मुंबई(प्रतिनिधी): बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील दोन सिन्हांपैकी एका सिंहाचा सोमवार दि. १७ ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला आहे. 'रवींद्र' नावाचा हा सिंह गेल्या दोन वर्षांपासून आजारी होता. या सिंहाचा अखेर मृत्यू झाला आहे. हा नर सिंह १७ वर्षांचा होता. आता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात एकच मादी सिंह उरला आहे. ही मादी देखील वृद्धापकाळाशी झुंज देत आहे.
कर्नाटकातील बंगळूरूच्या बाणेरघट्टा प्राणी संग्रहालयातून २००९ साली या सिंहाला संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आण्यात आले होते. तेव्हा तो चार वर्षांचा होता. रवींद्र या सिंहाला हाडांच्या आजाराने ग्रासले होते. आता उद्यानात एकच सिंह उरल्यामुळे उद्यानातील सिंह सफारी बंद होण्याची शक्यता आहे. गुजरात मधून दोन सिंहाची जोडी येणार असल्याचे सांगण्यात आले होते. गेल्या महिन्यात २६ सप्टेंबर रोजी महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री सुधीर मुन्गान्तीवर यांनी गुजरातचे वनविभाग राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांच्याशी चर्चा केली होती. त्यावर योग्य कार्यवाही होऊन हे सिंह लवकरच यावेत अशी आशा पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केली आहे.