नवी दिल्ली : कोरोनाच्या तडाख्याने भारतीय अर्थव्यवस्थेतील रोजगार निर्मिती जवळपास ठप्पच झाली होती. उद्योगधंद्यांचे चक्र ठप्पच झाल्याने अनेक क्षेत्रात कामगार कपातीचे धोरण हातात घेतले गेले होते. फक्त भारतीय अर्थव्यवस्थाच नव्हे तर संपूर्ण जागतिक अर्थव्यवस्थेत अशीच परिस्थिती होती. या कोरोनाच्या तडाख्याला दोन वर्षे उलटून गेल्यानंतर आता भारतीय अर्थव्यवस्था वेगाने पूर्वपदावर येत आहे. उत्पादन, निर्मिती, कृषी, सेवा या सगळ्याच मोठ्या क्षेत्रांत समाधानकारक प्रगती होत असताना आता रोजगार निर्मितीच्या पातळीवरही आनंदाची बातमी आली आहे.
सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या अहवालात सप्टेंबर महिन्यात भारतात बेरोजगारीचा दर ६.४३ टक्कयांपर्यंत खाली घसरल्याचे समोर आले आहे. मागच्याच महिन्यात हा दर ८.३ टक्के इतका होता. "सप्टेंबर महिन्यात देशात बेरोजगारी कमी होऊन रोजगार वाढले आहेत. या महिन्यात ग्रामीण तसेच शहरी भागांत रोजगार वाढून अर्थव्यवस्थेतील त्यांचे योगदान लक्षणीयरित्या वाढले आहे" असे मत या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी नोंदवले आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही अत्यंत महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.
एकट्या सप्टेंबर महिन्यात ग्रामीण भागातील बेरोजगारी ७.६८ टक्क्यांवरून ५.८४ टक्क्यांवर तर शहरी भागांतील बेरोजगारी ९.५७ टक्क्यांवरून ७.७० टक्क्यांवर घसरली आहे. या एकाच महिन्यात तब्बल ८० लाख रोजगार निर्माण झाले आहेत असे या अहवालात म्हटले आहे. रोजगार निर्मितीसाठी भारत सरकारने केलेल्या प्रयत्नांना हे यश मिळत आहे. या रोजगार निर्मितीमध्ये राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, हरयाणा ही राज्ये आघाडीवर आहेत.