सौदी अरेबियाचे ‘नियोम’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-Jan-2022   
Total Views |

NEOM



जागतिक बाजारपेठेत येत्या काही वर्षांत इंधन तेलाचे महत्त्व बर्‍यापैकी कमी झालेले असेल. त्याचा विपरित परिणाम वर्षानुवर्षांपासून इंधन तेलाच्या व्यापारातून अब्जावधी डॉलर्स कमावलेल्या सौदी अरेबियासारख्या देशावर होणे साहजिकच. म्हणूनच बदलत्या काळाशी जुळवून घेत नव्या जगाने आपल्याशी सातत्यपूर्ण संबंध राखावे, या इच्छेने सौदी अरेबिया स्वतःमध्ये अनेकानेक सुधारणा घडवून आणत आहे.
 

 
त्यामागचा उद्देश अन्य देशांना, उद्योजक-उद्योगांना आपल्याकडे आकर्षून घेण्याचा आणि सौदी अरेबियाचे महत्त्व अबाधित ठेवण्याचा आहे. त्या बदलांमध्ये महिलांच्या वाहन चालवण्यावरील बंधने हटवणे, धार्मिक कट्टरपंथीयांवर अंकुश लावणे, योग दिनाला मान्यता देणे आणि अन्य मानवाधिकार प्रदान करणार्‍या निर्णयांचा समावेश होतो. आणखी काही वर्षांत सौदी अरेबिया इतरही अनेक मागासलेले निर्बंध रद्द करत अधिकाधिक उदारमतवादी धोरण स्वीकारण्याची शक्यता आहे.



जेणेकरुन त्याची प्रतिमा सुधारेल आणि परकीय गुंतवणुकीचा प्रवाह सौदी अरेबियात येत राहील. अर्थात, या सुधारणांची सुरुवात २०१७ साली मोहम्मद बिन सलमान ‘क्राऊन प्रिन्स’ झाल्यापासूनच सुरु झाली. त्याआधी सौदी अरेबियात बदलांचे वारे नव्हतेच.मोहम्मद बिन सलमान सत्तेच्या प्रमुखपदी आल्यापासून देशबदलाच्या मालिकेंतर्गतला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अत्याधुनिक नियोम शहराची निर्मिती. पाच वर्षांपूर्वी रियाधमध्ये ‘फ्युचर इन्व्हेस्टमेंट इनिशिएटीव्ह’ संमेलनात नियोमची घोषणा करण्यात आली होती.
 
 
 
त्यानुसार लंडनपेक्षा १७ पट अवाढव्य नियोम शहर तबुक राज्यात जॉर्डन आणि इजिप्तच्या सीमेवर तयार केले जाणार असून २०२५ पर्यंत लोकांना राहण्यासाठी उपलब्ध होईल. पाचशे अब्ज डॉलर्सच्या खर्चाने निर्माण केले जाणारे नियोम शहर सौर आणि पवनऊर्जेद्वारेचालवले जाईल. सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स’ मोहम्मद बिन सलमान यांनी सांगितल्यानुसार नियोम शहर ड्रोनफ्रेंडली आणि रोबोटिक्सच्या विकासासाठीचे केंद्र म्हणून ओळखले जाईल.
 
 
 
शहराच्या नियोजन आराखड्यानुसार, नियोममध्ये ‘ब्लेड रनर, बॅक टू द फ्युचर दोन’ यासारख्या ‘सायन्स फिक्शन’ चित्रपटाप्रमाणे उडत्या टॅक्सी असतील. सौदी अरेबियात पाऊस पडत नाही, पण ‘क्लाऊड सीडिंग’ तंत्रज्ञानाच्या वापरातून नियोममध्ये ढग तयार केले जातील आणि पाऊसही पडेल. इतकेच नव्हे तर एका विचित्र प्रस्तावानुसार ज्युरासिक पार्क शैलीमध्ये डायनासोर रोबोटचीही नियोममध्ये निर्मिती केली जाईल.
 
 
 
रोबोट मार्शल आर्टदेखील तयार केले जातील, इथे ते लोकांच्या मनोरंजनासाठी एकमेकांशी द्वंद्व करतील. महत्त्वाचे म्हणजे, नियोममध्ये लोकांच्या सुरक्षेपासून, लॉजिस्टिक्स, होम डिलिव्हरी, वृद्धांची सेवा ते नोकराची कामे करण्यासाठीही रोबोट असतील. मात्र, या सगळ्यावर कडी करणारा प्रस्ताव म्हणजे कृत्रिम चंद्राची निर्मिती. सौदी अरेबिया नियोममध्ये कृत्रिम चंद्राची निर्मिती करु इच्छितो. हा प्रकल्प नियोम शहराच्या निर्मितीत मैलाचा दगड सिद्ध होऊ शकतो. शहरातील प्रस्तावित सिल्व्हर बीच चंद्राच्या प्रकाशात उजळावा, अशी मोहम्मद बिन सलमान यांची इच्छा आहे.



तथापि, तसे कोणत्या तंत्रज्ञानाने होईल यावर अजूनही संशय आहे.दरम्यान, सौदी अरेबिया आपल्या या महत्त्वाकांक्षी नियोम शहर निर्मितीच्या माध्यमातून संयुक्त अरब अमिरात आणि कतारसारख्या आपल्या स्पर्धक आखाती देशांपासून पुढे जाऊ पाहात आहे. नियोम सौदी अरेबियाच्या इंधन तेलावर पूर्णपणे अवलंबून अर्थव्यवस्थेत विविधता आणण्याच्या मोहम्मद बिन सलमान यांच्या ‘व्हिजन २०३०’चा भाग आहे.
 
 
 
सौदी अरेबिया जगातील प्रतिभाशाली आणि सर्वश्रेष्ठ उद्योजक-उद्योगांना आकर्षित करुन एक प्रमुख वाणिज्यिक केंद्र म्हणून नियोमचा विकास करु इच्छितो. शहराच्या नियोजन आराखड्यानुसार, रोबटच परकीय व्यावसायिकांच्या घरांतील कामकाज करतील. सौदी अरेबियामध्ये मद्यावर बंदी आहे, पण नियोम शहरात मद्यवापराला परवानगी देण्याला सौदी अरेबियाने फेटाळलेले नाही.
 
 
 
सौदी अरेबियासारख्या इस्लामी प्रथा-परंपरेत अडकलेल्या देशाने मद्याला परवानगी दिल्यास ती ऐतिहासिक घटना असेल. एकूणच, सौदी अरेबिया नव्या काळात अप्रासंगिक होऊ इच्छित नाही. इंधन तेलावरील जगाचे अवलंबित्व कमी झाल्यास त्यांनी नियोमसारख्या अत्याधुनिक आणि कल्पनातीत शहरात यावे, व्यापार-गुंतवणूक करावी आणि अर्थव्यवस्थेला हातभार लावावा, असेच सौदी अरेबियाचे धोरण असल्याचे दिसते.






@@AUTHORINFO_V1@@