल त्या वातावरणात राहू शकतो. त्याने महात्मा गांधींसारखेच धोतर-पंचा घातला पाहिजे, असे नव्हे.
त्यामुळे ‘द गार्डियन’ची धार्मिक हिंदू समजण्यात चूक झाल्याचे स्पष्ट होते. नवा भारत गांधीवादी मुल्यांना विसरत असून सत्ता आणि पैसा यांच्यामागे पळत असल्याचेही ‘द गार्डियन’ने लिहिले. मुळात महात्मा गांधींनी सांगितलेली सत्ता वा संपत्तीविषयीची मूल्ये त्या काळात ठीक असतीलही, पण आताच्या घडीलाही भारताने गरीबच राहावे, आपला विकास करु नये, संपत्तीनिर्मिती करु नये आणि कायम बड्या देशांचे आश्रितच राहावे, असे ‘द गार्डियन’ला वाटते. यातूनच ‘द गार्डियन’चा हिंदूद्वेष्टेपणा, भारतद्वेष्टेपणा दिसून येतो, हे हिंदूंनी, भारतीयांनी लक्षात घेतले पाहिजे.