नवी दिल्ली : ब्रिटनध्ये अल्पसंख्य समुदायातील व्यक्ती पंतप्रधान झाल्याचे कौतुक करणाऱ्या महेबूबा मुफ्ती जम्मू – काश्मीरमध्येही अल्पसंख्यांक व्यक्ती मुख्यमंत्री झालेला स्विकारतील का, असा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी विचारला आहे.
ब्रिटनमध्ये ऋषी सुनक यांच्या रुपात पहिला हिंदू व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाला आहे. त्याविषयी जम्मू – काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीप्रमुख महेबूबा मुफ्ती यांनी भारतामध्ये मात्र सीएए आणि एनआरसीसारखे विभाजनवादी व भेदभाव करणारे कायदे लागू असल्याचे ट्विट केले. त्यास भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी प्रत्युत्तर दिले.
ते म्हणाले, ऋषी सुनक यांची यूकेचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर भारतातील अल्पसंख्याकांच्या हक्कांवर भाष्य करणारे महबूबा मुफ्ती यांचे ट्विट पाहिले. मात्र, जम्मू – काश्मीरच्या मुख्यमंत्रीपदी अल्पसंख्य समाजातील व्यक्तीस स्विकारणार का, याचे त्यांनी उत्तर द्यावे. ऋषी सुनक यांची युकेचे पंतप्रधान म्हणून निवड झाल्यानंतर काही नेते बहुसंख्यवादाच्या विरोधात सक्रिय झाले आहेत. मात्र, भारतामध्ये डॉ. एपीजे अब्दुल कलाम हे राष्ट्रपती होते, डॉ. मनमोहन सिंग हे दहा वर्षे पंतप्रधान होते, सध्या वनवासी नेत्या द्रौपदी मुर्मू या विद्यमान राष्ट्रपती आहे, हे विसरू नये. त्यामुळे भारतीय वंशाचे सक्षम नेते ऋषी सुनक युकेचे पंतप्रधान होत आहेत. या अभूतपूर्व यशाबद्दल आपण सर्वांनी त्याचे कौतुक केले पाहिजे. दुर्दैवाने काही भारतीय राजकारणी यानिमित्ताने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत, ही शोकांतिका आहे असल्याचेही रविशंकर प्रसाद यांनी म्हटले आहे.