अंबरनाथ : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी तरुणाच्या हत्येच्या घटनेने अंबरनाथ शहरात खळबळ माजली असतानाच सलग दुसऱ्याच दिवशी शहरात तीन मित्रांनी एका तरुणीवर सामुहिक बलात्काराची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तीनही आरोपींना अटक करण्यात आली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली.
अंबरनाथ येथील आनंदनगर अतिरिक्त औद्योगिक परिसरात असलेल्या जीआयपी धरण परिसरात रविवारी, दि. २ जानेवारी रोजी हा प्रकार उघडकीस आला. अंबरनाथ शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी एका तरूणाच्या हत्येने खळबळ माजली होती. याप्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीला अटक केली. या घटनेतील आरोपीला न्यायालयात सादर करण्यापूर्वीच अंबरनाथ शहरात सामुहिक बलात्काराचा प्रकार समोर आला आहे.
रविवारी दुपारच्या सुमाराला अंबरनाथच्या अतिरिक्त औद्योगिक वसाहतीच्या शेजारी असणाऱ्या रेल्वेची मालकी असलेल्या जीआयपी धरणाच्या परिसरात फिरणाऱ्यासाठी गेलेल्या तरूणी आणि तिच्या तीन मित्रांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. या घटनेनंतर तरूणीने अंबरनाथ पूर्वेतील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. हे तीनही आरोपी २५ ते ३० वयोगटातील असून तक्रारदार तरूणीचे ते मित्र आहेत, या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहितीही वरिष्ठ पोलीस निरिक्षक मधुकर भोगे यांनी दिली.