आता राम का आठवला?

    19-Oct-2022   
Total Views |

काँग्रेस 
 
 
 
 
काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांच्या नेतृत्वात ‘भारत जोडो’ यात्रा नुकतीच आंध्र प्रदेशात पोहोचली. या यात्रेदरम्यान काँग्रेसी नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये राहुल गांधी यांच्यावर कोण सर्वाधिक कौतुक वर्षाव करेल, कोण हायकमांडला खुश ठेवेल यावरून सध्या एकच चढाओढ दिसून येते. पुढील काही दिवसांत ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात प्रवेश करणार आहे. मग काय लागलीच नानाभाऊ राहुल स्तुतीत मग्न झाले. नाना म्हणतात, “राहुल यांच्या नावाचे आद्याक्षर ‘रा’ असून रामाचेही आद्याक्षर ‘रा’ आहे.”
 
 
आता यातून नानांना नेमके काय सुचवायचे आहे? राहुल गांधी यांची तुलना थेट रामाशी करण्याच्या आधीच जीभ सैल असलेल्या नानांच्या या करंटेपणाला काय म्हणावे? त्याच न्यायाने नालायक, नाटकी या शब्दांचीही आद्यक्षरे नानांशी आम्ही ‘ना’ म्हणून जोडायची का? त्यामुळे नाना जरा दमाने घ्या! पण, राहुल आणि रामाची अशी निर्बुद्ध तुलना करणारे नाना एकटे नाहीत. काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मंत्री परसादी लाल मिना हे तर चक्क रामाच्या लंका मोहिमेची तुलना राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेशी करून मोकळे झाले. मिना म्हणाले की, “राहुल गांधी यांची ही यात्रा ऐतिहासिक आहे. भगवान राम यांनी श्रीलंकेपर्यंत पायी प्रवास केला होता. राहुल गांधी कन्याकुमारी ते काश्मीर असे त्यापेक्षाही जास्त पायी अंतर चालणार आहेत.” म्हणजे, मिना हे तर चालण्याच्या शर्यतीत जणू थेट राहुल गांधी रामापेक्षाही कसे पुढे आहेत, याचा असाच एक असगबद्ध दावा करून मोकळे झाले.
 
 
 म्हणजे रामसेतूचे अस्तित्व नाकारणारी, राम मंदिराला विरोध करणारी, हिंदुत्वाला दहशतवादाचा रंग देणारी काँग्रेस आज एका मर्यादाहीन पुरुषाची तुलना प्रभू श्रीरामांशी करणार असेल, तर हा लाळघोटेपणा जनताही खपवून घेणार नाही, हे लक्षात घ्यावे. त्यामुळे दर दोन महिन्यांनी जात, धर्म, गोत्र बदलणार्‍या राहुल गांधींची काँग्रेस हिंदूंपासून दूर गेलेली नाही आणि आमचा नेता म्हणजे साक्षात भगवानच, असा केविलवाणा आव आणला तरी हिंदू मतदार आता भुलणारे नाहीत. कारण, जे सच्चे रामभक्त आहेत, तेच आज रामाच्या आशीर्वादाने सत्तेत आहेत आणि यापुढेही काँग्रेससारख्या राष्ट्रद्रोही रावणी शक्तीचा ते सर्वार्थाने बीमोड करून विजयी पताका उंच फडकवतील, हे निःसंशय!
 
 
गुजरातमध्ये ’काँग्रेस खोजो’
 
 
 
येत्या काही महिन्यांत होणार्‍या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजरातमध्ये प्रचाराचे फटाके जोरात वाजताना दिसतायत. या प्रचारात नेहमीप्रमाणे भाजपने आघाडी घेतली असून त्या खालोखाल आम आदमी पक्ष मोठ्या आशेने मैदानात उतरला आहे. पण, ‘भारत जोडो’चे यात्रेकरू मात्र गुजरातपासून चार ‘हात’ लांबच! म्हणजे गुजरातसारख्या मोदींच्या राज्यात एरवी लढाई आणि संघर्षाची भाषा करणारा काँग्रेस पक्ष याच राज्यात जवळपास दिसेनासा झालेला दिसतो. त्यातच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा किंचित वळसा घालून गुजरातकडे वळेल, अशी आशा होती. पण, राज्यातील एकूणच काँग्रेसची बिकट परिस्थिती बघता, गुजरात ‘भारत जोडो’ यात्रेच्या नकाशावरच नाही. याचाच अर्थ गुजरातमध्ये आपली डाळ शिजणार नाही, याची काँग्रेसला पूर्ण जाणीव असल्यामुळेच पक्षश्रेष्ठींनी त्या आडवळणाचा रस्ताच नको, अशी भूमिका स्वीकारलेली दिसते. त्यामुळे काँग्रेस पक्ष गुजरातमध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरला तरी तो आधीच पराभूत भावनेने, नाईलाजास्तव उतरेल, हे वेगळे सांगायला नको.
 
 
 
182 आमदारांच्या गुजरात विधानसभेत सध्या भाजपचे 111 आमदार असून काँग्रेस 62 आमदारांसह दुसर्‍या स्थानावर आहे. पण, हार्दिक पटेल यांच्यासह अलीकडच्या काळात अनेक नेत्यांनी काँग्रेसला दिलेली सोडचिठ्ठी, मरगळलेली पक्ष संघटना आणि एकूणच दिल्लीचं गांधीनगरकडे झालेलं दुर्लक्ष यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी आणि निराशेचे वातावरण दिसते. त्यातच आम आदमी पक्षाने केजरीवाल आणि भगवंत मान यांचे वरचे वर दौरे गुजरातमध्ये आयोजित करून एक प्रकारची हवा निर्माण केली. याउलट काँग्रेसच्या गोटात मात्र फार हालचाली नसून शांतताच आहे. कारण, काँग्रेसने आपला सर्व जोर, उरलीसुरली संघटनात्मक ताकद ‘भारत जोडो’ यात्रेत खर्ची घातली. त्यामुळे निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या पक्षाची तयारी शून्यच.
 
 
 
विरोधकांची नेमकी हीच पोकळी ओळखून आम आदमी पक्षाने गुजरातमध्ये प्रचाराचा धडाका लावलेला दिसतो. पण, तेथील आपचे नेते गोपाळ इटालिया यांनी मोदींच्या आईविषयी केलेले विधान वादग्रस्त ठरले. तसेच केजरीवाल, मान हे बाहेरचे असून त्यांचे दिल्ली मॉडेल आणि रेवडी संस्कृतीची भुरळ गुजराती जनतेवर पडलेली दिसत नाही. त्यातच मोदींची प्रतिमा आणि भाजपने बदललेला गुजरातचा चेहरामोहरा पाहता, आप आणि काँग्रेससाठी ही लढाई जिंकणे तसे दुरापास्तच. त्यामुळे एकीकडे ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना गुजरातमध्ये मात्र ‘काँग्रेस खोजो’ म्हणण्याची वेळ आलेली दिसते.
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची