चिपळूण - महापुरातून सावरताना...

    29-Jan-2022
Total Views | 224

Chiplun 1
 
 
 
चिपळूणमधील महापूराच्या घटनेला आता सहा महिने लोटले. सा. ‘विवेक’ आणि ‘महाएमटीबी’च्या टीमने त्यावेळी देखील पूरपरिस्थितीचे आणि तेथील मदतकार्याचा सविस्तर आढावा घेतला होता. पण, गेल्या सहा महिन्यांत चिपळूणमधील जनजीवन कमालीच्या वेगाने पूर्ववत झालेले दिसते. याचं श्रेय जेवढं तिथे तत्परतेने झालेल्या मदतकार्याला देता येईल, तितकंच हार न मानता परिस्थितीशी दोन हात करण्याच्या चिपळूणकरांच्या चिवट वृत्तीलाही द्यावं लागेल. चिपळूण इतक्या अल्पावधीत महापुरातून कसं सावरलं, याविषयीचं कुतूहल पुन्हा एकदा आमच्या टीमला चिपळूणला घेऊन गेलं. त्याविषयीचे व्हिडिओ रिपोर्ताज करतानाच्या अनुभवांचे हे शब्दांकन...
 
 
 
‘परशुरामभूमी’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या कोकणाला निसर्गाचं वरदान लाभलं आहे, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. पण, या निसर्गाचा जेव्हा प्रकोप होतो, तेव्हा मात्र हे वरदानच शाप ठरतं. जुलै २०२१ मध्ये म्हणजे साधारण सहा महिन्यांपूर्वी कोकणासहित महाराष्ट्रातील अनेक भागांत पूरपरिस्थिती निर्माण झाली. चिपळूणची ओळख असलेल्या वशिष्ठी नदीने धोक्याची पातळी ओलांडली. परिणामी, चिपळूण शहराला आणि त्याच्या आसपासच्या परिसरालाही महापुराचा मोठा फटका बसला. भरतीची वेळ, संततधार आणि मुसळधार पाऊस, जोडीला कोयना धरणाचे दरवाजेही उघडले गेले. मध्यरात्रीतच सगळा परिसर जलमय झाला. लोकांच्या घरांमध्ये, दुकानांमध्ये पाणी शिरुन स्थावर मालमत्तेचं प्रचंड नुकसान झालं. इमारतीचे दोन दोन मजले पाण्याखाली दिसेनासे झाले. रस्त्यांवरील वाहनं जलप्रवाहात कागदाच्या बोटीसारखी वाहून गेली. आजुबाजूच्या छोट्या गावांतील मातीची अनेक घरं उद्ध्वस्त झाली. जीवितहानी टळली, ही त्यातल्या त्यात सुदैवाची बाब. संपर्काच्या सर्व यंत्रणा खंडित होत्या. वीजपुरवठा बंद. सर्वदूर नुसता काळोख. पूर ओसरल्यानंतरही रस्त्यांवर, लोकांच्या घरांमध्ये, गाळ्यांमध्ये होतं ते फक्त चिखल-गाळाचं साम्राज्य...
 
 
 
आपला संसार, सर्वस्व गाळाने गिळंकृत करताना चिपळूणकर पाहात होते, पण ते हतबल होते. अशा संकटस्थितीतही लोक एकमेकांना सावरण्यासाठी पुढे सरसावले होते. स्वत:च्या नुकसानाचं रडगाणं न गाता प्रत्येक जण मदतकार्यात हिरीरीने सहभागी होता. महापुरानंतरच्या परिस्थितीचं प्रसारमाध्यमांवरील वार्तांकन पाहून राज्याच्या आणि देशाच्या कानाकोपर्‍यातून मदतीचा ओघ चिपळूणकडे प्रवाही झाला. या मदतीचं वाटप करण्यासाठी येथील यंत्रणांनी सक्रिय पुढाकार घेतला. नेहमीप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आणि जनकल्याण समितीने या मदतकार्यात आपलं मोठं योगदान दिलं. आपत्तीग्रस्तांसाठी खाण्यापिण्याची व्यवस्था असो, रेशनिंगचं सामान असो, कपडालत्ता असो, औषधोपचार असो किंवा महिलांसाठी सॅनिटरी पॅड्स असो.. या सगळ्याच्या वितरणाची शिस्तबद्ध व्यवस्था संघकार्यालयात लावण्यात आली होती. त्यामध्ये स्थानिक आणि बाहेरून आलेले स्वयंसेवक, महिला कार्यकर्त्या उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या. या सर्व परिस्थितीचं आणि मदतकार्याचं व्हिडिओ वार्तांकन सा. ‘विवेक’ आणि ‘महाएमटीबी’च्या डिजिटल व्यासपीठावरून करण्यात आलं होतं.
 
 

Chiplun 2 
 
 
या घटनेला आता सहा महिने उलटून गेले. मागील सहा महिन्यांत येथील जनजीवन कमालीच्या वेगाने पूर्ववत झालं आहे. याचं श्रेय जेवढं येथे तत्परतेने झालेल्या मदतकार्याला देता येईल, तितकंच हार न मानता परिस्थितीशी दोन हात करण्याच्या चिपळूणकरांच्या चिवट वृत्तीलाही द्यावं लागेल. चिपळूण इतक्या अल्पावधीत महापुरातून कसं सावरलं, याविषयीचं कुतूहल पुन्हा एकदा आमच्या टीमला चिपळूणला घेऊन गेलं. त्याचा व्हिडिओ ‘रिपोर्ताज’ करतानाच्या अनुभवांचं हे शब्दचित्र मांडण्याचा प्रयत्न...खरंतर चिपळूणला पूरस्थिती तशी नवीन नाही. यापूर्वीही अनेकदा वशिष्ठी नदीला पूर येऊन येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याआधी २००५ मध्ये वशिष्ठीला आणि शिवनदीला पूर आला होता. त्यावेळीही येथील उद्योगधंद्यांचे मोठे नुकसान झाले. ती परिस्थिती लक्षात घेऊन अनेकांनी त्यांच्या व्यवसायांमध्ये, वास्तुरचनांमध्ये नुकसान टाळण्याच्या दृष्टीने बदलही केले होते. पण, २०२१चा महापूर हा चिपळूणमध्ये यापूर्वी आलेल्या कोणत्याही महापुराच्या तुलनेत अधिक प्रलयकारक होता. संपूर्ण बाजारपेठ पाण्याखाली गेली होती. आधीच कोरोनाने उद्योगधंद्यांचं कंबरडं मोडलं होतं, त्यात पुराने होत्याचं नव्हतं केलं. व्यावसायिक, व्यापार्‍यांचं घर आणि गाळे असं दुहेरी नुकसान. नक्की कुठे लक्ष द्यावं, असा संभ्रम होता. पण, स्वत:ला सावरता सावरताच ही व्यापारी मंडळी शेजारच्यालाही मदतीचा हात देत होती.
 
 
 
