श्रीमद्भगवद्गीतेच्या उपासिका शुभांगी

    16-Oct-2022   
Total Views |
janhavi
 
 
  
श्रीमद्भगवद्गीतेच्या उपासिका, विविध संस्कृत अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या, शिक्षिका, ‘संस्कृत भारती’च्या ज्ञानयज्ञासाठी काम करणार्‍या शुभांगी पुसाळकर यांच्याविषयी जाणून घेऊया...
 
 
श्रीमद्भगवतद्गीता म्हणजे केवळ हिंदूचा एक पवित्र ग्रंथ आहे, असा अनेकांचा समज आहे. पण त्यात धर्मशिक्षणाव्यतिरिक्तही बरेच काही आहे. ते एक व्यवस्थापनशास्त्र आहे. माणसाने परिपूर्ण कसे जगावे, हे भगवद्गीता आपल्याला शिकवते. गीता म्हणजे सर्वश्रेष्ठ गुरूच. अशा या भगवद्गीतेचा मनापासून, चिकटीने अभ्यास केला, तर माणूस गीतेच्या प्रेमातच पडतो. तिचा उपासक होतो. अशाच गीतेच्या उपासिका शुभांगी सुभाषचंद्र पुसाळकर यांच्याविषयी जाणून घेऊया.
 
 
शुभांगी यांचे पूर्वाश्रमीचे नाव प्रतिभा सुधाकर काटदरे होते. त्यांचे शालेय शिक्षण पुण्यात झाले. लहानपणापासूनच त्यांना विणकाम, शिवणकाम, वाचन, नवनवीन गोष्टी शिकणे आवडते. त्यांचे आजोबा प्रतापगडाच्या भवानी देवीचे वंशपरंपरागत पुजारी होते. सुट्टीमध्ये आजोळी गेल्यावर आजोबा देवीची पूजा करताना देवीला वेगवेगळ्या रुपात पूजत असत, भक्त आणि कलाकार यांचा मिलापच हे त्यांना जाणवत होते. यातून श्रद्धा, तन्मयता, सौंदर्यदृष्टी यांचा संस्कार झाला. शुभांगी यांच्या वडिलांना संस्कृत भाषेची आवड होती. त्यामुळे घरात वेगवेगळी स्तोत्रे, श्लोक याची चर्चा व्हायची, स्तोत्रपठण व्हायचे. या सर्वांतूनच त्यांच्यातही संस्कृतची आवड निर्माण झाली. लग्नानंतर त्या डोंबिवलीत आल्या. सांसारिक जबाबदार्‍या पेलत असताना धामणकर यांच्या ‘अ‍ॅक्युप्रेशर’ केंद्रात त्यांनी ‘अ‍ॅक्युप्रेशर’ उपचार पद्धतीचे प्राथमिक धडे घेतले. तिथेच ‘रेकी’ ही उपचार पद्धतीही त्या शिकल्या. त्यांच्या सेवा केंद्रात त्यांनी पाच ते सहा वर्षे विनामूल्य सेवा दिली. निकम गुरूजींकडून त्यांनी योगाभ्यासाचे धडे घेतले.
 
 
‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चा प्राथमिक आणि प्रगत असे दोन्ही प्रशिक्षणक्रम त्यांनी पूर्ण केले. तेव्हापासून नियमित दररोज त्या योगाभ्यास करीत आहेत. बापट बाईंकडून श्रीसूक्त, रूद्र, सप्तशती अशी अनेक स्तोत्रे त्या शिकल्या. शिवणकाम हे आवडीपुरते मर्यादित न ठेवता त्याला आर्थिक उत्पन्नाचे साधन बनवले. नाशिक येथे ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’तर्फे घेतली जाणारी ‘साहित्यभूषण’ ही परीक्षा त्यांनी दिली व त्यात यश संपादन केले. कर्‍हाडे ब्राह्मणसेवा मंडळ, डोंबिवली या सामाजिक काम करणार्‍या संस्थेत दहा ते बारा वर्ष त्यांनी वेगवेगळ्या जबाबदार्‍या पार पाडल्या. तसेच ब्राह्मण महासंघातही त्यांनी दोन वर्षे कार्य केले. त्यानिमित्ताने त्यांचा अनेक लोकांशी संबंध आला. लोकसंग्रह वाढला.
 
