नवी दिल्ली : ब्रिटनचे नवनिर्वाचित पंतप्रधान ऋषी सुनक यांनी पंतप्रधान पदाची सूत्रे हाती घेतली. ४२ वर्षीय सुनक हे ब्रिटनचे पहिले हिंदू आणि सर्वात तरुण पंतप्रधान ठरले आहेत. सूत्रे हातात घेताच अत्यंत कठीण परिस्थितीतून जाणाऱ्या अर्थव्यवस्थेला सावरण्याचे काम आपल्या करायचे आहे असे लगेचच ऋषी यांनी सांगितले. ब्रिटनचे राजे किंग चार्ल्स यांची प्रथेप्रमाणे बकिंगहॅम पॅलेसमध्ये जाऊन ऋषी यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीनंतर ब्रिटनच्या पंतप्रधानांचे सरकारी निवासस्थान असणाऱ्या १० डाउनिंग स्ट्रीट येथे त्यांनी आपले राष्ट्राला उद्देशून भाषण केले. यात त्यांनी देशापुढील आव्हानांचा उल्लेख केला.
"अर्थव्यवस्था एका गंभीर संकटातून जात आहे, रशिया - युक्रेन युद्ध, महागाई यांमुळे ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर मोठी आपत्ती कोसळली आहे हे आधी आपण लक्षात घेतले पाहिजे" अशा शब्दांत ऋषी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. देशाला या संकटातून बाहेर काढण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करावे लागतील असेही ते म्हणाले. आता फक्त बोलायची वेळ नाही तर करून दाखवण्याची वेळ आहे तेव्हा झटून कामाला लागू असे सांगून ऋषी सुनक यांनी देशवासियांना देशासमोरची आव्हाने आणि त्याविरोधात कसे लढायचे आहे याची दिशा स्पष्ट केली.
ऋषी यांचे आजोबा रामदास सुनक यांनी १९३५च्या सुमारास नोकरी निमित्ताने पंजाबमधून नैरोबी गाठले होते. त्यानंतर १९६०च्या दशकात आफ्रिकेतील अस्थिर परिस्थितीमुळे लंडनला स्थायिक झाले होते. ऋषी यांचा जन्म १९८० मध्ये झाला. ऋषी यांनी अर्थशास्त्रांतील अनेक मोठ्या पदव्या असून स्टॅनफोर्ड विद्यापीठात ते शिकत असताना त्यांची भेट भारतातील प्रसिद्ध उद्योजक नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता हिच्याशी झाली त्याचेच पुढे लग्नात रूपांतर झाले. कोरोना सारख्या गंभीर संकटाच्या काळात ऋषी यांनी ब्रिटनची अर्थव्यवस्था सांभाळली होती. त्यामुळे आता ऋषी यांच्याकडून मोठ्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत.