स्वातंत्र्यानंतर पूर्वांचल (ईशान्य भारत) फार मोठा काळ प्रगतीपासून, शांततेपासून वंचित राहिला असल्याचे दृश्य दिसते. यामागची कारणे, तिथल्या समस्यांचे स्वरूप, तिथल्या घडामोडी जाणून घ्यायच्या तर पूर्वांचलाशी सखोल परिचय असणे आवश्यक आहे. सुनील किटकरू यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून पूर्वांचलाच्या विविध भागांमध्ये कार्य करण्याचा अनुभव 1990च्या दशकात घेतला. त्यातूनच त्यांना या भागाची जवळून ओळख झाली. या भागाची वैशिष्ट्ये, इथल्या जनजातींचे परस्परसंबंध, त्यांच्यातले ताणतणाव, त्यातून उद्भवलेल्या स्थानिक आणि पर्यायाने राष्ट्रीय समस्या यांचा त्यांना जवळून परिचय झाला. ते अनुभव त्यांनी नागपूरहून प्रकाशित होणार्या ‘तरुण भारत’मधून साप्ताहिक सदराच्या रूपाने मांडले. या लेखांचे संकलन ‘वार्ता ईशान्य भारताची’ या पुस्तकाच्या रूपाने नुकतेच प्रकाशित झाले आहे.
पूर्वांचलचा बहुआयामी परिचय
पुस्तकामध्ये तीन विभाग आहेत. पूर्वांचलात प्रतिकूल परिस्थितीत पाय रोवून उभे राहिलेल्या नि:स्वार्थी कार्यकर्त्यांच्या असामान्य कर्तृत्वाची दखल पहिल्या विभागात घेतली आहे. दुसर्या विभागात पूर्वांचलचे निसर्गवैभव, तिथली मंदिरे आणि वारसास्थळे, तिथली खाद्यसंस्कृती, कलाविष्कार, साहित्य, समाजजीवनावर असलेला रामायण-महाभारताचा प्रभाव, शंकरदेवांनी रुजवलेले भक्तिसंस्कार, इंग्रजांविरुद्ध लढलेले जनजातीतील स्वातंत्र्ययोद्धे या सर्वांची ओळख करून दिली आहे. तिसर्या विभागात पूर्वांचलच्या समस्या आणि त्यावरचे उपाय यांचा उहापोह केला आहे, पूर्वांचलच्या आजच्या घडीच्या जनमानसाचाही कानोसा घेतला आहे आणि भारतीयांच्या पूर्वांचलप्रतीच्या जबादारीची जाणीवही करून दिली आहे.
भौगोलिक दुर्गमता, सरकारी अनास्था, भारतीयांची उदासीनता, जनजातींमधले तणावपूर्ण संबंध, धर्मांतराच्या माध्यमातून स्थानिक संस्कृती नष्ट करत निघालेल्या मिशनरी संघटना, अवैध घुसखोरी, दहशतवाद अशा समस्यांनी पूर्वांचल खिळखिळे केले आहे. कार्यकर्ता म्हणून हे सर्व जवळून पाहिलेल्या सुनील किटकरू यांनी या समस्यांचे अनेक पदर उलगडून दाखवले आहेत, एवढेच नाही,तर त्या सोडवण्यासाठी होत असणार्या प्रयत्नांबद्दलही विस्ताराने लिहिले आहे. समस्या निवारणाच्या या प्रयत्नांमध्ये अग्रणी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ!
पूर्वांचलला जोडून ठेवणारा रज्जू
भारताचे अभिन्न अंग असणार्या पूर्वांचलकडे दुर्लक्ष केल्याची खूप मोठी किंमत देशाला भोगायला लागत आहे, या जाणिवेतून रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजींनी पूर्वांचलात संघकार्य सुरू करण्याची योजना केली. 1945 सालापासून अनेक प्रचारक भारताच्या अन्य भागातून पूर्वांचलात प्रचारक म्हणून गेले आणि तिथलेच होऊन गेले. भाषा, वेशभूषा, रीतीरिवाज, खाद्यसंस्कृती यातल्या कशाशीही पूर्वपरिचय नव्हता. फुटीरतावादी अतिरेकी आणि असहिष्णू मिशनर्यांच्या प्रभावक्षेत्रात काम करताना ’राष्ट्रनिष्ठा’ हा एकच भाव मनात ठेवून प्रचंड काम केले. त्यांच्या पर्वतप्राय कार्याचा परिणाम म्हणूनच आजही पूर्वांचल उर्वरित भारताशी जोडलेले राहिले आहे, असे म्हटले तर अतिशयोक्ती ठरू नये.
पूर्वांचलात आजवर अनेक संघकार्यकर्त्यांवर मिशनरी पुरस्कृत अतिरेक्यांकडून जीवघेणे हल्ले झाले आहेत. काही जण बेपत्ता झाले, जे पुन्हा कधीही सापडले नाहीत. काहींच्या तर भीषण हत्या झाल्या. 2002 साली क्षेत्र कार्यवाह (श्यामलकांती सेनगुप्ता) आणि तीन संघप्रचारक (सुधामय दत्त, दिनेंद्र डे, शुभंकर चक्रवर्ती) यांचे त्रिपुरामधून झालेले अपहरण आणि काही काळाने झालेली हत्या, ही तर संघाच्या पूर्वांचलमधील वाटचालीतली सर्वात वेदनादायी घटना होती. अशा प्रतिकूल परिस्थितीतही पाय घट्ट रोवून उभे राहिलेल्या संघप्रचारकांबद्दल वाचताना ‘कर माझे जुळती’ अशीच भावना दाटून येते. अशा अनेक आत्मविलोपी प्रचारकांची ओळख सुनील किटकरू यांनी पुस्तकात करून दिली आहे.
संघपरिवारातील अन्य संस्थांचेही पूर्वांचलमधील कार्य वर्धिष्णू आहे. ‘विद्याभारती’, ‘माय होम इंडिया’, ‘वनवासी कल्याण आश्रम’, ‘सेवाभारती’ आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनीही शिवधनुष्य पेलले आहे. संघाची पार्श्वभूमी असणार्या काही स्वयंसेवकांनी स्वयंस्फूर्तीने पूर्वांचलात येऊन समाजकार्य सुरू ठेवले आहे.
ख्रिश्चॅनिटीच्या प्रभावाखाली येऊन आपली मूळ संस्कृती विसरत चाललेल्या जनजातींना आपल्या मूळ निसर्गपूजक संस्कृतीचे महत्त्व उमगू लागले आणि त्यातूनच ‘मूलश्रद्धा जागरण चळवळ’सुरू झाली. त्याचा परिणाम म्हणून अनेक जनजातीय आपल्या मुळांकडे परतत आहेत. नागालँडच्या राणी माँ गाईदिन्ल्यु, अरुणाचल प्रदेशचे तालूम रुकबोजी यांनी यासंदर्भात पथदर्शी काम केले आहे. या प्रयत्नांना संघप्रयत्नांची जोड मिळाल्याने या चळवळीचा प्रभाव वाढत आहे. या चळवळीची माहिती देणारी दोन प्रकरणे पुस्तकात समाविष्ट आहेत.
जे जे उत्तम, उदात्त, उन्नत...
पुस्तकाबद्दल उल्लेखनीय गोष्ट म्हणजे, यामध्ये सुनील किटकरू यांनी संघाव्यतिरिक्त पूर्वांचलच्या प्रगतीसाठी झटणार्या अनेकांची आवर्जून दखल घेतली आहे. पूर्वांचलमध्ये महत्त्वाचे कार्य करणार्या लोकाभिमुख, कार्यकुशल प्रशासकीय अधिकार्यांवरही पुस्तकात स्वतंत्र प्रकरण आहे.
देशहिताची कृती करणार्या सर्वांच्या कार्याबद्दल विचारसरणीच्या पलीकडे जाऊन दाखवलेला आदरभाव हा या पुस्तकाचा गुणविशेष आहे. 1955 साली नागालँडच्या अशांत भूमीमध्ये जाऊन ग्रामविकसनाचे कार्य करणार्या महान गांधीवादी नटवरभाई यांच्यापासून पुस्तकाची सुरुवात होते. आसाम प्रांत पूर्व पाकिस्तानात जाण्यापासून वाचवणारे आसामचे पहिले मुख्यमंत्री गोपीनाथ बोरदोलोई आणि त्यात त्यांच्या सोबत असणारे, पुढे अवैध घुसखोरी व नागा बंडखोरी रोखण्यासाठी मोठे प्रयत्न करणारे आसामचे दुसरे मुख्यमंत्री विष्णुराम मेधी या काँग्रेस नेत्यांच्या कार्याचाही गौरव केला आहे. देशाने त्याबद्दल त्यांचे ऋणी राहायला हवे.
जिवाशिवांच्या घडवू भेटी...
पूर्वांचलमधील जनतेला ‘त्यांना भारत देश आपला वाटणार तरी कसा’ या चिंतेने अस्वस्थ झालेल्या भैय्याजी काणे, जयवंत कोंडविलकर नावाच्या शाळकरी मुलासोबत महाराष्ट्रातून थेट मणिपूरमध्ये म्यानमार सीमेलगतच्या गावामध्ये जाऊन राहिले. पूर्वांचलमधील समाजाने भारत देशाला पुन्हा आपले मानायला हवे असेल तर तिथल्या उगवत्या पिढीला भारत दाखवावा लागेल, हे त्यांनी ताडले. तिथल्या स्थानिकांचा विश्वास संपादन करून त्यांच्या मुलांना महाराष्ट्रात आणि अन्य राज्यांमध्ये शिक्षणासाठी घेऊन आले.
