पेण : तालुक्याची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत असून वनवासी दुर्गम भागही मोठ्या प्रमाणात आहे. येथील नागरिकांना पेण उपजिल्हा रुग्णालयाचा मोठा आधार आहे. दिवसाला शेकडो रुग्ण याठिकाणी उपचारासाठी येतात. मात्र, रुग्णालयातील अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांची हेळसांड होते. परिसरात कचर्याच्या साम्राज्यामुळे पसरणार्या दुर्गंधी आणि घाणीमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
उपजिल्हा रुग्णालयात जवळपास 35 खोल्या आणि दोन विभाग आहेत. रुग्णालय परिसर मोठा असून केवळ एकाच सफाई कर्मचार्याची जागा भरली आहे. कंत्राटी पद्धतीत तीन कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी दोन सफाई कामगार आहेत. रुग्णालयाचा अवाका, रुग्णांची रोजची वर्दळ, आजूबाजूचा परिसर पाहता दोनच सफाई कर्मचारी कार्यरत असल्याने येथील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. रुग्णालयातील अंतर्गत साफसफाई होत असली, तरी आवारासह आजूबाजूच्या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून रुग्णालयाची साफसफाई दररोज होणे गरजेचे असून याकडे शासनाने तत्काळ लक्ष द्यावे, अशी मागणी रुग्णांसह सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी केली आहे.
सध्या उपजिल्हा रुग्णालयात कक्षसेवक म्हणून पाच पदे मंजूर आहेत. त्यापैकी एक पद रिक्त आहे. सफाई कामगारांचे एक पद रिक्त आहे. शस्त्रक्रिया विभागातील परीक्षकांचे एक पद रिक्त आहे. बाह्य रुग्णसेवक म्हणून 2009 रोजी मंजूर झालेले पद अद्याप भरण्यात आलेले नाही. जवळपास 13 वर्षे होत आली, तरी पदे रिक्त असल्याने आरोग्य खात्याचा भोंगळ कारभार उघड होत आहे.
अपुर्या सोईसुविधांमुळे रुग्णांची गैरसोय
पेण उपजिल्हा रुग्णालयामध्ये पुरुष, महिलांसाठी स्वतंत्र विभाग, प्रसूती विभाग, ‘आयपीडी’, प्रयोगशाळा, एक्स-रे विभाग, ‘आयटीसी’ विभाग, औषध विभाग, ’आयुष’ कक्ष, ’आरबीएसके 1-2’, आश्रमशाळा वैद्यकीय पथक, दंतचिकित्सा कक्ष, नेत्रचिकित्सा कक्ष, टीबी विभाग, इंजेक्शन विभाग असे विभाग असून रुग्णालयात दिवसाला साधारणपणे 250 ते 300 रुग्णांची तपासणी केली जाते. यात शहराबरोबरच तालुक्यातील ग्रामीण भागातून 100 ते 150 नागरिक उपचारासाठी येतात. मात्र, अपुर्या औषधपुरवठा व विविध सुविधा उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होते.
अतिरिक्त पदांसाठी वरिष्ठांकडे पत्रव्यवहार
पेण उपजिल्हा रुग्णालयात काही पदे रिक्त आहेत. याबाबत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. लवकरच ती पदे भरण्यात येतील. रुग्णालयाच्या अंतर्गत नेहमीच स्वच्छता होते. मात्र, मनुष्यबळाअभावी रुग्णालय परिसरात कचर्याचे ढीग साचलेले दिसतात. नगरपालिकेचे दोन सफाई कर्मचारी रुग्णालयासाठी मिळावेत, याकरिता पेण नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांकडे पत्राद्वारे मागणी करणार आहोत.
-पांडुरंग गाडे, साहाय्यता अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, पेण
मनुष्यबळाअभावी स्वच्छतेचा अभाव
पेण उपजिल्हा रुग्णालयात पाच-सहा वर्षांपूर्वी क्षितीज बेरोजगार संस्था या नावाने ठेका होता. यामध्ये पाच कर्मचारी काम करत होते. दररोज दोन-तीन वेळा साफसफाई व्हायची. मात्र, आता कामाची व्याप्ती पाहता मनुष्यबळ कमी असल्याने रुग्णालयासह परिसरात स्वच्छतेचा अभाव जाणवतो.
- भरत साळवी, संचालक, क्षितीज बेरोजगार संस्था.