रशिया-युक्रेन युद्धाला 200 हून अधिक दिवस उलटून गेल्यानंतर ही लढाई युक्रेनकडे झुकलेली आणि रशियाच्या पराभवाकडे वाटचाल करणारी ठरेल, असे जागतिक अंदाज वर्तविले गेले. पण, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनच्या चार प्रांतांत सार्वमत घेऊन ते भाग थेट रशियात विलीनही केले आणि पुन्हा युक्रेनवर जोरदार हल्लेही सुरु करुन सर्व अंदाज फोल ठरविले. आता हे तिसर्या महायुद्धाची नांदी समजले जाणारे युद्ध दुसर्या महायुद्धाप्रमाणेच अणुयुद्धाच्या महाविनाशाने संपुष्टात येणार की चर्चेतून, सामोपचाराने मार्ग निघणार, हे येणारा काळच ठरवेल. तेव्हा, मागील काही आठवड्यांतील या संघर्षाच्या केंद्रस्थानी राहिलेल्या घडामोडी, नाटो आणि पाश्चात्त्य देशांची भूमिका, तेलाचे अर्थकारण या अनुषंगाने या लेखात घेतलेला सविस्तर आढावा...
रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाला आताच्या 13 ऑक्टोबर रोजी तब्बल 232 दिवस उलटून गेले. जेव्हा, दि. 24 फेब्रुवारीला रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानुसार रशियाने हे युद्ध प्रारंभ केले, तेव्हा त्यांना रशियन सेनेच्या अधिकार्यांनी असे सांगितले होते की, आम्ही युक्रेनचा दोन आठवड्यांच्या आतच पाडाव करू आणि तो देश आपल्या अंकित करून घेऊ. अर्थात, पुतीन यांच्या मनातील स्वप्नाची अशी पूर्ती होण्याच्या आनंदाने पुतीन खुश झाले असणार. रशियन साम्राज्याचे 1991 साली जे विघटन झाले, ते पुतीन यांना अजिबात मान्य नव्हते. त्यांचे आंतरिक स्वप्न होते ते म्हणजे आधीचे सगळे सोव्हिएत रशियाचे विभाग पुन्हा रशियन सरकारचे अंकित करण्याचे! त्या सर्व भूमीला ‘रूसकीय मीर’ म्हणजे रशियन भूमी करणे हे पुतीन आपले निसर्गदत्त कार्य मानतात. 2014 साली युक्रेनच्या ताब्यात असलेले क्रिमिया द्वीपकल्प रशियाने सैन्याच्या जोरावर बळकावून घेतले. त्यानंतर त्यांनी हे स्पष्टपणे सांगितले होते की, ‘बृहत रशिया’ म्हणजेच पूर्वीचे सोव्हिएत युनियन हेच रशियन संस्कृती असलेल्यांचे ‘रशियन भूमी’ म्हणजेच रूसकीय मीर’ करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. (रशियन भाषेत मीर म्हणजे भूमी अथवा राज्य, असा अर्थ आहे.)
सन 1995 ते 2000 या वर्षात रशियन बुद्धिमंत, पत्रकार आणि इतर नेत्यांनी पद्धतशीरपणे हा विचार जोपासला होता आणि 2001 सालीच पुतीन यांनी याचा उद्घोष केला होता. तेव्हापासूनच पुतीन आणि त्यांचे सगळे सहकारी या कामास लागले होते. प्रथम 2008 साली त्यांनी जॉर्जिया या चिमुकल्या देशाचा लचका तोडून त्यांचे काही प्रांत रशियाच्या राज्याला जोडून घेतले. त्यामागील प्रेरणासुद्धा या ‘रूसकीय मीर’ याचीच होती. अशा प्रकारे एक एक करून पुतीन आपल्या नजीकच्या देशांचा घास घेत आहेत. हे करताना त्या मूळ देशांच्या नागरिकांचा अजिबात विचार केला जात नाही. रशियाचे मोठे सैन्य त्या त्या देशात जाऊन येनकेन प्रकारे त्या देशांचे प्रांत तोडून आपल्या देशाला जोडत चाललेले आपल्याला दिसतात.
