‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’ हे डोंबिवलीतील एक प्रसिद्ध कथ्थक नृत्यालय. हे आता ‘इंटरनॅशनल डान्स कौन्सिल’, फ्रान्स (सीआयडी) चे ही अधिकृत सभासद आहे. याचा सर्वच डोंबिवलीकरांना अभिमान आहे. अशा या संस्थेचा कार्यपरिचय...
एकलव्य आर्ट फाऊंडेशन’चे रोपटे कथ्थक विशारद अॅड. सुनिला पोतदार यांनी लावले होते. सुनिला पोतदार या गुरूवर्या नृत्यालंकार संगीताचार्य वैशाली दुधे यांच्या विद्यार्थिनी आहेत. सुनिला यांनी नालंदा महाविद्यालय, विलेपालेर्र् येथून कथ्थकचे एक वर्ष प्रशिक्षण तर भारत विद्यालय महाकवी कुलगुरू कलिदास विद्यापीठ येथून कथ्थक मध्येच ‘एम.ए’ प्रथम श्रेणीत पूर्ण करून आता डॉ. संध्या पुरे यांच्या मार्गदर्शनाखाली त्या कथ्थक नृत्यातच संशोधन करीत आहेत.
‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’च्या विद्यार्थिनींनी ‘ईआयसीडी’, ‘आयआयडीएफ पुणे’, ‘रंगमंच प्रतिष्ठान पुणे’, ‘मराठा मंदिर कला केंद्र-मुंबई’, ‘नृत्य झंकार डोंबिवली’, ‘कलांजली ठाणे’, ‘डोंबिवली जिमखाना सांस्कृतिक स्पर्धा’, ‘सूर-चैतन्य कला केंद्र चेंबूर’, ‘संगीत मिलॉन मुंबई’ व ‘लखनौ, स्वर साधना मुंबई’, ‘मुंबई युथ फेस्टीवल’, ‘आय.ई.एस. कला विकास कलानुभूती-पुणे’, ‘नृत्याजंली’, ‘यशराज कलामंच- बालझुंबड’, ‘सेंट झेव्हियर्स कॉलेज कॉन्फरस’ येथील कथ्थक या एकल तसेच समूह सादरीकरणासाठी पारितोषिके पटकाविली आहेत. कथ्थकमधील पारितोषिकांचे श्रेय ‘एकलव्य’च्या मेहनतीबरोबरच ‘एकलव्य’चे साथीदार परेश शेंबेकर, अतुल फडके, तन्वी गोरे, ओंकार धामणकर यांच्या मोलाच्या मार्गदर्शनालाही जाते.
नृत्यातील व्यावसायिक व सामाजिक कार्याबरोबरच अध्यात्मिक मार्ग हाही ‘एकलव्य’चा अजून एक महत्त्वाचा पैलू.
2018 मध्ये शिर्डी येथील साई समाधी शताब्दी सोहळ्यात सादर केलेली दत्तवंदना, रत्नागिरी येथील गोकुळाष्टमी उत्सवामध्ये सादर केलेले मथुरागमन, अक्कलकोट येथील स्वामी समर्थ मठात सादर केलेली स्वामी स्वरूपानंद मठातील जन्मोत्सव नृत्य, काटई येथील दत्त मंदिरातील संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या उपस्थितीतील प्रभू श्रीपाद यांच्या चरणी अर्पण केलेली नृत्य सेवा, ‘पीठापूर श्रीपाद श्रीवल्लभ’ संस्थान आयोजित श्रीपाद श्रीवल्लभ जयंती उत्सवानिमित्त ‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’ कथ्थक नृत्य संस्था डोंबिवलीकडून नृत्य ‘पुष्प इस्कॉन मुंबई’ हे सारे म्हणजे सुनिला यांच्या नृत्य दिग्दर्शनाच्या कलाविष्काराचे अनोखे नैवेद्यच होते असे म्हणावे लागेल. या सगळ्यावर कळस म्हणजे ऑगस्ट 2019 मध्ये पार पडलेला डोंबिवली येथील संत मीराबाई यांच्या जीवनावरील नृत्यपट. ‘रोटरी क्लब डोंबिवली’ आयोजित संजना ठाकूर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या व त्यांच्या स्वत:च्या व अनुप जलोटा यांनी सुरांकित केलेल्या ‘कृष्णाप्रिया’ या मीरेचा कृष्णाच्या शोधाचा सुंदर प्रवास उलगडून दाखवणार्या या नृत्य नाटिकेसाठीच्या नृत्य दिग्दर्शनाची काही बाजू सुनिला यांनी सांभाळली व ‘एकलव्य’च्या चमुने उत्तमरित्या सादरीकरण करीत ‘रोटरी’च्या या कार्यक्रमाच्या निधी संकलनातून 11 लहान गरजू विद्यार्थ्यांवर मोफत हृदयशस्त्रक्रिया करण्याच्या उदात्त हेतूमध्ये खारीचा वाटा उचलला.
