मुंबई : सा. विवेक दीपावली विशेषांकाचे गुरुवार दि. २१ आॅक्टोबर रोजी ज्येष्ठ कवी व ललित साहित्यिक प्रवीण दवणे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. सा. विवेकच्या सानपाडा कार्यालयात छोटेखानी व अनौपचारिक स्वरूपात हा प्रकाशन कार्यक्रम करण्यात आला. यावेळी हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष रमेश पतंगे व विवेक समूहाचे प्रबंध संपादक दिलीप करंबेळकर यांची विशेष उपस्थिती होती.
महाविद्यालयीन काळात सा. विवेकने आपल्या ललितलेखांचे सदर प्रकाशित केल्याने आपला साहित्यिक प्रवास योग्य दिशेने झाल्याचे प्रतिपादन प्रवीण दवणे यांनी यावेळी केले. तसेच त्याबद्दल त्यांनी विवेक विषयी कृतज्ञता व्यक्त केली. दिवाळी अंक आणि नियतकालिकांनी आजच्या तरुण वर्गाला केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यामध्ये वाचनसंस्कृती वाढवण्याच्या दृष्टीने काम करावे असेही त्यांनी यावेळी म्हटले.
दिलीप करंबेळकर यांनी सा. विवेकची गेल्या ७५ वर्षांची वाटचाल आपल्या प्रास्ताविकात उलगडली. प्रतिकूल वातावरणात हिंदुत्ववादी विचारांची धुरा खांद्यावर घेतली. या विचारांना प्रसारमाध्यमात व्यासपीठ प्रामुख्याने विवेकने उपलब्ध करून दिले. देशातील सध्याच्या बदललेल्या सकारात्मक वातावरणात प्रसारमाध्यम म्हणून विवेकचेही योगदान आहे. आता केवळ विचार देऊन भागणार नाही, तर त्यांना प्रत्यक्ष कृतीत उतरवण्यासाठी पावले उचलण्याची जबाबदारी विवेकवर आहे, असे दिशादर्शन त्यांनी केले.
सा. विवेकच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सा. विवेकचे जाहिरात प्रमुख अजय कोतवडेकर आणि विक्री-वर्गणी विभाग प्रमुख दयानंद शिवशिवकर यांनी दिवाळी अंक निर्मितीतील आपापल्या विभागाचे अनुभवकथन केले. सा. विवेकच्या मुख्य उपसंपादक सपना आचरेकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.