हे सर्व ‘युनो’ आणि पाश्चात्य राष्ट्रे यांच्या समक्ष घडत आलेले आहे आणि त्या देशांकडून याचा आत्तापर्यंत प्रखर प्रतिवाद केला जात नव्हता. पण, युक्रेनवरील रशियाचे आक्रमण मात्र उंटाच्या पाठीवरची शेवटची काडी ठरली. आता मात्र युक्रेनला भरपूर अत्याधुनिक युद्ध साहित्य, तेल, नैसर्गिक वायू इत्यादी मदत पाश्चात्य देश सातत्याने उपलब्ध करून देत आहेत. त्याशिवाय जर युक्रेनची इच्छा असेल, तर त्याला ‘नाटो’ देशांच्या लष्करी करारात देखील प्रवेश देण्याचे ‘नाटो’ देश आणि अमेरिकेने मान्य केले आहे. अर्थात, त्यावर पुतीन भयंकर खवळले आहेत आणि नुकतेच त्यांनी असे वक्तव्य केले की, “जर युक्रेन ‘नाटो’मध्ये सामील होत असेल, तर आम्ही अण्वस्त्रेदेखील वापरू शकतील!” म्हणजे काहीही झाले तरी युक्रेनला ‘नाटो’ देशात सामील होऊ न देण्याचा पुतीन यांनी चंग बांधलेला दिसतो, असे दिसते.
हे युद्ध मूळ सुरू केले त्याचे वरकरणी दिलेले कारण म्हणजे, युक्रेनच्या पूर्वेला असलेल्या आणि रशियाच्या सीमेला लागून असलेल्या ‘डोनेस्टक आणि लुहान्स्क’ या दोन प्रांतातील रशियन भाषिकांच्यावर युक्रेनचे सरकार विविध अत्याचार करीत आहे आणि त्या रशियन भाषिकांचे रक्षण करणे हे एक रशियन सरकार म्हणून आपले कर्तव्य आहे, असे म्हणून हे आक्रमण सुरू केले होते. अर्थात, त्यावेळेस पुतीन यांना असे खरोखरच वाटले होते की, दोन आठवड्यांत युक्रेन शरण येईल आणि आपल्याला हे दोन प्रांत विनासायास घशात घालता येतील. परंतु, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे पुतीनच्या अपेक्षेप्रमाणे घाबरट निघाले नाहीत, तर त्यांनी रशियाशी युद्ध करण्याचा पवित्रा घेतला. त्यांनी आपल्या जनतेलादेखील प्रोत्साहित केले आणि जनता एकदिलाने आपल्या या नेत्याच्या पाठीमागे उभी ठाकली.
असा तिखट प्रतिकार रशियन सैन्यास मुळीच अपेक्षित नव्हता. तरीसुद्धा युद्धाच्या सुरुवातीला रशियन सैन्याने आपल्या रणगाडा दलाच्या जोरावर आणि घातक क्षेपणास्त्रे आणि वायुदलाचा वापर करून युक्रेनला जेरीस आणले. तेथील स्त्रिया आणि मुले निर्वासित होऊन शेजारील पोलंड आणि हंगेरी या देशात गेली, तिथे त्यांना उत्तम रीतीने सांभाळण्यात येत आहे. कारण, पश्चिम युरोपातील देशांना रशियाच्या या दादागिरीचा तिटकारा आहे. त्या व्यतिरिक्त ‘नाटो’ देश आणि अमेरिका युक्रेनच्याबाजूने उभे राहिले आणि त्यांनी विशेषतः अमेरिकेने, युक्रेनला अतिशय घातक अशी शस्त्रे व दारूगोळा पुरवला. त्यात सर्वांत मुख्य म्हणजे ‘जॅव्हेलीन-2’ हे अत्याधुनिक रणगाडा विरोधी क्षेपणास्त्र दिले आहे. या क्षेपणास्त्राने अनेक रशियन रणगाड्यांचा निकाल लावला. युक्रेनच्या सैनिकांनी आणि नागरिकांनी संयुक्तपणे गनिमी काव्याच्या लढाईने छापेमारी करून रशियन सैन्याला रोखले. पुढे पुढे तर नुसते रोखलेच नाही, तर त्यांच्यावर प्रतिहल्ले चढवून त्यांना माघार घेण्यासदेखील भाग पाडले.
