'पिण्याच्या पाण्याच्या टाकीत कुत्रा मरून सडला होता' : स्थानिक

विक्रोळीतील स्थानिकांनी मांडली पालिकेच्या गलथान कारभाराची कथा

Total Views |

varshanagar



मुंबई:
घाटकोपर भागातील पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत चालली आहे. मुंबई महापालिकेने कंत्राटी पद्धतीने या टाक्यांची देखभाल करण्यासाठी खासगी मंडळाशी करार केलेला आहे. मात्र या मंडळाच्या दुर्लक्षामुळे दूषित आणि यावेळी होणाऱ्या पाणीपुरवठामुळे नागरिक त्रस्त आहेत. 'पिण्याच्या पाण्याच्या टाकीत कुत्रा मरून पडला. अक्षरशः सोडून गेला तरीही कोणीही त्याकडे लक्ष दिलं नाही', अशी व्यथा स्थानिक नागरिकांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना मांडली.

साधारण ५० ते ६० हजारांच्या घरात लोकवस्ती असणाऱ्या वर्षानगर भागात अनेक घरकाम करणाऱ्या महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या त्रासाचा सामना करावा लागतो. रात्री साडेअकराच्या सुमारास याभागात पालिकेकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र अद्यापही प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन नाही. जिथे पाणी येते तेथेही कमी दाबाने पाणीपुरवठा होतो. तर पाण्याची टाकी असणारा परिसरात दुर्गंधी, कचरा आणि घाणीने वाढल्याचे विदारक चित्र वर्षानगर पाण्याच्या टाकीभोवती दिसून येते. याच टाकीत दोन वर्षांपूर्वी कुत्रा मरून पडला होता. तो कुत्रा टाकीत सडून गेला तरीही पालिकेने किंवा देखभाल करणाऱ्या मंडळांनी पूर्णतः दुर्लक्ष केलं, असे स्थानिक सांगतात. कोट्यवधींची थकबाकी करणाऱ्या या मंडळांवर पालिका कारवाई का करत नाहीये? असाही सवाल स्थानिक नागरिक करत आहेत.
गेल्या कित्येक वर्षांपासून आपण या सर्व गोष्टींचा पाठपुरावा करत आहोत. २००२मध्ये ही टाकी बांधण्यात आली आणि एका खासगी मंडळाकडे चालविण्यासाठी देण्यात आली. वर्षानगर तरुण मित्रमंडळाकडे ही टाकी चालविण्यासाठी देण्यात आलेली आहे. त्यानंतर कधीही या टाकीची डागडुजी झाली नाही. इथे सुरक्षा रक्षक नाही, दुर्गंधी आणि अस्वच्छतेचं वातावरण आहे. अवैध मोटारसायकली इथे पडून आहे. आम्ही आजही पाठपुरवठा करत आहोत की ही पाण्याची टाकी महापालिकेने ताब्यात घ्यावी. मात्र संबंधित मंडळावर ५ कोटींची थकबाकी आहे. म्हणून पालिका ही टाकी ताब्यात घेत नाहीये. स्थानिक आमदार राम कदम यांनी इथल्या हायड्रोक्लोरिक इंजिनिअर होते राठोड म्हणून त्यांच्याशी बैठक घेतली. या बैठकीत आम्ही मागणी केली की पालिकेने ही टाकी ताब्यात घ्यावी मात्र पालिकेने नियमांवर बोट ठेवत अद्याप निर्णय केला नाही. मात्र यामध्ये स्थानिक, टेकडीवर राहणाऱ्या नागरिकांचे हाल होतायेत. मोठ्याप्रमाणावर अनधिकृत नळाचे कनेक्शन देण्यात येत आहेत. एका कनेक्षनमागे ५० ते ६० हजार रुपये घेतले जातायेत.

- संदीप त्रिपाठी, भाजप



रात्री साडेनऊ दहाला पाणी येत. ४० मि. पाणी असत मात्र पाण्यावरून खूप भांडण होतात. एक तोटीवर २ नंबर आम्ही पाणी भरतो. ५ ते ६ हांडे पाणी मिळतं. मात्र पाण्यावरून अक्षरशः डोकं फोडेपर्यंत भांडण होतात. सूर्यनगर पोलीस स्थानकात पार्क साईट पूर्ण गाजलेली आहे भांडणासाठी. या पाण्यामुळे आमच्या लहान, कमी वयाच्या मुलांवर केसेस दाखल आहेत त्यांचे करिअर खराब झाले आहे. पाण्याच्या राजकारणामुळे इथली परिस्थिती वाईट आहे. अजिबात स्वच्छता नाही.


- स्थानिक महिला



आम्ही किती तक्रारी करायच्या. एकट्या बाईला कोणीही जुमानत नाही. त्यामुळे जेवढं मिळतं तेवढ्यात आम्ही समाधान मानतो. आम्ही बाईमाणूस कुठे पळणार आहे? १० - १५ जण असतील तर आम्ही पळू शकतो. एक दिवसआड अंघोळ करतो आम्ही कारण पाणीच नाही. इथले लोक तक्रार करायला घाबरतात. पाणी रात्री अकरा-साडेअकरा वाजता येतं. आम्ही पहाटे ४ वाजल्यापासून कामासाठी पळत असतो रात्रीही जगावं लागत या पाण्यासाठी. याचा विपरीत परिणाम आमच्या आरोग्यावर होतोय. लोक घाबरतात म्हणून कोणी बोलत नाही.

- स्थानिक महिला





आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहमदनगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूटमधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयातून पदव्युत्तर शिक्षण. सध्या मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर कार्यरत.