 
‘केशव आप्पाजी ओक’ ही चिपळूणच्या बाजारपेठेतील किराणामालाची मोठी आणि जुनी पेढी. तीन मजल्यांची ही इमारत. इमारतीचा तळमजला आणि पहिला मजला पुरात पूर्णत: जलमय झाला. वरच्या मजल्यावर सामान हलवण्याइतका अवधीही मिळाला नाही. अन्नधान्याची, सर्व जीवनावश्यक सामग्रीची नासाडी झाली. हे सर्व डोळ्यांदेखत होत असताना पेढीचे मालक मंदार ओक आणि अन्य मंडळींनी मात्र इमारतीच्या गच्चीवर जाऊन आजुबाजूच्या घरात अडकलेल्यांना, लहान मुलांना वाचवून टेरेसवर आणलं. दुकानात जे काही खाण्याचं सामान शिल्लक होतं, ते सर्वांसाठी खायला उपलब्ध करुन दिलं. पूर ओसरला, तेव्हा या पेढीतील लोक मदतकार्यातही सहभागी झाले. मुंबई-नवी मुंबईसारख्या विविध भागांतून लोकांनी मदत पाठवली होती, त्याची व्यवस्था करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. ‘चितळे अ‍ॅण्ड कंपनी’ हे हार्डवेअरचे दुकान. १९६५च्या पूरानंतर जाणीवपूर्वक किराणा व्यवसायात बदल करुन बांधकाम व्यवसायासाठी लागणार्‍या सामानाचं दुकान सरु केल्याचं दुकानाचे मालक उदय चितळे सांगतात. या पुरातही त्यांच्या दुकानात दोन फूट पाणी भरलं होतं. केवळ ते राहात असलेला पाग हा परिसर या पुरामुळे फारसा बाधित झालेला नव्हता. याच भागात विश्व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, जनकल्याण समिती यांनी एकत्र येऊन मदतकार्य सुरू केलं होतं. चिपळूणच्या आजुबाजूच्या परिसरातून मदतीचा ओघ सुरु होता. त्यांच्या घराच्या खालीच मदतकार्य सुरू होतं. मदतीचा ओघ इतका होता की शेवटी जागा कमी पडायला लागली, त्यामुळे पुढील मदतकार्याची व्यवस्था गद्रे इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये करण्यात आल्याचं उदयजी सांगतात.
 
 
 
Chiplun 3
 
 
 
 
मोठ्या उद्योगांप्रमाणेच छोट्या दुकानदारांचेही नुकसान झाले होते. ‘न्यू गजानन स्टेशनरी स्टोअर्स’चे प्रशांत रेळेकर म्हणाले की “या पुरामुळे इथला व्यापारी १०-१२ वर्षं मागे गेला.” त्यांचे हे उद्गारच येथील व्यापार्‍यांच्या नुकसानीचं गांभीर्य लक्षात आणून देण्यासाठी पुरेसे आहेत. रेळेकर सांगतात, “अनपेक्षितपणे आलेल्या या पुरातून सावरण्यासाठी आम्ही जोडलेले व्यापारी संबंध उपयोगी पडले. ज्या व्यापार्‍यांकडून आम्ही माल घेतो, त्यांनी मागच्या देण्यासाठी तगादा लावण्याऐवजी नव्याने उभं राहाण्यासाठी माल देण्याची तयारी दाखवली.” चिपळूण व्यापारी महासंघाचे अध्यक्ष शिरीष काटकर यांनी येथील व्यापार्‍यांच्या आणि सर्वच चिपळूणकरांच्या संघटनवृत्तीचा कौतुकाने उल्लेख केला. “व्यापार्‍यांसाठी शासनाने-प्रशासनाने तत्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी व्यापारी महासंघाने केली होती. मात्र, तशी काही मदत मिळू शकली नाही. पण, चिपळूणचा प्रत्येक व्यापारी स्वत:च्या पायावर उभा राहिला आणि तीन महिन्यांतच तो या संकटातून बाहेर पडला” असं काटकर यांनी सांगितलं.
चिपळूणमधील आणि अन्य भागांतील सर्व प्रकारचे समाजघटक मदतकार्यात सहभागी झाले होते. या महापुराच्या वेळी संघाने येथे केलेल्या मदतकार्याचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे. जुलैमध्ये आम्ही केलेल्या व्हिडिओत त्याचं चित्रण पाहायला मिळतं. बचावकार्य असो, लोकांपर्यंत खाद्यपदार्थ व जीवनावश्यक मदत पोहोचवणं असो किंवा गाळ-चिखल साफ करणं असो, वैद्यकीय सेवा पुरवणं असो, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्यांच्या जोडीने सहभागी झालेले स्थानिक कार्यकर्ते दिवस-रात्र एक करून काम करत होते. महिला कार्यकर्त्याही यात कुठे मागे नव्हत्या.
 
 
 
चिपळूणमधील तरुण मंडळीही मदतकार्यात आघाडीवर होती. चिपळूणच्या बाहेरूनही तरुणांचे गटही मदतकार्यासाठी आले होते. अमेय नातू हा चिपळूणमधील एक तरुण कार्यकर्ता. घरचा चहा पावडरचा व्यवसाय. त्याचीही पुरामुळे वाताहत झाली. तरीही आजुबाजूचं चित्र मदतीसाठी खुणावत होतं. लोकांना रेस्क्यू करणं, गाई-गुरांना वाचवणं, घरोघरी मदत पोहोचवणं, औषधं पोहोचवणं, सफाई अशा कामात तो आणि त्याची मित्रमंडळी आघाडीवर होती. अमेय सांगतो, “या मदतकार्याच्या निमित्ताने अभूतपूर्व एकता आम्हा चिपळूणकरांना अनुभवायला मिळाली. परस्परांमध्ये निर्माण झालेला आपुलकीचा बंध ही या संकटाची चांगली बाजू होती.”. चिपळूण परिसरातील नदीलगतच्या गावांमध्ये अनेक ठिकाणी घरंच्या घरं, गुरांचे वाडे वाहून गेले होते. शासन-प्रशासनाकडून तुटपुंजी आर्थिक मदत मिळाली. जीवनावश्यक वस्तूंची मदत तर अनेक मार्गाने पोहोचत होती. पण, डोक्यावरचं छप्पर नसेल तर काय उपयोग? शंकरवाडी गावात कोल्हापूरच्या काडसिद्धश्वर स्वामींच्या मठाद्वारे बाधितांसाठी चिरांची घरं उभारण्याचं काम सुरू आहे. या अकस्मात आलेल्या महापुरामुळे चिपळूणकरांना मोठा मानसिक धक्का बसला. येथील एका अनुभवी आणि वयाने ज्येष्ठ अशा एका व्यावसायिकाने सहज गप्पा मारताना ‘ऑफ दि रेकॉर्ड’ केलेले एक वक्तव्य भावूक करुन गेलं. ते म्हणाले, “महापुरानंतरचं चित्र बघून नव्या पिढीतील अनेकांना यापुढे इथे राहाणं धोक्याचं वाटू लागलं. पिढ्यान्पिढ्या जिथे राहिलो, ते शहर, गाव सोडून दुसरीकडे राहायला जाण्याचा विचार ते करू लागले. पण, जसजसा काळ जाऊ लागला, तसतसं हे सगळं सावरलं.”
 

Chiplun 4 
 



Chiplun 5
 
 
ही असुरक्षितता वाटण्याचं कारण अर्थातच येथील वशिष्ठी नदी आणि तिच्या उपनद्यांना वारंवार येणारे पूर. जंगलतोडीमुळे या नद्यांमधील गाळाचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नद्यांची पातळी वाढली आहे. कोयना धरणाचं पाणी कृष्णा खोर्‍यातून पुन्हा वशिष्ठी नदीत सोडण्याच्या प्रकारामुळे त्यात अधिकच भर पडत आहे. चिपळूणकर याआधीपासूनच त्याबाबत शासनदरबारी तक्रारी करत होते. मात्र, या महापुरानंतर ‘चिपळूण बचाव समिती’ अधिक आक्रमकतेने या समस्यांविषयी आवाज उठवू लागली आहे. समितीच्यावतीने २१ दिवसांचे आंदोलनही करण्यात आले होते. या आंदोलनात समस्त चिपळूणकर सहभागी झाले होते. शासन-प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. आता शासनाच्या माध्यमातून, तसंच ‘नाम फाऊंडेशन’च्या माध्यमातून वशिष्ठी आणि शिवनदीतील गाळ काढण्याचं काम सुरु आहे. चिपळूणकर आणि बचाव समितीचे सदस्य या कामावर लक्ष ठेवून आहेत. येथील नद्यांविषयीच्या आणि अन्य पर्यावरणीय समस्या जर योग्य प्रकारे उपाययोजना केली, तर भविष्यात चिपळूणकरांना कदाचित अशा आपत्तींचा सामना करावा लागणार नाही. आता चिपळूणकरांचा लढा त्यासाठी सुरू आहे.
  
 
 
 - सपना कदम-आचरेकर
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121