काही व्यक्ती आपल्या संपत्तीची, त्यांनी केलेल्या गुंतवणुकीची अगदी व्यवस्थित नोंद करुन ठेवतात. ‘नॉमिनी’ही नेमतात. तसेच सर्व गुंतवणुकीची कुटुंबाला माहितीही देतात. पण, बर्याच व्यक्ती आपल्या संपत्तीचा तपशील नातलगांना विविध कारणास्तव सांगत नाहीत व अशा व्यक्तींचा जर मृत्यू झाला, तर नातलगांना अशा व्यक्तीच्या गुंतवणुकीचा शोध घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तेव्हा, अशा परिस्थितीत नातेवाईकांनी नेमके काय करावे, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख....
सर्वप्रथम कुटुंबातील व्यक्तींनी किंवा मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसदारांनी संबंधित व्यक्तीच्या घरात गुंतवणुकीची काही कागदपत्रे मिळतात का, त्याचा शोेध घ्यावा. सर्व कागदपत्रे जर घरीच मिळाली, तर बरंच! तसेच त्या मृत व्यक्तीचा जो ‘सीए’ होता किंवा करसल्लागार होता, त्यालाही आवर्जून भेटावे. कारण, त्यांच्या संगणकात, फाईलीतील नोंदींमध्ये त्या मृत व्यक्तीच्या गुंतवणुकीची सविस्तर माहिती मिळू शकेल.
जर संबंधिकत मृत व्यक्तीचा मोबाईल संपत्तीची माहिती काढणार्यांकडे असेल व त्याचा ‘पॅन’ क्रमांकही माहीत असेल, तर त्याच्या आधारेही प्राप्तिकर कायद्यान्वये जो ‘रिटर्न’ ‘फाईल’ केलेला असेल, त्यात गुंतवणुकीचा तपशील मिळू शकतो. तसेच वार्षिक माहिती विवरणातूनही संपत्तीबद्दलची माहिती मिळू शकेल. जर मृत व्यक्तीचे ‘पॅनकार्ड’ मिळत नसेल, तर कायदेशीर वारसदार पुन्हा ‘पॅन’ तयार करुन देण्यासाठी अर्जही करु शकतात. जर प्राप्तिकर खात्याच्या अधिकार्यांनी पुन्हा ‘पॅन’ तयार करुन देण्यास नकार दिला, तर पुढील पर्याय म्हणजे न्यायलयात ‘रिट’ ‘फाईल’ करुन न्यायालयाला प्राप्तिकर खात्याला तशा सूचना देण्यास सांगणे.
संपत्तीची माहिती मिळावी म्हणून पहिल्यांदा घरातच बँकेचे पासबुक, चेकबुक, बँकेच्या ‘लॉकर’च्या चाव्या, पॅनकार्ड, काही जणांना गुंतवणुकीचा तपशील डायरीत लिहायची सवय असते, अशा डायरींचा शोध घ्यावा. हे जर हाती लागले, तर त्या संपत्तीचा शोध घेणे सोपे होऊ शकते.
प्रत्येकाने आपल्या स्थिर तसेच अस्थिर संपत्तीची माहिती जवळच्या नातलगाला किंवा कायदेशीर वारसाला द्यावी, नाहीतर संपत्तीचा शोध घेणार्यांना पुढे हे सगळे फार अडचणीचे ठरते. आतापर्यंत असे आढळून आले आहे की, बरेच जण सर्व गुंतवणुकीचे कागदपत्र एकाच ठिकाणी ठेवतात. बँकेच्या खात्याच्या ‘स्टेटमेंट’मधून त्यात गुंतवणुकीतून व्याज ‘क्रेडिट’ होते, कोणत्या कंपन्यांच्या ‘शेअर’चा लाभांश ‘क्रेडिट’ होतो, याची पूर्ण माहिती मिळू शकते. प्रत्येकाने प्रत्येक गुंतवणुकीत ‘नॉमिनी’ नेमावाच, म्हणजे कायद्याने मृत व्यक्तीचे पैसे त्याच्या ‘नॉमिनी’ला मिळू शकतात. जर संपत्तीसाठी ‘नॉमिनी’ नेमलेला नसेल व संपत्ती जास्त मूल्यांची असेल, तर मृताची संपत्ती मिळविण्यासाठी कायदेशीर वारसास ‘वारसा हक्क सर्टिफिकेट’ न्यायालयाकडून मिळवून सादर करावे लागते. वारसा हक्क सर्टिफिकेट मिळविण्यासाठी खर्चही भरपूर होतो व कालावधीही बराच लागतो. त्यामुळे ‘नॉमिनेशन’ करणे, हे गरजेचे असते. एकदा केलेले ‘नॉमिनेशन’ नंतर बदलताही येते, हेही इथे लक्षात घेणे महत्त्वाचे.
’सीए’/कर सल्लागार
’सीए’कडून बँकांमध्ये असलेल्या खात्यांची माहिती मिळू शकते. तसेच प्राप्तिकर ’रिटर्न’मध्ये असलेला उत्पन्नाचा स्रोतही ‘सीए’कडून समजू शकतो.|
आयटीआर-‘इन्कम टॅक्स रिटर्न’
आयकर खात्याच्या ‘पोर्टल’वर मृत व्यक्तीने ‘फाईल’ केलेला ‘इन्कम टॅक्स रिटर्न’ पाहायला मिळतो. याची ‘कॉपी’ काढून घेता येऊ शकते. यातून त्या व्यक्तीचे उत्पन्न किती व उत्पन्नाचे मार्ग काय होते, याची माहितीही मिळू शकते. पण, यासाठी मृत व्यक्तीचा पॅन क्रमांक माहीत हवा.
