मुंबई: गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने नुकतेच हिमाचल प्रदेशातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. तर गुजरातचा निवडणूक कार्यक्रम अद्याप जाहीर झालेला नाही. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांचे लक्ष आता निवडणूक आयोग गुजरात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर करणार याकडे आहे.
दरम्यान ‘एमआयएम’ने ही गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एमआयएमचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली आहे. याशिवाय गुजरातमधील काही भाजपा खासदार संपर्कात असल्याचाही दावा जलील यांनी केला आहे. पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी म्हणाले की, "आम्ही गुजरात निवडणूक नक्कीच लढणार."
पुढे ते म्हणतात, "आम्ही सर्व राज्यांमध्ये जिथे जिथे आमची ताकद आहे तिथे आम्ही निवडणूक लढणार आहोत. आम्ही गुजरात विधानसभा निवडणूक लढवण्याचा कारण म्हणजे, जेव्हा आम्ही गुजरातला गेलो होतो, तेव्हा तिथल्या महानगरपालिका निवडणुकीचा निकाल हा आमचा मनोबल वाढवणारा होता. केवळ चार-पाच शहरांमध्येच आम्ही ही निवडणूक लढलो होतो आणि आमचे २६ नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर जे ११ अपक्ष उमेदवार होते, जे विविध शहरांमधून आलेले होते, त्यांनाही आमच्या पक्षात प्रवेश केला. आमचे गुजरातचे अध्यक्ष हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत.” त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही तिथे खूप चांगलं काम केलेलं आहे." हे निवडणूक लढवण्यामागचं कारण असल्याच जलील यांनी सांगितलं.