डोंबिवली जिमखाना आयोजित उत्सव, कडोंमपाच्या वनराई महोत्सव, नृत्यातून निसर्ग संरक्षण हेतू सादरीकरण केले. कडोंमपाच्या महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरण सोहळा आणि अभिव्यक्तीच्या गीतरामायणात सहभाग घेतला होता. 2019 मध्ये डोंबिवली येथे झालेल्या श्रावणक्वीन सोहळा, मराठी साहित्य संमेलन डोंबिवली, महाराष्ट्र मंडळ गणोशोत्सव नवी दिल्ली येथील सलग चार दिवस नृत्य सहभाग दशर्विला होता. मार्च 2018 मध्ये महिला दिनानिमित्त दौंड येथे सादरीकरणासाठी विषय निवडताना ही सुनिला यांनी पुन्हा त्यांच्या ‘नृत्यातून प्रबोधन’ याच हेतूला सार्थ ठरवीत ‘शूभसूर क्रिएशन्स’च्या ‘पंचकन्या’ या अल्बमवर काम केले व आता त्याच गुणी चमूबरोबर ‘शूभसूर क्रीएशन्स’ व स्वरस्नेह सांगीतिक स्मृती प्रस्तुत या पुराणातील अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा मंदोदरी या पाच ही महान स्त्रियांचा इतिहास पुनरुज्जीवित करण्याचे काम वाशी येथील साहित्य मंदिर सभागृह येथे 8 फेब्रुवारी रोजी केले.
‘संस्कार भारती’ डोंबिवली यांच्या एका होळीनिमित्तच्या कार्यक्रमात लाल रंग हा विषय दिल्यावर लहान, अल्लड मुलांच्या आयुष्यातील तो लाल रंग म्हणजे केवळ रंगपंचमीतील उधळण करणारा तर षोड्शेच्या मनातील हा लाल रंग म्हणजे श्रृंगार, लज्जा, शरम, गालावरची लाली तर हाच लाल रंग एकाद्या हुतात्मा जवानाच्या पत्नीसाठी त्याच्या शरीरावरील भळाळणारे रक्त आणि त्यांच्या प्राणप्रिय देशप्रेमाच्या तिच्या कपाळावरील तिलक बनतो ही संकल्पना म्हणजे सुनिला यांनी उभे केलेले एक अनोखे भावविश्व. संस्कृतभारतीडोंबिवली यांच्या सुमारे एक हजार विद्यार्थ्यांच्या सामूहिक गीतापठण सोहोळ्यात कथ्थकमधून गीताउपदेश साधीत ‘एकलव्य’ने प्रेक्षकांच्या मनात हक्काचे स्थान मिळवले.
‘मुंबई युथ फेस्टिवल 2022’ च्या शास्त्रीय नृत्य स्पर्धेतील प्रथम क्रमांकासह सुवर्ण पदक आणि कथ्थक नृत्यासाठीचा मानाचा पुरस्कार म्हणजे ‘मेनका पुरस्कार 2022’ ची मानकरी ठरलेली ‘एकलव्य’ची ज्येष्ठ विद्यार्थीनी कथ्थक विशारद समृद्धी चव्हाण कथ्थकबद्दलची तिची निष्ठा कायम ठेवीत आहे. ‘एकलव्य’चा गेली 22 वर्ष हा नृत्य प्रवास मनोरंजनातून समाजसेवा, समाजप्रबोधन, संस्कार घडवीत 700 च्या वर कार्यक्रम करीत भारत तसेच भारताबाहेर ही अविरत सुरू आहे. अ.भा.सां.सं पुणे - ‘युनोस्को सर्टिफाईड’कडून संस्थेच्या गुरू म्हणून सुनिला पोतदार यांचा सत्कार तसेच त्याच संस्थेच्या दुबई येथील सोहळ्यात ‘एकलव्य’ची विद्यार्थींनी अवनी पटवर्धन हिने चांदीचे तसेच श्रेणी सुवारे हिने कांस्यपदक तर स्वत: सुनिला यांनी खुल्या गटात कांस्यपदक प्राप्त करून डोंबिवलीची पताका उंच फडकविली आहे. पण ‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’च्या कष्टांचे खर्या अर्थाने चीज झाले. तेव्हा जुलै 2022 मध्ये ‘कालीपीठ’ संस्थान यांनी पावन नगरी अयोध्या येथे आयोजित केलेल्या सोहळ्यात माजी राज्यपाल राम नाईक, कीर्तन महामेरू चारूदत्त आफळे बुवा यांच्या उपस्थितीत श्रीधर फडके यांच्या सुवर्ण स्वरातील गीत रामायणातील काही निवडक नृत्य प्रस्तुतीसाठी संधी मिळून तेथील ‘अयोध्या डायरी’ या मासिकाच्या वार्ताहाराने त्यांची नोंद केली.
गेली 22 वर्ष ‘एकलव्य आर्ट फाऊंडेशन’च्या विद्यार्थिनीची अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मिरज तसेच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे या दोन्ही मंडळांच्या परिक्षांची पूर्ण तयारी व आतापर्यंतचा या परीक्षांच्या निकालाच्या उज्जवल यशाचा प्रवास विशेष प्रावीण्य व प्रथम श्रेणीसह अविरत सुरू आहे. डॉ. प्रकाश बाबा आमटे यांच्यासारख्या अवलियालाने सुद्धा सुनिला पोतदार यांची पाठ थोपटली जेव्हा 25 जणांच्या ‘एकलव्य’च्याचमूने डिसेंबर 2018 मध्ये थेट त्यांच्या हेमलकसा येथील ‘लोकबिरादरी प्रकल्पा’ला प्रत्यक्ष भेट दिली. दोन ते अडीच तासांच्या मनोरंजनातून प्रबोधनाचा निशुल्क कार्यक्रम सादर करीत वाहवा मिळविली. याशिवाय अ.भा.सां.सं पुणे यांच्या राष्ट्रीय पातळीवरील नृत्य स्पर्धामध्ये ‘एकलव्य’ने आतापर्यंत दरवर्षी किमान 25 तरी पारितोषिकांवर आपले नाव कोरण्याचा जणू संकल्पच केला आहे.
या प्रवासात ‘एकलव्य’च्या विद्याथीर्नी समृद्धी चव्हाण, विशाखा सडेकर, अवनी पटवर्धन, श्रेणी सुवारे, सायली कोरडे, श्रुती चाळके, आर्या दास, स्वाती कोरडे, रश्मी दास, मंजिरी थत्ते, रश्मी परब, नीला मोरे, वैष्णवी सोनगिरे, कलाश्री कडू या चमूची अमूल्य साथ सुनिला यांना नेहमी मिळतेच. पण मधुकर चक्रदेव, माधव जोशी, सुधीर जोगळेकर, प्रवीण दुधे, दिपाली काळे, लधवा, अमरेंद्र पटवर्धन, संदीप वैद्य, सुशील भावे, मकरंद वैशंपायन, वैशाली वैशंपायन इत्यादी मंडळीच्या पांठिब्यामुळे व कौतुकाची थाप ही खूप सारे बळ देऊन जाते, असे सुनिला यांना वाटते. ‘एकलव्य’चा हा शून्यातून आरंभिलेला मेहनतीचा नृत्य प्रयास आज प्रत्येक डोंबिवलीकराच्या मनात प्रेमाचे, विश्वासाचे स्थान निर्माण करू शकत आहे. तो केवळ प्रामाणिक हेतू आणि स्वत:ला सिद्ध करण्याच्या जिद्दीमुळे हे नक्की.