‘एआयएस’
‘एआयएस’ अर्थात ’अॅन्युअल इन्फर्मेशन स्टेटमेंट’ यातून बरीच माहिती मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना मिळू शकते. यातून विकत घेतलेली स्थिर संपत्ती, बचत खात्यात जमा होणारे व्याज, मुदत ठेव व इतर गुंतवणूक यांचीही माहिती मिळते. लाभांश, विकत घेतलेले किंवा विकलेले शेअर्स, म्युच्युअल फंड योजनांत गुंतवणूक यांचीही माहिती मिळू शकते. स्थिर संपत्ती विकत घेतलेल्या व्यवहाराचा पत्ता, तारीख, दिलेले पैसे यांचा तपशील ‘एआयएस’मध्ये उपलब्ध असतो. मुदत ठेवीच्या व्याजाबाबत रक्कम, कोणत्या बँकेतून व त्या बँकेचा खाते क्रमांक असा सर्व तपशील मिळतो.
म्युच्युअल फंडांच्या योजनांत गुंतवणूक
यात गुंतवणूक करणार्याच्या मृत्यूनंतर कायदेशीर वारस, ’नॉमिनी’ व संयुक्त गुंतवणूक असेल, तर दुसर्या क्रमांकाच्या गुंतवणूकदार रक्कम मिळण्यासाठी दावेदार ठरू शकतात. जर ही गुंतवणूक ’ट्रान्सफर’ करावयाची असेल, तर ज्याच्या नावे ‘ट्रान्सफर’ करावयाची, त्याचे पॅनकार्ड व सर्व गुंतवणुकीचे ‘फोलिओ’ क्रमांक ही माहिती उपलब्धच हवी. जर दुसर्या क्रमांकाच्या गुंतवणूकदाराला, गुंतवणुकीबाबत माहिती नसेल, तर मृत व्यक्तीच्या ’ई-मेल’वरून, ‘कॉन्सोलिडेटेड अकाऊंट स्टेटमेंट’ तयार करता येते. ‘ई-स्टेटमेंट म्युच्युअल फंडा’तील सर्व गुंतवणुकीची माहिती देते.
‘म्युच्युअल फंड’ गुंतवणूक ‘ट्रान्सफर’ करून घेण्यासाठी मृत व्यक्तीचे पॅनकार्ड, ई-मेलचा पत्ता, मोबाईल क्रमांक, मृत्यूचा दाखला व नात्याचा पुरावा हे ’डॉक्युमेंट्स’ हवेत. म्युच्युअल फंडातील सर्व गुंतवणूक ‘पॅन’शी संलग्न असेल, तर सर्व गुंतवणुकीची माहिती एकदम मिळू शकते. जर सर्व गुंतवणूक ‘पॅन’शी संलग्न नसेल, त्यासाठी यंत्रणेला गुंतवणुकीचा वेगळेपणाने शोध घ्यावा लागतो. म्युच्युअल फंंड यंत्रणा मृत्यूचा दाखला खरा आहे ना? व नात्याचा पुरावा बरोबर आहे, हे सिद्ध झाल्यानंतरच गुंतवणुकीचा शोध सुरू करतात.
शेअर बाजारातील गुंतवणूक
शेअर बाजारातील गुंतवणूक कळण्यासाठी मृत व्यक्तीच्या ‘ब्रोकर’चे नाव व कोणत्या बँकेत ‘डीमॅट’ खाते आहे, याचा तपशील मिळणे गरजेचे असते.‘एआयएस जनरेट’ कसे करावे? मृत व्यक्तीचा ‘पॅन’ वापरून प्राप्तिकर पोर्टलवर ‘लॉग-इन’ करावे. त्यानंतर ‘पासवर्ड ऑप्शन’मध्ये जाऊन तो ‘रिसेट’ करावा. यानंतर मृत व्यक्तीच्या मोबाईलवर ‘ओटीपी’ येईल. त्यानंतर ‘सिस्टीम’मध्ये ‘पासवर्ड’ ‘अपडेट’ करून, ‘लॉग-इन’ करावे. त्यानंतर ‘सर्व्हिसेस’ ऑप्शनमध्ये जाऊन ‘एआयएस’वर क्लिक करावे. त्यानंतर वार्षिक वर्षांनुसार ‘एआयएस डाऊनलोड’ करावे. ‘पॅन’ व जन्मतारीख यांचा पासवर्ड म्हणून वापर करावा.
‘एआयएस’मध्ये काय माहिती मिळते? बँकेच्या बचत, रिकरिंग व मुदत ठेव खात्यांतून जमा झालेले व्याज व बँकांचे खाती क्रमांक, अन्य मार्गे मिळालेले व्याज, कोणत्या अन्य मार्गे व्याज मिळाले आहे, त्याचा तपशील, अस्थिर संपत्तीच्या खरेदीचा तपशील, अस्थिर संपत्तीचा पत्ता, तारीख व दिलेले पैसे.म्युच्युअल फंडांतील गुंतवणूक कशी शोधावी? तर मृत व्यक्तीचे ‘पॅन’ व सर्व फोलिओ क्रमांक, ‘नॉमिनी’ किंवा कायदेशीर वारसदाराच्या नावे, म्युच्युअल फंड ट्रान्स्फर करण्याची प्रक्रिया सोपी आहे. मृत व्यक्तीचा ई-मेल व फोन नंबर माहीत असणेही गरजेचे असते. मृत व्यक्तीच्या म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत काहीही माहिती नसेल, तर जवळच्या ‘आरटीए’ शाखेत जाऊन तेथे सर्व प्रक्रिया पूर्ण करून माहिती मिळवावी लागेल.