गेल्या काही महिन्यांपूर्वी मे महिन्यात युक्रेनच्या सैन्याने आपल्या उत्तर पूर्वेकडील खारकिव्ह या शहरात प्रतिहल्ले करून रशियन सैन्याला मागे ढकलले. काही दिवसांपूर्वी दक्षिण पूर्वेलाअसलेल्या खेरसोन या शहरातून देखील रशियन फौजांना हुसकावून लावण्यात आले आहे. या आणि इतर अशाच चकमकीत रशियाची पीछेहाट झालेली दिसून येते. याची काही मुख्य कारणे म्हणजे रशियन सैन्य हे अननुभवी सैनिकांनी बनलेले आहे. त्यांचे प्रशिक्षणही अगदी जुजबी. शिवाय त्यांना रशियाच्या दूर पूर्वेकडील, म्हणजे सैबेरियाच्या प्रांतातून आणलेले आहे. त्यांना युक्रेन येथे लढण्यात काहीही स्वारस्य नाही. याउलट युक्रेनचे सैन्य स्वतःच्या मातृभूमीसाठी लढत आहे. त्यामुळे त्यांच्या लढण्याच्या शक्तीला विशेष धार चढली आहे. आता जगभर रशियन सैन्याचे हसे होत आहे की, रशियासारख्या महासत्तेला युक्रेन हा पिटुकला देश आव्हान देत आहे आणि रशियन सैन्य पळून माघार येत आहे. या सर्वांचा परिणाम म्हणजे, पुतीन यांना स्वतःच्याच देशात जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
त्यातच दि. 8 ऑक्टोबरला काही लोकांनी पुतीन यांनी 2018 साली दोन वर्षांत बांधून पूर्ण केलेल्या ‘केर्श’ पुलावर ट्रकने स्फोटके ठेवून त्या पुलाचा एक भाग संपूर्णपणे उडवून दिला. पुतीन यांनी क्रिमियाचा ताबा घेतल्यानंतर लवकरच रशियन मुख्य भूमीतल्या क्रॉसनोदर या प्रांतातून क्रिमियन द्वीपकल्पावर एक प्रचंड पूल बांधला. रशिया आणि क्रिमिया यामध्ये असलेल्या ‘केर्श’ सामुद्रधुनीवर बांधलेला हा सध्या युरोपातील सर्वांत लांब असा 18 किलोमीटर्स लांबीचा पूल आहे. यात दोन पूल आहेत एक चार लेन हायवे आणि एक दुहेरी रेल्वे मार्ग. या पुलामुळे रशियाला क्रिमीयात रसद पोहोचविणे अधिक सुलभ झाले. त्याआधी युक्रेनच्या भूमीतूनच क्रिमियाला जाण्याचा रस्ता होता. हा पूल पुतीन आणि रशियाचा एक मानबिंदू होता. तोच युक्रेनच्या स्वातंत्र्यसैनिकांनी उडविल्यामुळे पुतीन यांची चांगलीच नाचक्की झाली आहे. त्यामुळेदेखील पुतीन आता प्रचंड संतापले आहेत आणि युक्रेनवर अतिभीषण हल्ले करण्याचे त्यांनी ठरवले आहे.
त्यामुळे आता पुतीन एवढे खवळले आहेत की, त्यांनी युक्रेनमधील अनेक मोठ्या शहरांवर, ज्यात युक्रेनची राजधानी कीव्हचादेखील समावेश आहे. तेथील नागरी वस्त्यांवर तब्बल 84 क्षेपणास्त्रे डागली आहेत. अशा प्रकारच्या अमानुष हल्ल्यांत अनेक नागरिक दगावले आणि जखमी झाले आहेत. पण, आता मात्र युक्रेनच्या जनतेचा निर्धार अधिकच मजबूत झाला आहे. त्यांच्या अध्यक्षांनी आता ही लढाई जिंकेपर्यंत लढण्याची तयारी दर्शवली आहे! त्यामुळे पुतीन यांची परिस्थिती जरा नाजूकच बनलेली दिसते. म्हणून ते अधिकाधिक प्रक्षोभक विधाने करत आहेत. आता रशियाला इतक्या दीर्घकाळ चाललेल्या युद्धामुळे शस्त्रास्त्रांचा तुटवडा जाणवत आहे आणि ते सध्या अशी शस्त्रे व मुख्यतः ड्रोन इत्यादी उत्तर कोरिया आणि तुर्कस्तान, इराण आदी देशांकडून विकत घेण्याचे प्रयत्न करत आहेत. या युद्धामुळे अमेरिका आणि पाश्चात्य देशांनी रशियावर शेकडो आर्थिक निर्बंध घातलेले आहेत. त्यात मुख्यतः रशियाच्या तेलविक्रीवर बंदी आणली आहे.
तेलाची विक्री करताना रशियाने अमुक एक कमाल किंमत आकारावी, असे बंधन अमेरिकेने घातले. त्यावर ‘रशियाने आम्ही हे बंधन पाळणार नाही आणि ज्यांना हे निर्बंध मोडून स्वस्त तेल व गॅस घ्यायचा असेल, त्यांनी तो घ्यावा,’ असे सांगितले. भारताने या प्रकारे रशियन तेल खरेदी केले आहे, हे अमेरिकेला अजिबात आवडले नाही. पण, मोदींच्या भारताने अमेरिकेला स्पष्ट शब्दात सांगितले की, आमच्या देशातल्या जनतेसाठी स्वस्त तेल घेणे ही आमची गरज आहे. आपले परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी तर असे ठणकावून सांगितले की, “आम्ही एक महिन्यात जेवढे रशियन तेल खरेदी केले आहे, तितके तेल युरोपियन देश एका दिवसात रशियातून विकत घेत आहेत.” त्यानंतर अमेरिकेला भारताला काही सांगणे शक्यच झाले नाही. पण, अमेरिकेची नाराजी लपून राहिलेली नाही. मुख्य प्रश्न हिवाळ्यात युरोपला तेल आणि नैसर्गिक वायूचा जो पुरवठा 40 टक्क्यांपर्यंतचा रशियातून होतो, त्याचा आहे. पुतीन यांनी हा पुरवठा आत्ताच बंद करून टाकला आहे. थंडी वाढल्यावर हिवाळ्यात जर हा पुरवठा झाला नाही, तर युरोपात थंडीने नागरिकांचे प्रचंड हाल होऊ शकतात. कदाचित अनेकांच्या जीवावर देखील बेतू शकते. आज तरी हा तेलपुरवठा हे पुतीन यांच्या हातातील एक खूप प्रभावी शस्त्र आहे.
