
पंधरा लक्ष दिव्यांनी उजळली अयोध्यानगरी, नवा जागतिक विक्रम प्रस्थापित
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : देशात एकेकाळी प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह लावून भारताच्या समृद्ध वारशास संपविण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र, आज अयोध्यानगरी ही भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरत आहे; अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीयांच्या समृद्ध अध्यात्मिक वारशाचा गौरव अयोध्येतील शरयूतीरावर रविवारी केला.
उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी आल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येमध्ये दिवाळीत दिपोत्सव साजरा करण्यास प्रारंभ केला आहे. यंदाच्या वर्षी सहावा दीपोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे आदी उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वप्रथम प्रभू रामलला यांचे दर्शन घेतले, त्यानंतर श्रीरामजन्मभूमीस्थळी साकारणाऱ्या भव्य श्रीराम मंदिराच्या उभारणीचा आढावा घेऊन श्रीराम राज्याभिषेक सोहळ्यामध्ये सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले, देशात एकेकाळी प्रभू श्रीराम, आमची देदीप्यमान संस्कृती याविषयी बोलणे टाळले जात असे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. त्यामुळे भारताचा धार्मिक आणि सांस्कृतिक गौरव असलेली शहरे आपसूकच दुर्लक्षित होऊ लागली. मात्र, गेल्या आठ वर्षांमध्ये या गौरवस्थानांना पुनर्जिवित करण्याचे धोरण राबविण्यात आले. परिणाम आज अयोध्यानगरी भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाच्या सुवर्णाध्यायाचे प्रतिक ठरली आहे. अयोध्यानगरी आज दिव्यांनी दिव्य आणि भावनांनी भव्य अशी झाली आहे. सध्याच्या पिढीस त्रेतायुगातील प्रभू श्रीरामचंद्रांचे स्वागत करणारी अयोध्या पाहता आली नाही, मात्र आज भारताच्या अमृतकालातील ‘अमर अयोध्या’ बघण्याची संधी मिळत असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
पर्व आणि उत्सव हे भारतीय समाजाचा अविभाज्य भाग असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, जेव्हा जेव्हा भारतीय समाज काहीतरी नवे करतो, त्या त्या वेळी समाजाने नवा उत्सव रचला आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी हजारो वर्षांपूर्वी रावणरूपी अत्याचाराचा अंत केला होता आणि सदाचाराची स्थापना केली होती. त्याची आठवण म्हणून आज तेवणारे दिवे हे भारताचे आदर्श, मूल्य आणि दर्शनाचे उर्जापूंज आहेत. दिव्यांचा हा अध्यात्मिक प्रकाश भारताच्या प्रगतीसाठी मार्गदर्शक ठरत आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतकाळात साजरी होणारी यंदाच्या दिवाळीमध्ये भारतीयांनी प्रभू श्रीरामचंद्रांच्या संकल्पशक्तीस आत्मसात करण्याची गरज आहे. त्यामुळे साध्य होणारा सांस्कृतिक उत्कर्ष हा नवभारताचे प्रतिक ठरेल, असाही विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.
अयोध्या १३५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करते – योगी आदित्यनाथ
देशात काही काळापूर्वी कुत्सित राजकारणासाठी अयोध्यानगरीस ओसाड बनविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, ज्या अयोध्येमध्ये साक्षात प्रभू श्रीरामाचे वास्तव्य आहे; ती नेहमीच देदीप्यमान राहिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वर्षांपूर्वी अयोध्येमध्ये दीपोत्ववास प्रारंभ झाला, त्यानंतर दरवर्षी दीपोत्सवाने नवे विक्रम रचले असून आज अयोध्येचा ‘दीपोत्सव’ हा ‘राष्ट्रोत्सव’ झाला असल्याचे मत प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केले.
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, प्रभू श्रीरामाच्या आदर्शांना प्रमाण मानून त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी वाटचाल करत आहेत. त्यामुळेच आज अयोध्या हे आज १३५ कोटी भारतीयांचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्र बनले आहे. श्रीराम जन्मभूमीवर तब्बल पाचशे वर्षांच्या प्रतिक्षेनंतर भव्य श्रीराम मंदिराची उभारणी होत आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी यांची इच्छाशक्ती अतिशय महत्त्वाची ठरल्याचेही प्रतिपादन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले आहे.
कर्तव्यांच्या पालनाद्वारेच साकारणार रामराज्य
प्रभू श्रीरामचंद्र हे कर्तव्याचे सजीव स्वरुप असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. भारतीय संविधानाचया मूळ प्रतीवर श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांचे चित्र आहे. याच घटनेने आपल्याला मुलभूत अधिकार प्रदान केले आहेत. म्हणजेच अधिकारांची शाश्वती आहे, त्यासोबतच श्रीरामांच्या रूपात कर्तव्यांचीही जाणीव करून दिली आहे. त्यामुळे रामराज्य साकारायचे असल्याचे कर्तव्यांना विसरून चालणार नसल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.
नवा विश्वविक्रम प्रस्थापित
अयोध्येच्या शरयूतीरावरी ‘राम की पैडी’ येथे घाटाच्या दोन्ही बाजुंवर डोळ्यांचे पारणे फेडणारा दीपोत्सव साजरा झाला. त्याचा प्रारंभ पंतप्रधानांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने झाला, यावेळी तब्बल १५ लक्ष ७६ हजार दिवे तेवत होते. याद्वारे अयोध्येने नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला असून त्याविषयीचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’चे प्रमाणपत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना प्रदान करण्यात आले.
डोळ्यांचे पारणे फेडणारा लेझर शो, आतषबाजी आणि लतादिदींना आदरांजली
दीपोत्सवामध्ये डोळ्यांचे पारणे फेडणारा लेझर शो आणि आतषबाजी आयोजित करण्यात आला होता. लेझर शोच्या माध्यमातून संगीताने सजलेली राम कथा सादर करण्यात आली. यानंतर लता मंगेशकर यांचे 'ठुमक चालत रामचंद्र' हे गीत सादर करून गानकोकीळेस श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर ‘रघुपती राघव राजाराम’ आणि गायक उदित नारायण यांच्या आवाजातील ‘मंगल भवन अमंगल हरी’ ही गीते सादर करण्यात आली. यावेळी उपस्थित नागरिकांसह पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील मंत्रमुग्ध झाले होते.