मुंबई : नीरव मोदी हे नाव भारतातील लोक कधीच विसरू शकणार नाहीत. भारतातील सर्वात मोठ्या बँक घोटाळ्याचा सूत्रधार असलेल्या नीरव मोदीची ९०० कोटींहून अधिक मालमत्ता जप्त करण्याचे आदेश शुक्रवारी देण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीच्या विशेष न्यायालायने ईडीला नीरव मोदीच्या ५०० कोटींच्या आणि पंजाब नॅशनल बँकला ४२४ कोटींच्या मालमत्तांवर टाच आणण्यासाठी मंजुरी दिली आहे. या मालमत्ता आता जप्त केल्या जातील. यातून नीरव मोदीच्या ९ मालमत्ता जप्त केल्या जाणार आहेत. नीरव मोदीला पंजाब नॅशनल बँक खटल्यात दोषी ठरवण्यात आले असून फ्युजिटिव्ह इकॉनॉमिक ऑफेंडर्स ऍक्ट २०१८ अंतर्गत फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून दोषी ठरवले गेले आहे.
तब्बल १४ हजार ५०० कोटींच्या कर्जबुडवीचा आरोप नीरव मोदीवर आहे. या गुन्ह्यात त्याचा मामा मेहुल चोक्सी हाही गुन्हेगार आहे. दोघांनाही फरार म्हणून घोषित केले आहे. फरार झाल्याचा काही महिन्यानंतर नीरव लंडन मध्ये आढळून आला होता, तेव्हापासून त्याच्या भारतात प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरु आहे. भारत सरकारनेही या प्रकरणी लक्ष घातले असून हे प्रत्यार्पण लवकरात लवकर व्हावे यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. फेब्रुवारीमध्ये ब्रिटनच्या वेस्टमिन्स्टर कोर्टाने नीरवच्या भारतात प्रत्यार्पणास मंजुरी दिली होती. पण नीरवने या विरोधात लंडनच्या उच्च न्यायालयात अपील केले आहे. त्यावर निकाल येणे सध्या बाकी आहे.