
चीनमध्ये तिबेटी बुद्धविहारांवर अत्याचार-अन्याय वाढतच आहेत. काही दिवसांपूर्वी चीनमध्ये शिशुआन प्रांतात तिबेटच्या बौद्ध भिक्खूंना चिनी प्रशासनाने अटक केली. कारण काय तर चीनमध्ये लुहुओ प्रांतामध्ये ९९ फूट उंच बौद्ध मूर्ती तोडण्यात आली. मूर्ती तोडतानाची प्रक्रिया पाहण्यासाठी तिथे या भिक्खूंवर सक्तीही करण्यात आली. कारण, चीनमध्ये बौद्ध धर्मीयांची लोकसंख्या जरी जास्त असली तरीसुद्धा चिनी कम्युनिस्ट सरकारच्या मते, बौद्ध धर्माची जन्मभूमी भारत आहे. चीनच्या मातीतले आणि चिनी संस्कृतीतून जन्माला आलेले धर्म हे तिथल्या प्रशासनाला चीनच्या घराघरात रूजवायचे आहेत, तर लुहुओ प्रांतातली बुद्धमूर्ती तोडत असताना चीनने ही घटना जगभरात कुठेही कळू नये, याची खबरदारी घेतली. मात्र, तरीही चीनचे मूर्तिभंजन करण्याचे दुष्कृत्य जगाला कळलेच. मूर्ती तोडलेल्या घटनेचे फोटो आणि व्हिडिओ बाहेर गेलेच कसे? जगाला हे कळलेच कसे? यामुळे चिनी प्रशासन सध्या संतप्त आहे. ज्या बौद्ध भिक्खूंना मूर्तिभंजन घटनाक्रम पाहण्याची सक्ती केली होती, त्यांनीच या घटनेचे लपून व्हिडिओ काढून जगभरात प्रसारित केले, असे चिनी प्रशासनाला वाटते. त्यामुळे मग या बौद्ध भिक्खूंना अटकही करण्यात आली.
काही महिन्यांपूर्वीच चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीने धर्मसभा आयोजित केली होती. त्यावेळी पूर्ण धर्मसभेचे सार त्यांनी जाहीर केले होते. या धर्मसभेचा निष्कर्ष आणि सार होता की, चीनमध्ये अस्तित्वात असलेल्या सर्वच धर्मांना चिनी संस्कृतीनुसार प्रस्थापित करायचे. याचाच अर्थ सरळ होता की, चीनमध्ये मुस्लीम, बौद्ध आणि ख्रिस्ती धर्मांना चीनच्या संस्कृतीनुसार रंगवले जाणार! जगभरात बौद्धधर्मीय आहेत. पण, भारतीय संस्कृतीचे तत्वज्ञान या धर्मातून जगभर प्रसारित होते. त्यामुळे चिनी प्रशासनाला देशात अस्तित्वात असलेल्या प्रत्येक धर्माचे ‘चिनीकरण’ करायचे आहे, तर यानुसारच सध्या चीनमध्ये तिबेटी भिक्खूंना त्रास दिला जात आहे. अफगाणिस्तानमध्येही काही दशकांपूर्वी प्रचंड आणि प्राचीन बुद्धमूर्ती तालिबानींनी जमीनदोस्त केली होती. आताही चीनमध्ये ही ९९ फूट उंच बुद्धमूर्ती अशीच तोडली गेली. याबाबत भारतात काय प्रतिक्रिया आहेत?
तर भारतात स्वतःला शुद्ध बौद्धधर्मीय आणि डॉ. बाबासाहेबांनी दिलेला ‘धम्म’ यामध्ये फरक शोधणारेच विचारवंत जास्त आढळतात. त्यातही या पुरोगामी विचारवंतांमध्ये आम्ही कसे नागवंशी आणि मूलनिवासी आहोत, तसेच आम्ही कसे द्रविड आहोत किंवा अनार्य आहोत, बाकी सगळे हिंदू कसे बाहेरून आले आहेत, असे भोळ्या समाजाला सांगणारे तद्दन पोटभरू विचारवंतच जास्त. यापैकी कुणीही अफगाणिस्तानमधील तालिबान्यांचा किंवा चीनच्या कम्युनिस्ट प्रशासनाचा निषेध केला का? तर नाही. आपण कसे श्रेष्ठ बौद्धधर्मीय आहोत आणि बाकी कसे आपल्यानंतरचे आहेत, हे सांगणारे हे जे कोणी लोक आहेत, ते तथागत बुद्धांच्या मूर्तिभंजनाबद्दल अवाक्षरही उच्चारत नाहीत. कल्पना करा, हेच जर कुण्या विकृत नराधमाने भारतात केले असते तर? तर मग एकाच्या दुष्कृत्याबद्दल समस्त भारतवासीयांना आणि समस्त हिंदू धर्माला याच लोकांनी लक्ष केले असते. देश कसा असहिष्णू आहे आणि इथे अल्पसंख्याक कसे दु:खात आहेत, हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सांगितले असते.
अफगाणिस्तान किंवा चीनबद्दल हेच लोक का बरं काही बोलत नाहीत? कारण, यातल्या काही लोकांना चिनी प्रशासनाबद्दल भारतामध्ये जराही वितुष्ट पसरवायचे नाही. उलट आजकाल यातले काही विचारवंत आडून आडून म्हणत असतात की, चीनमध्ये बौद्धधर्मीय जास्त आहेत आणि भारतात कमी. त्यामुळे चीन हा बौद्ध धर्माचा ‘रोल मॉडेल’ आहे. अर्थात हे असे म्हणणारे उच्चशिक्षित, पुरोगामी आणि ‘भारत तेरे तुकडे होंगे हजार’ असे म्हणणार्या ‘डफली गँग’च्या चरणी समर्पित झालेले मूर्ख आहेत. हेच लोक चीनमध्ये बौद्ध धर्म कसा विकसित झाला, तिथे बौद्धधर्मीय कसे सुखासमाधानात राहतात, अशा पुड्याही सोडत असतात. आता या तथाकथित विचारवंतांची जिभ टाळ्याला चिकटली आहे. देशातल्या वस्तीवस्तीमध्ये हे जाऊन सांगणार नाहीत की, चीनमध्ये तथागतांची मूर्ती निर्दयतेने तोडली गेली आणि ही घटना पाहण्याची सक्ती पूज्य भिक्खूवर केली गेली. असो. चीनने मुस्लीम धर्मीयांवर केलेले अत्याचार तर जगजाहीर आहे. पण, शांती-करूणेचा मार्ग दाखवणार्या धम्मप्रसारक भिक्खूंवर चीनने केलेले अत्याचार केवळ आणि केवळ चीनचा द़ृष्टपणा आहे. चीनचा निषेध!
९५९४९६९६३८