रशियाविरोधात पाकिस्तानचा वापर

    27-Oct-2022   
Total Views |

पाकिस्तान 
 
 
 
 
नुकतेच पाकिस्तानचे नाव ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून हटवण्यात आले. अर्थात, त्यामागे अमेरिकाच असणार. पण, अमेरिकेने पाकिस्तानची मदत करण्यासारखे नेमके काय घडले? तर आपल्या कुकृत्यांमुळे पाकिस्तान चार वर्षांपासून ‘ग्रे लिस्ट’मध्ये होता आणि दहशतवादाला प्रोत्साहन दिल्यामुळे पाकिस्तानवर अनेक निर्बंधही लादण्यात आले होते. तरीही पाकिस्तान सुधारला नाही, उलट दहशतवाद्यांना पाठिंबा देण्याचे उद्योग त्याने सुरूच ठेवले.
 
 
 
असे असूनही दहशतवाद्यांच्या अर्थपुरवठ्यावर लक्ष ठेवणार्‍या पॅरिसस्थित ‘फायनान्शियल अ‍ॅक्शन टास्क फोर्स’ अर्थात ‘एफएटीएफ’ने ‘ब्लॅक लिस्ट’मध्ये नाव समाविष्ट करण्याइतपत दहशतवादी कारवायांना पाठिंबा देणार्‍या पाकिस्तानचे नाव ‘ग्रे लिस्ट’मधूनही हटवले. कारण, पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने पडद्यामागून हालचाली केल्या. ‘एफएटीएफ’ अमेरिकेच्या इशार्‍यावर चालणारी संस्था वा कठपुतळी असल्याचे इथे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिका ‘एफएटीएफ’ला आपल्या मनाप्रमाणे नियंत्रित करते. अमेरिकेने जर्मनीला ‘एफएटीएफ’ची धमकी देण्यातूनच त्याचा दाखला मिळाला होता. इथेच पाकिस्तानला ‘एफएटीएफ’मधून बाहेर काढण्याचा खेळ अमेरिकेनेच केल्याचे स्पष्ट होते.
 
 
 
पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मधून हटवतानाच ‘एफएटीएफ’ने नुकताच रशियाविरोधातही एक मोठा निर्णय घेतला. तो म्हणजे ‘एफएटीएफ’च्या वर्तमान आणि भविष्यातील वेगवेगळ्या प्रकल्प, योजनांमध्ये रशियाच्या सहभागावर स्थगिती आणली. युक्रेनवरील रशियाच्या आक्रमणामुळे हे पाऊल उचलण्यात आले, असे ‘एफएटीएफ’च्या अध्यक्षांनी आपल्या निर्णयाच्या समर्थनार्थ सांगितले. ‘एफएटीएफ’ने युक्रेनवरील रशियाच्या हल्ल्याचा निषेध करत निर्बंध लावणार असल्याचेही म्हटले. त्यामागेही अमेरिकेचाच हात आहे. सध्या रशिया आणि अमेरिकेतील संबंध कोणत्या पातळीवर आहेत, हे तसे सुपरिचित. रशियाला घेरण्यासाठी युक्रेनचा ‘नाटो’ देशांच्या गटात समावेश करण्यासाठी पुढाकार घेणारी आणि युक्रेनला युद्धाच्या आगीत ढकलून मागे हटणारी अमेरिकाच होती.
 
 
 
नंतर युद्धकाळातही अमेरिकेने ‘पोलीसगिरी’ करण्याचा प्रयत्न केला, पण पुतीनसमोर बायडन काहीही करू शकले नाहीत. अमेरिकेबरोबरचे सर्व देश एकजूट होऊनही रशियाला रोखण्यात अपयशी ठरले. रशियावर आपल्या धमक्यांचा, इशार्‍यांचा काहीही परिणाम होत नसल्याचे स्पष्ट होताच त्याविरोधात ‘एफएटीएफ’ आणि पाकिस्तानच्या दहशतवादी कारखान्यांचा वापर करता येईल, असा विचार अमेरिकेने केला. कारण, वर्तमान परिस्थितीत अमेरिका रशियाविरोधातच सर्वाधिक संतापलेली आहे. म्हणूनच ‘एफएटीएफ’ने रशियावर निर्बंध लावले, तर पाकिस्तानला ‘ग्रे लिस्ट’मधून हटवले.
 
 
 
‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून बाहेर काढण्याबरोबरच अमेरिकेने गेल्या काही काळापासून पाकिस्तानची इतरही अनेक प्रकारे मदत करण्याचे धोरण स्वीकारले आहे. नुकतेच अमेरिकेने पाकिस्तानला ‘एफ-16’ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी 450 दशलक्ष डॉलर्सचे साहाय्य दिले. पाकिस्तान अमेरिकेने दिलेल्या पैशांचा वापर कशासाठी करेल, हे कोणीही सांगू शकेल. सोबतच ‘एफएटीएफ’च्या ‘ग्रे लिस्ट’मधून नाव हटवले गेल्याने पाकिस्तानला बड्या देशांकडे भीक मागणेही सोपे होईल. त्या पैशांचा वापर विधायक कामासाठी कमी आणि दहशतवादाला पोसण्यासाठीच होणार, हेही नक्की आणि अमेरिका त्या दहशतवाद्यांचा वापर रशियाविरोधात करू शकते. दरम्यान, अमेरिका आणि पाकिस्तानमधील वाढती जवळीक संपूर्ण जगासाठी घातक ठरू शकते.
 
 
 
भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी यावरच आपले मत व्यक्त केले होती. पण, अमेरिकेला तसा विचार करायला वेळ मिळाला नाही आणि आता अमेरिकेने रशियाविरोधात वापरण्यासाठी पाकिस्तानला थेट ‘ग्रे लिस्ट’मधूनच बाहेर काढले.
एकीकडे पाकिस्तानला असा दिलासा देताना, दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी पाकिस्तान हा जगातील सर्वात धोकादायक देश आहे, असेही विधान केले. त्यामुळे अमेरिकेच्या पोटात एक आणि ओठावर दुसरे, हेच पुन्हा एकदा सिद्ध झाले. पण, ‘ग्रे लिस्ट’मधून पाकला हटविल्यामुळे दहशतवादाचा भस्मासुर मोठा होईल आणि एक दिवस लादेनसारखा तो आपल्यावरही उलटू शकतो, याचे अमेरिकेला यदाकदाचित विस्मरण झाले असेल तर ते महागातच पडेल!
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

महेश पुराणिक

मूळचे नगर जिल्ह्यातील. नगरमधील न्यू आर्टस् कॉलेजच्या संज्ञापन अभ्यास विभागातून मास्टर इन कम्युनिकेशन स्टडीज ही पदव्युत्तर पदवी. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये मुख्य उपसंपादक(वृत्त) पदावर कार्यरत.