तेजिंदर पाल सिंह बग्गा
चंडीगढ : पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने भाजप नेते तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना मोठा दिलासा दिला आहे. त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हा एफआयआर पंजाब पोलिसांनी ११ मार्च २०२२ रोजी नोंदवला होता. बग्गा यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप होता.
न्यायमूर्ती अनूप चितकारा यांनी बुधवारी १२ ऑक्टोबर २०२२ बग्गा यांच्या याचिकेवर सुनावणी केली. ते म्हणाले की, बग्गा यांच्या ट्विटमध्ये कोणत्याही दहशतवादी कारवायासारखे काहीही नव्हते. ट्विटमध्ये कोणाच्याही धार्मिक भावना भडकवण्याचे काहीही नाही असे स्पष्ट करून न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले. याचिकेत सायबर क्राइम पोलिस स्टेशन, एसएएस नगर, मोहाली येथे आयपीसीच्या कलम १५३-ए, ५०५, ५०५(२) आणि ५०६ अंतर्गत नोंदवलेली एफआयआर रद्द करण्याचे आवाहन करण्यात आले होते.
पंजाब पोलीस अटक करण्यासाठी दिल्लीत आले होते
अरविंद केजरीवाल यांच्या 'द कश्मीर फाइल्स'वर केलेल्या वक्तव्याचा भाजयुमो कार्यकर्त्यांनी निषेध केला होता. या निदर्शनात सहभागी झालेल्या बग्गा यांचे एक वक्तव्य व्हायरल झाले होते. जोपर्यंत केजरीवाल माफी मागत नाहीत तोपर्यंत भाजप कार्यकर्ते शांत बसू देणार नाहीत, असे ते म्हणाले होते. २५ मार्च रोजी तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी ट्विटमध्ये लिहिले की, "जेव्हा १० लाख लोक ह#मी मरतील, तेव्हा एक अरविंद केजरीवाल जन्माला येईल." नंतर ते म्हणाले की १० लाख हे १० कोटी असे वाचावे.
या विधानाच्या आधारे आप कार्यकर्ता राम कुमार झा यांनी पटियाला येथे एफआयआर दाखल केला आहे. या एफआयआरला उत्तर देताना तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी २७ मार्च २०२२ रोजी म्हटले होते, "एक नाही शंभर एफआयआर दाखल करा, परंतु केजरीवाल जर काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराला खोटे सांगतील, तर मी बोलेन." काश्मिरी हिंदूंच्या नरसंहारावर केजरीवाल हसले तर मी गप्प बसणार नाही. त्यासाठी मझी परिणामांना सामोरे जाण्याची तयारी आहे. मी केजरीवाल यांना सोडणार नाही".
नंतर या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली. ६ मे २०२२ रोजी, पंजाब पोलिसांचे एक पथक बग्गा विरुद्ध मोहाली सायबर क्राइम पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवून बग्गाला अटक करण्यासाठी दिल्लीत आले. बग्गा यांनी त्यावेळी आरोप केला होता की, जवळपास ५० पोलिस कर्मचारी गणवेशाविना डझनभर खासगी वाहनांमध्ये होते. पोलिसांवर बग्गा आणि त्याच्या वडिलांना मारहाण करून पगडी खेचल्याचा आरोप होता. मात्र, या पोलिस पथकाला हरियाणा पोलिसांनी वाटेत अडवले आणि बग्गांना परत दिल्लीत आणले. यादरम्यान तेजिंदर पाल सिंह बग्गा यांना दिल्लीत बेकायदेशीरपणे अटक केल्याप्रकरणी पंजाब पोलिसांवरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. ८ एप्रिल २०२२ रोजी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने बग्गा विरोधात वापरलेल्या मोडस ऑपरेंडीबद्दल पंजाब पोलिसांना फटकारले होते.