मुंबई: भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने शंभर कोटींचा घोटाळा केल्याचे समोर आणले आहे. खासदार संजय राऊत यांच्यावर सोमय्या यांनी हा आरोप केला होता. या प्रकरणी न्यायालयात गेल्यानंतर आजाद मैदान पोलिस ठाण्यात एफ.आय.आर. नोंदवण्यात आली आहे, याप्रकरणी लवकरात लवकर कारवाई होईल. असा विश्वास सोमय्या यांनी व्यक्त केला आहे.
सोमय्या यांनी दिलेल्या माहितीनुसार, "संजय राऊत यांचे सहकारी आणि पार्टनर असलेल्या पाटकर आणि त्यांच्या लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट कंपनीने कोवीड सेंटरच्या नावाखाली शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. हा घोटाळा मोठा असल्याने मुंबई पोलिस आयुक्तांच्या आदेशाने सदर तपास मुंबई पोलिसांच्या आर्थिक शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. या प्रकरणी लवकरात लवकर कारवाई होईल. असे सांगितले.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर आरोप करताना सुचित पाटकर आणि इतरांची नावे घेतली होती. या दोघांमध्ये व्यावसायिक संबंध असून पाटकर यांच्या माध्यमातूनच संजय राऊत यांनी घोटाळे केल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. सुजित पाटकर यांच्या पत्नी आणि संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या नावावर अलिबाग परिसरात जमीन खरेदी करण्यात आली होती. या प्रकरणात भ्रष्टाचाराचे पैसे वापरण्यात आले असल्याचा आरोप सोमय्या यांनी केला होता. सोमय्या यांच्या आरोपानंतर या प्रकरणी ईडीच्या वतीने पाटकर यांच्या घरी त्यांची चौकशी करण्यात आली होती.
सुजित पाटकर आणि संजय राऊत यांच्या मुलींच्या नावे कंपनी असल्याचा आरोप देखील सोमय्या यांनी केला होता. Magpie Dfs Private Limited या कंपनीचे संचालक म्हणून पाटकर यांच्यासह संजय राऊत यांच्या मुलींची नावे आहेत. मात्र अद्याप या कंपनीने कोणत्याही व्यवसाय केला नसल्याचे समोर आले होते. ही कंपनी आगामी काळात वाईन, शीतपेय आणि खाद्यपदार्थ आदी व्यवसाय करणार असल्याची माहिती देखील समोर आली होती.