जागतिक तेलपुरवठा देशांची एक संघटना आहे, ‘ओपेक’ या नावाची. त्यात रशियादेखीलसामील झाल्यावर त्याचे नाव ‘ओपेक प्लस’ असे ठेवण्यात आले. या संघटनेने, जिचा प्रमुख, सौदी अरेबियाचा राष्ट्रप्रमुख मोहम्मद बिन सलमान आहे, अशी घोषणा केली की, ही संघटना प्रती दिवसाच्या तेलाच्या पुरवठ्यात 20 लाख बॅरल्स तेलाचा पुरवठा कमी करेल. ही घोषणा ऐकताच जगात तेलाचे भाव वधारले. या वाढत्या भावाचा त्रास अमेरिकेतल्या जनतेला देखील होऊ लागला आहे. अमेरिकन प्रजा तेलाच्या भावाबद्दल अतिशय संवेदनशील असते आणि पुढील महिन्यात अमेरिकेत सिनेट आणि अमेरिकन कॉँग्रेस, अशा दोन्ही सभागृहांच्या निवडणुका आहेत. रागावलेल्या प्रजेकडून अमेरिकन अध्यक्ष जो बायडेन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाचा पराभव होऊ शकतो. या भीतीने बायडन यांनी सौदी अरेबियाला अशी कपात न करण्याची विनंती केली होती.
पण, सौदी अध्यक्षांनी या विनंतीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. आता बायडन यांना हे युक्रेनचे युद्ध प्रत्यक्ष स्वत:ला त्रासदायक ठरेल, असे वाटू लागले आहे. त्यात नुकतेच पुतीन यांनी युक्रेनच्या पूर्वेकडील चार प्रांतात, म्हणजे डोनेस्टक, लुहान्स्क, खेरसोन आणि झापोरीझिया या ठिकाणी लुटुपुटूचे सार्वमत घेऊन, हे प्रांत रशियात सामील करून टाकले. या सामिलीकरणाला अमेरिका आणि इतर पाश्चात्य देशांनी कडाडून विरोध केला. त्यांनी ‘युनो’च्या माध्यमातून रशियावर कडक टीका आणि निर्बंध घालण्याची घोषणा केली आहे. अशा प्रकारे जगात आता स्पष्टपणे दोन तट पडले आहेत. या युद्धाच्या परिणामी सर्व जगात इंधनाच्या किंमती प्रमाणाबाहेर वाढत आहेत. ज्याचा सर्वच राष्ट्रांना भयानक आर्थिक त्रास होत आहे. युरोपीय देश आणि इंग्लंड येथे महागाईने कहर मांडला आहे. सर्व जगात असंतोष माजलेला आहे. त्यात पुतीन यांनी अण्वस्त्रे वापरण्याची सुप्त धमकी दिली आहे, ज्यावर अमेरिका आणि ‘नाटो’ देशांकडून कडक प्रतिक्रिया आल्या आहेत. जर रशियाने युक्रेनच्या युद्धात खरोखरच अशी अण्वस्त्रे वापरली, तर अमेरिका आणि ‘नाटो’ देशदेखील तोच मार्ग घेऊ शकतील.
तसे झाले तर जागतिक युद्ध पेटेल आणि त्यात अण्वस्त्र वापरल्याने प्रचंड नुकसान आणि मनुष्यहानी होईल. या सर्व भविष्याची कल्पना असल्यानेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना असे सांगितले होते की, ही वेळ युद्ध करण्याची नाही, तर तह करून शांतता प्रस्थापित करण्याची आहे. हा लाख मोलाचा सल्ला पुतीन आणि इतर नेते मानतात की नाही, यावरच जगाचे भविष्य अवलंबून आहे. येत्या काही दिवसांत युद्ध जर आणखी चिघळले नाही तरच जग शांततेचा एक नि:श्वास सोडेल नाही, तर मात्र परिस्थिती खरोखरच अतिशय गंभीर होईल. जागतिक नेत्यांना सद्बुद्धी होवो, अशी प्रार्थना करून हा लेख आटोपता घेतो.
- चंद्रशेखर नेने
crnene@gmail.com