नवी दिल्ली : मध्य काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात सुरक्षा दलांना पुन्हा एकदा मोठे यश मिळाले आहे. सुरक्षा दलांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. सध्या परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बडगाम जिल्ह्यातील चदूरा भागात गुरुवारी रात्री सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले. चदूरा भागात दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. माहिती मिळताच सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केल्यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. सुरक्षा दलांना प्रथम एका दहशतवाद्याला ठार करण्यात यश आले. त्यानंतर आणखी दोन दहशतवादी मारले गेले.
काश्मीरचे पोलीस महानिरीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले असून हे सर्व दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत. आतापर्यंत एकाची ओळख श्रीनगर शहरातील वसीम अशी झाली आहे. घटनास्थळावरून तीन एके ५६ रायफलसह दारुगोळा आणि गुन्हेगारी साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी सांगितले की, सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. चदूरा भागातील जलुवा गावात दहशतवादी असल्याच्या माहितीवरून सुरक्षा दलांनी शोध मोहीम सुरू केली. जवानांचा घेरा मजबूत होत असल्याचे पाहून लपलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. जवानांनी संयम बाळगत त्यांना आत्मसमर्पण करण्याची संधी दिली. मात्र ते मान्य झाले नाही आणि गोळीबार सुरूच ठेवला. अनेक संधी देऊनही जेव्हा दहशतवाद्यांनी आत्मसमर्पण केले नाही तेव्हा जवानांच्या प्रत्युत्तराने चकमक सुरू झाली.