दाभोळकर हयात असतानाच त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी केलेले कार्य सुधारणेच्या कक्षेतून श्रद्धेचीच चेष्टा करण्याकडे निघून गेले होते. स्वतः डॉ. नरेंद्र दाभोळकर मात्र अशा अविवेकी उपक्रमात कधी सहभागी झाल्याचे स्मरत नाही. त्यांनी तो विवेक पाळला होता, मात्र दाभोळकरांचे नाव घेऊन ढोंगी पुरोगामी नेते होऊ इच्छिणार्यांनी या विवेकाला खूप आधीच हरताळ फासला.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे (अंनिस) संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची दुर्दैवी हत्या झाली आणि ‘अंनिस’ कोण चालवणार, असा प्रश्न निर्माण झाला. ‘अंनिस’च्या महाराष्ट्रभर पसरलेल्या तथाकथित युवाशक्तीवर वर्चस्व कोणाचे राहणार, असा हा प्रश्न होता. अर्थात, हा प्रश्न दाभोळकरांच्या हत्येनंतरच उपस्थित झाला असे नव्हे, तर या तथाकथित वर्चस्वासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर हयात असतानाच संघर्ष सुरू झाला होता. आताही ‘अंनिस’चे अध्यक्ष एन. डी. पाटील यांचे निधन झाले आणि ‘अंनिस’ संघटना व ‘अंनिस’ ट्रस्टमधील अधिकारांवरून ‘अंनिस’च्या हमीद-मुक्ता दाभोळकर व अविनाश पाटील गटामधील संघर्ष दाभोळकरांच्या हत्येनंतर इतक्या वर्षांनी अधिक ठळकपणे अधोरेखित झाला. ‘अंनिस’ संघटना आणि ‘अंनिस’ ट्रस्टच्या ताब्याचा हा वाद आहे. दरम्यान, ‘अंनिस’मधल्या वर्चस्वाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी घेतलेली विवेकाशी फारकत समजून घेण्यासाठी थोडे मागे जावे लागेल. दाभोळकर हयात असतानाच त्यांच्याच कार्यकर्त्यांच्या माध्यमातून डॉ. नरेंद्र दाभोळकरांनी केलेले कार्य सुधारणेच्या कक्षेतून श्रद्धेचीच चेष्टा करण्याकडे निघून गेले होते. स्वतः डॉ. नरेंद्र दाभोळकर मात्र अशा अविवेकी उपक्रमात कधी सहभागी झाल्याचे स्मरत नाही. त्यांनी तो विवेक पाळला होता, मात्र दाभोळकरांचे नाव घेऊन ढोंगी पुरोगामी नेते होऊ इच्छिणार्यांनी या विवेकाला खूप आधीच हरताळ फासला. वस्तुतः श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा अतिशय पुसट आहे. दोन्हीतील सीमारेषा नेमकी कोणती, हे सांगणार्या-ऐकणार्या वा मानणार्या-न मानणार्यावर अवलंबून असते. मुला-मुलींची आई-वडिलांवर श्रद्धा असते, विद्यार्थ्यांची आपल्या शिक्षकांवर श्रद्धा असते, अपवाद वगळता बहुतेकांची ईश्वरावर श्रद्धा असते, बुद्धिवादी-विचारवंतांची विचारांवर श्रद्धा असते, विज्ञाननिष्ठांची प्रयोगातून समोर येणार्या निष्कर्षांवर श्रद्धा असते. श्रद्धेला जोपर्यंत विवेकाचा आधार असतो तोपर्यंत ती मानवी जीवनाला समृद्ध करते, तर विवेकाचा आधार सुटला की त्याचे रुपांतर अंधश्रद्धेत होते.
‘अंनिस’चे काम वरीलपैकी ईश्वर विषयाशी संबंधित हिंदू धर्मातील श्रद्धा-अंधश्रद्धेबाबतच होते. हिंदू धर्माला अंधश्रद्धा-कर्मकांडाचे स्तोम माजणे आदी गोष्टींचा शाप होता आणि आहेच. मात्र, त्याचा अतिरेक झाला की हिंदू धर्मातूनच त्याला आळा घालणारी ऊर्जा निर्माण होते, उभी राहते, कार्यरत होते. अन्य धर्मात असे होताना दिसत नाही. मात्र, हिंदू धर्माचे हे मर्मस्थान न ओळखता हिंदूंच्या श्रद्धांची टवाळकी करण्यातच गेल्या काही काळात महाराष्ट्रातील तथाकथित पुरोगाम्यांनी धन्यता मानली. डॉ. नरेंद्र दाभोळकरांप्रमाणे काही भरीव काम न करता त्याच लोकांनी आता पद-प्रतिष्ठेसाठी परस्परांशी कुत्र्या-मांजराप्रमाणे भांडण सुरू केल्याचे दिसून येते. दरम्यान, महाराष्ट्रात सातत्याने अनेक चळवळी निर्माण झाल्या, वाढल्या आणि काळाच्या ओघात त्यांचा प्रभाव ओसरलादेखील. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते स्वातंत्र्योत्तर आजपर्यंत त्याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती पाहायला मिळतात. खरेतर साचलेपणा हा मुळातच हिंदूंचा, हिंदू धर्माचा स्थायीभाव नाही. हिंदू व हिंदू धर्म काळाबरोबर प्रवाहीच होत आल्याचे मागील हजारो वर्षांच्या इतिहासावरुन स्पष्ट होते. म्हणूनच हिंदू समाजात काम करणार्या व्यक्तीला किंवा संस्थांना काळानुसार नव्याने निर्माण होणारी आव्हाने ओळखावी लागतात आणि त्यांना अनुरुप उत्तरेदेखील शोधावी लागतात. अर्थात, हे काही एका ठराविक कालावधीपुरते चालणारे काम नाही, तर ती सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. दाभोळकरांची हत्या झाल्यानंतर त्यांनी उभारलेला विवेकाचा झेंडा ताब्यात घेण्यासाठी नको नको ती निदर्शने करणारी मंडळी नंतर काय करताना दिसली, हे जगजाहीर आहे. विवेकाच्या नावाखाली कोट्यवधी वर्षांची परंपरा असलेल्या ईश्वरी अस्तित्वाबाबत शंका निर्माण करण्याचे काम यातून हिरिरीने केले गेले. नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांनी ‘देवाला रिटायर करा’ अशी भाषा केली. वस्तुतः एखाद्याच्या श्रद्धेने अन्य कोणाला अपाय होत नसेल, अन्य कोणाचे शोषण होत नसेल, तर त्या ‘श्रद्धेला-देवाला रिटायर करा,’ असे म्हणून हिणवण्याचे कारण नाही. मात्र, विवेकाचा झेंडा मिरवणारे आपल्या मताच्या विपरित स्थितीत किती असहिष्णु असतात, याचे ते उदाहरण होते. आता डॉ. दाभोळकरही नाहीत आणि डॉ. लागूही नाहीत आणि ‘अंनिस’च्या चळवळीचा मराठी माणसाच्या मनावरचा पगडाही उतरला आहे. त्या पार्श्वभूमीवर ‘अंनिस’मधील संघर्ष कोणत्या दिशेने जात आहे, हे लक्षात येते.
‘अंनिस’ने जादूटोणाविरोधी कायद्याच्या मागणीत गोमय व गोमुत्राच्या वापरावरही आक्षेप घेतला होता. मात्र, गोमय व गोमुत्राशी संबंधित गोविज्ञानाचे शेती व विविध आजारांशी निगडित प्रयोग व निष्कर्ष वादातीत आहेत. गोमय व गोमुत्रामुळे शेतीवर होणारे परिणाम फायदेशीर आहेत. अनेक गंभीर आजारावरही गोमय व गोमुत्राच्या औषधांचा वापर केला जात आहे. गोमय व गोमुत्राबाबत ‘निरी’सारख्या संस्थाही हिरिरीने संशोधन करत आहेत. म्हणजेच, ‘अंनिस’सारख्यांनी केलेल्या विरोधापेक्षाही गोमय व गोमुत्राबाबतची वस्तुस्थिती पूर्णपणे निराळी आहे. मात्र, आपल्यालाच सगळ्यातले सगळे कळते असे समजणार्या, प्रश्नांवरील उत्तराची वाट न पाहणार्यांनी गोमय व गोमुत्राबाबत अपप्रचारावरच जोर दिला होता. अशाप्रकारे हिंदू, हिंदू धर्म व हिंदू धर्माच्या आस्थेच्या विषयांविरोधात उभे राहणारेच आज मात्र एकमेकांशी भांडताना दिसत आहेत. अर्थात, असे सगळे असले, तरीही महाराष्ट्रातील एक सक्षम चळवळ अशा प्रकारे अधोगतीकडे चालली आहे, हे आमच्यासाठी क्लेशकारकच. कोणे एकेकाळी विवेकाचे नाव घेणारी, राज्यात प्रभावी असलेली चळवळ आता प्रभावहीन झाली. या चळवळीत नव्या पिढीची, तरुणांची मोठ्या प्रमाणावर वानवा निर्माण झाली. दाभोळकरांचे सगळेच विचार व त्यांच्यानंतर त्यांच्या मुलांचे नेतृत्व लादण्याचा प्रयत्न आम्हाला पटला, असे नाही. परंतु, महाराष्ट्राच्या मातीत निर्माण झालेली व एकेकाळी अत्यंत चर्चेत असलेली ही चळवळ आज अशाप्रकारे कोमेजत असताना पाहणे दुःखद आहे.