मुंबई : मुंबई महापालिकेने अजमेरा बिल्डरला पाचशे कोटींचा फायदा करून दिल्याचा आरोप भाजपचे आमदार योगेश सागर यांनी केला आहे. आमदार योगेश सागर यांनी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे.
"उद्यानासाठी आरक्षित असलेली जागा अजमेरा बिल्डरला दिल्याचा आरोप आमदार योगेश सागर यांनी पालिकेवर केला आहे. "मुंबईचा विकास आराखडा मंजूर करताना विविध आरक्षणे प्रस्तावित केली होती. परंतु, मुंबई महानगर पालिकेच्या भ्रष्ट कारभारामुळे आता उद्याने आणि खेळाची उद्याने नष्ट झाली आहेत. या परिस्थितीत पालिकेच्या ताब्यातील उद्यानासाठी आरक्षित कोणतेही अतिक्रमण नसलेला बांधकामासाठी योग्य भूखंड अजमेरा बिल्डरला दिला आहे. त्याबदल्यात अजमेरा बिल्डरकडून बांधकामायोग्य आणि परवानग्यांच्या फेऱ्यात अडकणारा भूखंड मुंबई महापालिकेने माहुल पम्पिंग स्टेशनसाठी आपल्या ताब्यात घेतला आहे." असा आरोप आमदार सागर यांनी मुत्र्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रातून केला आहे.
निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर मोठा लढा देणार
महापालिकेने केलेल्या पाचशे कोटींच्या भ्रष्टाचाराच्या या प्रकरणाला तत्काळ स्थगित करण्यात येण्याच्या सूचना देण्यात याव्यात. शिवाय या निर्णयाचा पुनर्विचार केला नाही तर याविरोधात भाजप मोठा लढा देईल असा इशारा आमदार योगेश सांगर यांनी सत्ताधारी शिवसेनेला दिला आहे. या भ्रष्ट्राचारातून मुंबईकरांची हक्काची जमीन बिल्डरच्या घशात घालण्याचा घाट सत्ताधारी शिवसेना आणि महाविकास आघाडीच्या साथीदारांनी घातला आहे, असा गंभीर आरोप आमदार योगेश सागर यांनी केला आहे. दरम्यान, सागर यांच्या या आरोपांवर पालिका आता काय उत्तर देते याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत