पुणे : महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रातील प्रसिद्ध नाव असलेले डॉ. अनिल अवचट यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील पत्रकारनगरमधील राहत्या घरी वयाच्या ७८व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तब्येत खालावल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र नंतर त्यांना घरी घेऊन जाण्यात आले. मराठी साहित्यामध्ये त्यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांच्या निधनाने सामाजिक जाणीव असलेला आणि बालसाहित्यात मोठे योगदान देणारा साहित्यिक गमावल्याची भावना व्यक्त होत आहे.
डॉ. अनिल अवचट यांनी साहित्यातच नाही तर सामाजिक कार्यातदेखील आपली अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांनी त्यांच्या दिवंगत पत्नी डॉ. अनिता अवचट यांच्यासोबत मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. तरुणांना व्यसनापासून परावृत्त करण्यासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली होती. अनिल अवचट हे एक डॉक्टर होते. मात्र, त्यांनी समाजसेवेतही मोलाचे योगदान दिले. १९६९ मध्ये त्यांनी आपले पहिले पुस्तक ‘पूर्णिया’ हे प्रसिद्ध केले होते. तेव्हापासून त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नांवर लिखाण केले. त्यांची ३८ हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली.
डॉ. अनिल अवचट यांना २०२१चा महाराष्ट्र साहित्य परिषदेचा 'महाराष्ट्र साहित्य परिषद जीवनगौरव पुरस्कार' देण्यात आला होता. याशिवाय त्यांनी पत्रकार क्षेत्रातही काम केले आहे. त्यांनी नेहमीच पत्रकारिता गरिबी, अन्याय व भ्रष्टाचाराचे बळी असलेल्या असहाय्य जनतेच्या हितासाठी वापरली. त्यांनी मजूर, दलित, भटक्या जमाती, वेश्या यांच्या प्रश्नांविषयी समर्पक लिखाण केले.