 
‘श्री गोविंदानंद सरस्वती न्यासा’चे संस्थापक परमपूज्य वामन गणेश नवरे गुरुजी यांच्याकडे त्या श्रीमद्भगवद्गीता शिकल्या. हाडाचे शिक्षक असणार्‍या नवरे गुरुजींनी शुद्ध, स्पष्ट उच्चारासह गीता शिकवतानाच नि:स्वार्थता, निरपेक्षता, गीतेविषयी प्रेम यांचे संस्कार केले. त्यांच्यामुळे सगळे गीताध्यायी म्हणजे एक विशाल कुटुंबच झाले. श्रृंगेरी येथे भगवद्गीतेच्या पठण परीक्षेसाठी नवरे गुरुजी स्वत: पहिल्या वर्गाच्या 20 जणांना घेऊन गेले होते. गुरुजींनी सर्वांची तयारी करून घेतली होती. श्रृंगेरी येथील वेद पाठशाळेतील आचार्य सगळ्यांची परीक्षा घेतात. आचार्य श्लोकाची सुरूवात सांगतात. तिथून पुढे ते थांबवेपर्यंत श्लोक म्हणायचे अशा पद्धतीने अधलेमधले श्लोक, अध्याय विचारतात. साधारणपणे दीड ते दोन तास ही परीक्षा चालते. उत्तीर्ण गीताव्रतींना प्रशस्तिपत्रक आणि श्री शंकराचार्यांच्या हस्ते प्रसाद प्राप्त होतो.
 
 
भगवद्गीतेचे 18 अध्याय कंठस्थ केल्यावर श्रृंगेरीची परीक्षा म्हणजे कृतकृत्यतेचा अनुभव असतो. शुभांगी या नवरे गुरुजींच्या तालमीत घडल्यामुळे एक शिक्षक म्हणून जबाबदारीने शिकवण्याबरोबरच विद्यार्थ्यांना गीतेविषयी प्रेम वाटावे, वर्गाला येण्याविषयी ओढ वाटावी, एकमेकांविषयी मैत्री निर्माण व्हावी, यावर त्यांचा कटाक्ष असतो. एक शिक्षक म्हणून जडणघडण होत असताना आतापर्यंत त्यांचे सहा वर्ग पूर्ण झाले. सुमारे 200 विद्यार्थ्यांना भगवद्गीतेची संथा दिली. ज्यांना श्रृंगेरी येथे जाऊन भगवद्गीतापठण परीक्षा देण्याची इच्छा आहे, त्यांना मार्गदर्शन करणे, त्यांची योग्य तयारी करून घेणे ही जबाबदारी शिक्षकांवर असते. परीक्षेसाठी परमुलखात जाताना गीताध्यायींना केवळ परीक्षेवर लक्ष केंद्रित करता यावे, तसेच चिंतामुक्त वातावरण मिळावे म्हणून न्यासाच्या विश्वस्तांनी गीताध्यायींबरोबर शुभांगी यांना पाठवण्याचा निर्णय घेतला. त्या विश्वासाला सार्थ ठरवत अथपासून इतिपर्यंत या सर्व परीक्षेची जबाबदारी त्यांनी घेतली. 18 फेब्रुवारी, 2018 रोजी कुरुक्षेत्र येथे 1800 लोकांसमवेत भगवद्गीतापठणाचा योग आला. त्या वेळेस अन्य गीताव्रतींसह न्यासाच्या वतीने व्यासपीठावर विराजमान होण्याचा मान त्यांना मिळाला. न्यासाच्या 150 गीताव्रतींनी त्यात सहभाग घेतला होता. तो अनुभव विलक्षण असल्याचे शुभांगी सांगतात.
 
 
शुभांगी यांनी ‘संस्कृत भारती’चा दहा दिवसांचा संस्कृत संभाषण वर्ग केला. त्यानंतर ‘गीतासोपानम्’ या चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. अभ्यासक्रम अवघड असतानाही त्यांनी तो जिद्दीने पूर्ण केला. ‘संस्कार भारती’चे वर्ग विनामूल्य चालतात, त्या यज्ञात आपलाही सहभाग असावा, यासाठी पाच ते 14 वयोगटासाठी चालणार्‍या बालकेंद्राची शिक्षिका होण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण घेतले. गेल्या चार वर्षांपासून सहशिक्षिकेबरोबर त्या बालकेंद्र चालवत आहेत. कोरोनासारख्या बिकट परिस्थितीतही त्यांचा हा ‘संस्कार भारती’चा ज्ञानयज्ञ थांबला नाही. या संपूर्ण प्रवासात त्यांना त्यांच्या कुटुंबीयांकडून प्रोत्साहन आणि सहकार्य मिळते. यापुढे उपनिषदांचा, संस्कृत साहित्याचा अभ्यास करण्याचा त्यांचा मानस आहे. अशा या गीता उपासिकेला त्यांच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून हार्दिक शुभेच्छा.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.