श्रीकृष्णाने बळीचा वध केल्यानंतरही खेडोपाड्यात स्त्रिया बळीची प्रार्थना का करतात?

    21-Oct-2022   
Total Views | 144
 

BALIPRATIPADA
 
 
विक्रम संवत्सरानुसार आजच्या दिवशी नववर्ष साजरे केले जाते. बलिप्रतिपदेचा मुहूर्त हा महत्वाच्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा शुभ मुहूर्त मानला गेला आहे. दिवाळी पाडव्याच्या म्हणजेच बलिप्रतिपदेच्या दिवशी भल्या पहाटे घरातील केराचा बळी काढून जुन्या केरसुणीसोबत सारा कचरा एक दिवा लावून गावाच्या वेशीबाहेर नेऊन ठेवला जातो. त्यानंतर नारळाच्या क्षीरात सुगंधी उटणे भिजवून स्नान केले जाते.
 
 
बळीच्या कथेचा सर्वात प्राचीन उल्लेख पाणिनीच्या अष्टाध्यायी ग्रंथात आढळून येतो. या प्रथेचे संदर्भ पुराणकथा रामायण आणि महाभारतात सुद्धा आढळून येतात. तसेच बळीच्या राज्याचा उल्लेख ब्रह्म पुराण, मत्स्य पुराण आणि कूर्म पुराणात सुद्धा आढळून येतात. महाबलीचा पराभव विष्णूच्या दशावतारातील वामन अवताराने केला आहे. वामनाने फक्त ३ पावलांत चाल करून बळीचा वध केला. बळी राजा हा विष्णू भक्त होता. त्यामुळेच मृत्यूपूर्वी त्याने विष्णूकडे एक वरदान मागितले. ज्यामुळे वर्षातून एकदा जेव्हा त्याचे स्मरण केले जाईल त्यादिवशी त्याला पृथ्वीवर पुन्हा अवतारायची अनुमती मिळाली.
बळीचा वध का करण्यात आला असावा? आणि तरीही खेड्या पाड्यांतून स्त्रिया पुन्हा बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना का करतात? तर बळी हा अनाठायी औदार्य दाखवल्याने मारला गेला अशी मान्यता आहे. विष्णूने बटु वामनाचे रूप घेऊन ३ हात जागा बळीकडून मागून घेतली आणि बळीचा वध केला असे सांगितले गेले आहे. वधानंतर बळीला पाताळाचे राज्य देऊन विष्णूने बळीच्या द्वारपालाची भूमिका स्वीकारली अशीही कथा पुराणात प्रचलित आहे. बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. जनतेची सर्वतोपरी काळजी तो घेत असे म्हणूनच गावा - खेड्यांतून स्त्रिया बळीची प्रार्थना करतात. इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो अशी म्हण म्हणूनच प्रचलित आहे.
 
 
महाराष्ट्रात या दिवशी स्त्रिया पतीचे व घरातील इतर पुरुषांचे औक्षण करतात. नवदांपत्याची दिवाळी या दिवशी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते व जावयाला माहेराहून आहेर केला जातो. तसेच व्यापारी बलिप्रतिपदा हा दिवस नववर्ष म्हणून साजरा करतात. हिशोबाच्या नव्या वह्या आजपासून वापरात काढल्या जातात. तत्पूर्वी त्यांची हळद कुंकू व फुले वाहून पूजा केली जाते.
बलिप्रतिपदेनिमित्त तुमच्याकडे साजरी केली जाणारी वेगळी प्रथा कोणती हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121