योगिता साळवी
मुंबई : रुपाली चंदनशिवे या तरुणीच्या हत्या प्रकरणाचे वार्तांकन करत असल्याच्या कारणावरून दै. मुंबई तरुण भारतच्या ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्या प्रकरणी चेंबूर परिसरातील टिळकनगर पोलीस ठाण्यात साळवी यांनी एफआयआर दाखल केली आहे. रुपाली चंदनशिवे हत्याप्रकरणात पहिल्या दिवसापासून साळवी आढावा घेत आहेत. याच कारणास्तव रुपालीच्या घरी कुटुंबियांच्या भेटीसाठी गेल्या असता गप्प राहण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकण्यात येत आहे.
रुपाली चंदनशिवे या तरुणीला बुरखा घालत नाही, धार्मिक रीतीरिवाज पाळत नाही, या रागातून इकबाल शेख (वय-३६) रुपालीला त्रास देत होता. इकबालसह त्याच्या कुटुंबियांकडून होत असलेल्या मानसिक छळाला वैतागून रुपालीने विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपण पुन्हा एकत्र गावी जाऊन राहू यासाठी इकबाल आणि त्याचे कुटुंबीय रुपालीकडे मागणी करू लागले. पूर्वानुभव लक्षात घेता त्यांच्या बोलण्यात न अडकता रुपालीने वेगळे राहण्याचा निर्णय कायम ठेवला. याच रागातून २६ सप्टेंबर २०२२ रोजी दिवसा ढवळ्या इक्बालने रूपालीचा लहान मूलादेखत धारधार चाकूने गळा चिरला.
आरोपी इकबालला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणाचा सखोल आढावा घेण्याचे दै. मुंबई तरुण भारतच्या ज्येष्ठ पत्रकार योगिता साळवी यांनी ठरविले. तसेच लव्ह जिहादच्या प्रकरण जगासमोर आणायच्या हेतूने त्या वार्तांकन करण्यासाठी रुपालीच्या घरी गेले असता त्यांना धमकावण्यात आले. याप्रकरणी योगिता साळवी यांनी टिळकनगर पोलीस स्थानकात अब्दुल मेहबूब बादशाह शेख यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.
कलम ३४१, ५०६ आणि ३४अंतर्गत अब्दुल शेख यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगिता साळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी १ ऑक्टोबर रोजी त्या स्वतः आणि त्याच्यासोबत करिष्मा भोसले व वर्षा भोसले या रुपाली चंदनशिवे यांच्या घरी गेल्या होत्या. रुपालीच्या कुटुंबियांना भेटून माघारी परतत असताना हनुमान मंदिराजवळ एक पुरुष आणि एका महिलेने त्यांना अडवले.
त्यातील एकाने करिश्माला अडवून "माझं नाव कादीर आहे, मी मुस्लीम समाजाचा कार्यकर्ता आहे. इथले वातावरण पूर्वीपासूनच बिघडलेले आहे. हे प्रकरण लव्ह जिहादचे नाही. आमच्या विभागात पुन्हा दिसू नका. आमच्या समाजाला त्रास झाला तर तुम्हाला सोडणार नाही, अशी थेट धमकी दिल्याची तक्रार साळवी यांनी केली आहे. धमकी देणाऱ्यासह उपस्थित महिलेने आरडाओरड करून १० ते १५ अन्य शेजाऱ्यांना जमवून साळवींसह अन्य सहकाऱ्यांना घेराव घातला. या प्रकारातून सुटका करुन घेतल्यानंतर साळवींसह व करिष्मा भोसले यांनी थेट पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदविली.