पाकिस्तानात हिंदू असणे हाच गुन्हा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-Jan-2022   
Total Views |

Hindu in Pakistan
 
 
 
धर्माच्या आधारावर भारतातून निर्मिती झाल्यापासूनच पाकिस्तानने भारतविरोधी भूमिका घेतली. पाकिस्तानला न केवळ भारताचा तर हिंदूंचादेखील तिरस्कार असल्याचेच त्यांच्या सध्याच्या कृतीवरून दिसून येत आहे. चालू वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच दि. २ जानेवारीला पाकिस्तानातील सिंध प्रांतात व्यापारी असलेले सुनील यांची चाकूने भोसकून हत्या झाल्याचे वृत्त आहे. त्यांचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून होता. दुसर्‍या दिवशी १५ वर्षीय रजनी नावाच्या बालिकेचे बदीन जिल्ह्यातील गोली राच शहरातून ४१ वर्षीय मनुल्ला या व्यक्तीने अपहरण केले. रजनीचा धर्म बदलला, फातिमा शेख असे नवीन नाव त्या बालिकेला देण्यात आले आणि बळजबरीने लग्न लावून देण्यात आले. तर दिवाण कमलेश कुमार यांचे १५ जानेवारी रोजी सिंधमधील मोर शहरात अपहरण करण्यात आले आणि दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला. दि. १७ जानेवारी रोजी कराचीतील सर्वात उच्चभ्रू भागात क्लिफ्टन येथे बँकेतून पैसे काढणार्‍या एका व्यावसायिकाला भरदिवसा चाकूने भोसकून पैसे लुटण्यात आले होते. सिंधमध्येच १९ जानेवारी रोजी आठ वर्षांच्या कान्हा नावाच्या बालिकेवर बलात्कार करण्यात आला आणि नंतर दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आली. पाकिस्तानमध्ये या महिन्यातील ही पाचवी हिंदूहत्या आहे. नंतर २३ जानेवारीला थारपारकर जिल्ह्यातील मिट्टी तालुक्यातील खत्री मोहल्ला येथील हिंगलाज भवानीचे मंदिर पाडण्यात आले.
 
 
 
या शहरातील हिंदू लोकसंख्या ७६.३ टक्के आहे. ‘कर्तारपूर साहिब कॉरिडोर’च्या माध्यमातून पाकिस्तान अल्पसंख्याक शिखांना खूश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत असले तरी, गेल्या २२ महिन्यांत पाकिस्तानातील हिंदू मंदिरांवर झालेला हा ११वा मोठा हल्ला आहे. परंतु, गेल्या वर्षी पाकिस्तानने हिंदूंसाठी विनाश घडवून आणला. २०२१ मध्ये तेथे हिंदू मंदिरांवर हल्ला झाला. २० हजार हिंदूंचे धर्मांतर करण्यात आले. ११ मंदिरे पाडण्यात आली. २८ हिंदूंची हत्या करण्यात आली आणि धार्मिक छळामुळे १८ जणांनी आत्महत्या केल्या. मोठी गोष्ट अशी की, पाकिस्तान हा जगातील एक दुर्मीळ देश आहे, जो आपल्या अल्पसंख्याक लोकसंख्येची आकडेवारी लपवतो. दुर्दैवाने, कट्टरपंथी, दहशतवादी टोळ्यांचे पाठबळ असलेले आणि राजकीयदृष्ट्या शक्तिशाली लोक पाकिस्तानमधील हिंदूंच्या संपूर्ण लोकसंख्येचा तिटकारा करतात. हिंदूंना संपवून टाकण्याची संपूर्ण इच्छा हे लोक बाळगून आहेत. त्याच वर्षी, सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेल्या सिंध प्रांतातील हरुनाबाद जिल्ह्यातील मिट्टी शहरातील ३ हजार ७०० लोक आणि जेकबाबाद जिल्ह्यातील सागर शहरातील ५ हजार ७०० लोकांचे धर्मांतर करून तेथील मंदिरांना कुलूप लावण्यात आले. पाकिस्तानात धर्मांतरविरोधी कायदे केले जातात, पण कट्टरतावादी जमातच्या विरोधामुळे ते थंडबस्त्यात जातात. गेल्या वर्षी १८ वर्षांखालील लोकांच्या धर्मांतरावर बंदी घालणारा कायदा आला, पण मुल्ला आणि मौलवींच्या विरोधामुळे तो मागे घेण्यात आला. पाकिस्तानच्या मानवाधिकार आयोगाच्या गेल्या वर्षीचा अहवाल मान्य करतो की, देशात दरवर्षी अल्पसंख्याक समाजातील सुमारे एक हजार मुलींचे धर्मांतर केले जाते आणि त्यांचे वय १२ ते २५ वर्षे आहे. २००४ ते २०१८ या काळात एकट्या सिंधमध्ये हिंदू मुलींच्या अपहरणाच्या ७ हजार ४३० घटना घडल्या.
 
 
  
सर्वात मोठी समस्या पाकिस्तानच्या शिक्षण व्यवस्थेची आहे. तेथील शालेय पुस्तकांमध्ये हिंदूंना खलनायक आणि स्वातंत्र्यलढ्यातील मुस्लीम लीग आणि काँग्रेसच्या भूमिकेचे वर्णन हिंदू-मुस्लीम संघर्ष असे केले आहे. तेथील पुस्तकांमध्ये देशातील हिंदूंची भारताशी असलेली निष्ठा जोडलेली आहे. पाकिस्तानी राज्यघटनेतील ‘कलम २०-२२’ मध्ये धार्मिक स्वातंत्र्याचा उल्लेख आहे. परंतु, जुलै १९७७ मध्ये झिया-उल-हक यांनी देशात ‘मार्शल लॉ’ जाहीर केला आणि बिगर मुस्लिमांच्या धार्मिक स्वातंत्र्यावर बंधने घालण्यासाठी संविधान बदलले. आता पाकिस्तानात राष्ट्रपती केवळ मुस्लीम होऊ शकतात आणि सर्व उच्चपदांवर मुस्लीम वचनांसह शपथ घेणे बंधनकारक आहे. मग पाकिस्तानच्या ईशनिंदा कायद्याच्या नावाखाली ‘मॉब लिंचिंग’मध्ये कोणाचीही हत्या करण्यावर विशेष कारवाई केली जात नाही. दीड महिन्यांपूर्वी श्रीलंकेतील एका कापड गिरणीच्या व्यवस्थापकाची अशाच आरोपावरून निर्घृण हत्या करण्यात आली होती. पाकिस्तान आपल्या विकासावर लक्ष केंद्रित न करणारा देश आहे. हे अनेकदा समोर आले आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये घडणार्‍या या घटना पाकिस्तान असहिष्णू असल्याचेच द्योतक आहे.
 
 
@@AUTHORINFO_V1@@