मुंबई : बारामती ॲग्रोकडून सरकारी नियमांचा भंग झाल्याची तक्रार भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी आली आहे. कर्जत जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि पवार कुटुंबाचे सदस्य असलेल्या रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून सरकारी नियमांचा भंग झाल्याची तक्रार करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून साखर हंगामाच्या बाबतीत घेण्यात आलेल्या निर्णयांची आणि राज्य सरकारच्या नियमांची थेट पायमल्ली रोहित पवारांच्या बारामती ॲग्रोकडून करण्यात आली आहे, असा आरोप राम शिंदे यांनी केला आहे.
आ. प्रा. राम शिंदे यांनी याबाबत साखर आयुक्तांकडे तक्रार केली असून रोहित पवार आणि बारामती ॲग्रोवर सक्त कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आपण राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली असून याबाबतचे आवश्यक ते सर्व पुरावे त्यांच्याकडे सुपूर्द केले आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली आहे. यापूर्वी अवघ्या काही आठवड्यांपूर्वी रोहित पवार हे ईडीच्या कचाट्यात सापडल्याचे दिसले होते.
राम शिंदेंचे पवारांवर आरोप
रोहित पवारांवर आरोप करताना राम शिंदे म्हणाले की, 'राज्याचा २०२२-२३ चा ऊस गाळपाचा हंगाम सुरु करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या समितीने बैठक घेतली होती. या बैठकीत ऊस गाळपाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्देश देत हंगाम १५ ऑक्टोबरपासून हंगाम सुरु करण्याबाबत निर्णय जाहीर केला होता. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाचे उल्लंघन रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रोकडून करण्यात आले आहे.'
'बारामती ॲग्रोच्या इंदापूर येथील युनिटकडून राज्य सरकारचे निर्देश आणि १९८४ मधील कायद्याचीही पायमल्ली बारामती ॲग्रोकडून थेटपणे करण्यात आली आहे. या संदर्भात आपण साखर आयुक्तांकडे तक्रार केली आहे. तसेच संबंधितांवर तात्काळ कारवाईची मागणी केली असून साखर आयुक्तांनी देखील चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वास दिले आहे,' असे राम शिंदे यांनी म्हटले आहे.
मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न
कारखान्याच्या बाबतीत करण्यात आलेल्या तक्रारीत काहीही तथ्य नाही. हा केवळ मला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे.'