भैय्याजींचे हे ‘मॉडेल’ अधिक विस्तारत जाऊन संघरचनेतून पूर्वांचलमधील अनेक विद्यार्थी उर्वरित भारतात येऊन शिकू लागले. ‘भारत हा माझाही देश आहे’ ही भावना त्यांच्या मनात वाढीस लागली. पूर्वांचलमधून शिक्षणासाठी आलेले विद्यार्थी आणि स्थानिक कार्यकर्त्यांचे त्यांना मिळालेले अकृत्रिम प्रेम, आपल्या गावी परत जाताना त्या विद्यार्थ्यांमध्ये जागृत झालेली आपलेपणाची भावना, परत जाऊन आपल्या भागातील घराघरामध्ये त्यांनी केलेला राष्ट्रभावनेचा प्रसार यांची हृद्य उदाहरणे पुस्तकात वाचायला मिळतात.
‘अॅक्ट ईस्ट’ धोरणाचे परिणाम
2014 साली केंद्रात आलेल्या भाजप सरकारने अटलजींच्या ‘लुक ईस्ट’ धोरणाचा पुढचा टप्पा म्हणून ‘अॅक्ट ईस्ट’ धोरण राबवत आहे. पूर्वांचलमध्ये दळणवळण आणि संपर्कसाधनांचे मोठे जाळे निर्माण होत आहे. राज्याराज्यांदरम्यानचे वर्षानुवर्षांचे सीमाप्रश्न निकाली निघत आहेत. फुटीरतावादी अतिरेक्यांसोबत शांतता करार होत आहेत. बंद-जाळपोळ या दुष्टचक्रातून पूर्वांचल मोकळा श्वास घेत आहे. अनेक वर्षे स्थानिकांचा रोष ओढवून घेतलेल्या ‘एएफएसपीए’ कायद्याच्या अमलाचे क्षेत्र कमी केले जात आहे.
पूर्वांचलमधील तरुण-तरुणी उत्तम क्रीडापटूचे गुण बाळगणारे आहेत. या खेळाडूंना आणखी पैलू पाडावेत म्हणून क्रीडा विद्यापीठ उभे राहत आहे. आंतरराष्ट्रीय क्रीडास्पर्धांमध्ये ईशान्येचे खेळाडू नेत्रदीपक यश मिळवत आहेत, याचीही यथायोग्य दखल पुस्तकामध्ये घेतली गेली आहे.
उणीव आणि बलस्थान
वैविध्याने नटलेल्या या माहितीपूर्ण पुस्तकामध्ये काही उणिवा राहिल्या आहेत. दैनिकातील सदराचे पुस्तकात रुपांतर करताना संपादकीय संस्कार करणे, तसेच तारखांचे संदर्भ अद्ययावत करणे आवश्यक असते. ते इथे झालेले नाही. शिवाय पुस्तकाच्या मुद्रितशोधनाकडे दुर्लक्ष झाल्याने वाचनास्वादात अडथळा येतो. पुढील आवृत्तीत या उणिवा दूर होणे अत्यावश्यक आहे.
‘वार्ता ईशान्य भारताची’ हे वैविध्य, व्यापकता आणि स्वानुभवाचा अस्सलपणा असा दुर्मीळ योग जुळून आलेले पुस्तक आहे. पूर्वांचलपुढची आव्हाने, तिथे होणारे अनेक स्तरांवरचे सकारात्मक बदल पुस्तकामध्ये बारकाईने टिपले आहेत. पुस्तक वाचताना मनामध्ये पूर्वांचलाबद्दल निर्माण होणारी सकारात्मक भावना, ही या पुस्तकाची सर्वांत मोठी उपलब्धी आहे. अनेक वर्षे आपणच दुर्लक्षित ठेवलेला पूर्वांचल अंगभूत प्रामाणिकपणाच्या बळावर आणि असंख्य अनाम कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमधून भरारी घेण्यासाठी सज्ज होत आहे. गरज आहे ती सर्व भारतीयांनी प्रोत्साहन देण्याची आणि आत्मीय संबंध ठेवण्याची.
पुस्तकाचे नाव : वार्ता ईशान्य भारताची
लेखक : सुनील किटकरू
प्रकाशक : श्री नरकेसरी प्रकाशन लि.
पृष्ठसंख्या : 256
किंमत : 300 रू.
(पुस्तकासाठी संपर्क :
सुनील किटकरू : 9890489978)