नवी दिल्ली : हैदराबाद मधल्या शमशाबाद येथे बांधण्यात आलेल्या संत आणि समाजसुधारक रामानुजाचार्यांच्या मुर्तीचा अनावरण सोहळा ५ फेब्रुवारी आयोजित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुर्तीचे अनावरण होणार आहे. एकूण ४५ एकरच्या जागेत ही मुर्ती बांधण्यात आला असून २१६ फूट उंच असणाऱ्या या मुर्तीस 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी' असे नाव देण्यात आले आहे.
रामानुजाचार्यांच्या १००० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमास 'रामानुज सहस्राब्दी समारंभ' असे नाव दिले आहे. यावेळी रामानुजाचार्यांच्या दोन मूर्तींचे अनावरण करण्यात येणार असल्याचे सांगितले जाते. २१६ फूट उंचीची ही मूर्ती सोने, चांदी, तांबे, पितळ आणि जस्त यांनी बनवली आहे. तर दुसरी मूर्ती मंदिराच्या गाभाऱ्यात बसवण्यात येणार आहे. रामानुजाचार्यांच्या १२० वर्षांच्या प्रवासाच्या स्मरणार्थ १२० किलो सोन्यापासून ती बनवण्यात आली आहे.
'या मूर्तीसोबत एकूण १०८ मंदिरं बांधण्यात आली आहेत. स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी तयार करण्यासाठी १८ महिने लागले. शिल्पकारांनी यासाठी अनेक डिझाइन्स तयार केल्या होत्या. त्यांची पडताळणी करून मग ही मूर्ती तयार करण्यात आली.', असे त्रिदंडी चिन्ना जयार स्वामी यांनी सांगितले.
असे आहे मुर्तीचे स्वरूप...
आचार्य रामानुजाचार्य यांच्या मुर्तीजवळ ५ कमळाच्या पाकळ्या, २७ पद्मपीठं, ३६ हत्तींची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. तसेच मुर्तीपर्यंत जाण्यासाठी १०८ पायर्या तयार करण्यात आल्या आहेत. कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या १०३५ हवनकुंडांमध्ये सुमारे दोन लाख किलो गाईचे तूप टाकून हवन करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
संत रामानुजाचार्य यांच्याविषयी...
वैष्णव संत रामानुजाचार्य यांचा जन्म १०१७ साली तामिळनाडूच्या श्रीपेरुंबदूर येथे झाला. त्यांचा जन्म तमिळ ब्राह्मण कुटुंबात झाला. कांची येथे गुरु यमुनाचार्यांकडून त्यांनी दीक्षा घेतली. श्रीरंगम येथील यथीराज नावाच्या संन्यासीकडून संन्यास घेतला. यानंतर त्यांनी भारतभर फिरून वेदांत आणि वैष्णव धर्माचा प्रसार केला. या काळात त्यांनी श्रीभाष्याम् आणि वेदांत संग्रह या ग्रंथांची रचना केली. रामानुजाचार्य यांनी वयाच्या १२० व्या वर्षी म्हणजेच ११३७ मध्ये श्रीरंगम येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रामानुजाचार्य यांनी वेदांत तत्त्वज्ञानावर त्यांचे विशिष्ट द्वैत वेदांत प्रस्तुत केले होते. रामानुजाचार्य स्वामी यांनी सर्वप्रथम समतेचा संदेश दिला आणि त्यासाठी त्यांनी देशभर प्रवासही केला.