थ... थंडीचा!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

health
 
 
संपूर्ण महाराष्ट्रभर सध्या गुलाबी थंडीने हातपाय पसरले आहेत. या बोचऱ्या थंडीमुळे उद्भवणाऱ्या सर्दी, ताप, खोकल्याचा जवळपास प्रत्येक घरात एक तरी रुग्ण दिसून येईल. त्यातच कोरोनाची भीती ती वेगळी! तेव्हा, अशा अतिशय थंड आणि तितक्याच शुष्क वातावरणात आरोग्याची कशी काळजी घ्यावी, यासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
'आपला तो सर्दी-खोकला, इतरांचा तो कोरोना’असा एक विनोद सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर फिरत आहे. ‘ओमिक्रॉन’मुळे कोरोनाची तिसरी लाट पुन्हा भारतात आलेली आहे. काहींमध्ये केवळ ताप असतो, काहींमध्ये फक्त थकवा/अंगदुखी, काहींमध्ये सर्दी, घसादुखी-खोकला, तर काहींमध्ये काहीच लक्षणे नसताना केवळ ‘आरटीपीसीआर’ चाचणी केल्यास ती ‘पॉझिटिव्ह’ येते. काही वेळेस टेस्ट करण्याचेही टाळले जाते किंवा भीतीपोटी सर्रास लक्षणांकडे दुर्लक्षित केले जाते. त्यात आता थंडीची भर! एरवीदेखील थंडीमध्ये सांधेदुखी, सुका खोकला, श्वसनाच्या विविध तक्रारी उद्भवत असत. यावर आयुर्वेदिकउपचाराने आरामही पडतो. याबद्दल आजच्या लेखातून जाणून घेऊया.
 
थंडीची लाट सध्या सर्व महाराष्ट्रात तीव्रतेने जाणवत आहे. मुंबई व उपनगरीय परिसरात, जिथे थंडीच्या कपड्यांची (स्वेटर, कान टोपी, जॅकेट इ.) कधीच गरज पडत नाही, तिथेही या कपड्यांची गरज भासू लागली आहे. त्वचा कोरडी पडणे, खाज येणे, त्वचा खरखरीत व फुटीर होणे इ. तर होत आहेच. त्याचबरोबर बऱ्याच जणांना शौचासही साफ होत नाही. सुरुवातीस कुंथावे लागते, टोचून शौचास होते, एका वेळेत संपूर्ण मलनिस्सारण न होणे, पोट फुगणे, अनियमित वेळेस शौचाचा वेग येणे इ. लक्षणे अनेक रुग्णांमध्ये आढळून येत आहेत. श्वसन संस्थेच्या तक्रारीही वाढल्या आहेत. नाक चोंदणे, कोरडे पडणे, सकाळच्या प्रहरी अतिशिंका येणे, डोके व कपाळ जड असणे, डोके दुखणे, अंग मोडून येणे, तोंडाला चव नसणे, जेवायची इच्छा न होणे, घसा पेचणे, चिकट कफ निघणे, थोड्याही हालचालीने दम लागणे इ. लक्षणे आढळतात. सर्व तक्रारींवर काही आहारीय-विहारीय बदल केल्यास बराच फायदा होतो. औषधोपचार करतेवेळी तज्ज्ञ वैद्यांच्या मार्गदर्शनाखाली करावीत. आयुर्वेदिकऔषधे ही चुकीच्या मात्रेत किंवा चुकीची घेतली गेली, तर ती अपायकारक ठरू शकतात.
 
आपण जसे वातावरणाच्या बदलानुसार पोशाखात बदल करतो. उदा. थंडीत स्वेटर-जॅकेट इ. पावसाळ्यात रेनकोट, छत्री व उन्हाळ्यात हलक्या रंगाचे सुती कपडे घालतो, तसेच आहारातही त्या-त्या ऋतूंनुसार बदल करणे अपेक्षित आहेत. हल्ली विविध शहरांमधून काही फळे बाराही महिने मिळतात. उदा. सफरचंद, केळी, फणस इ. पण, फळं ऋतूंप्रमाणेच खावीत. जर पावसाळ्यात सर्दी-पडसे असताना रोज केळं, सीताफळं - पेरु इ. फळे खाल्ली, तर त्रास वाढतो. थंडीतही सर्दी-घसादुखी असतेवेळी पेरु खाल्ला, तर ही लक्षणे वाढतात. तसेच उन्हाळ्यात पपई खाल्ली, तर ती उष्ण पडू शकते. तेव्हा फळं खाताना ऋतूचा विचार अवश्य व्हावा. शहाळ्याचे पाणीदेखील पावसाळ्यात/थंडीत घेऊ नये. तसेच ‘फ्रूट प्लॅटर’ ज्यात विविध प्रकारची फळे एकत्र खाल्ली जातात, ती टाळावीत. फळे खाताना काही नियम पाळणे आवश्यक आहे. जेवण झाल्यावर फळे खाऊ नयेत. मधल्या छोट्या भुकेला फळे खावीत. फळे खूप सकाळी किंवा सूर्यास्तानंतर खाऊ नयेत. ज्यांना कफाचा त्रास आहे, दमा/अस्थमा आहे, अतिमधुमेह आहे, चिघळणारी जखम आहे, त्वचेच्या तक्रारी आहेत, त्यांनी हा नियम कटाक्षानेे पाळावा. ज्यांना रक्तदाबाचा त्रास आहे, अंगाला खाज येते, खूप मुरुमे-पीटिका आहेत, खूप केस गळतात, पिकतात इ. तक्रारी आहेत, त्यांनी फळांवर मीठ/चाट मसाला घालून कधी खाऊ नयेत. तसेच कोणीही एका वेळेस खूप फळे खाऊ नयेत. फळे जी सालीसह खाणे शक्य आहे, त्यांनी ती तशीच खावीत. या सालींमुळे शौचास साफ होण्यास मदत होते. फळे फ्रिजमध्ये ठेवून थंडगार करून खाऊ नयेत. खोलीच्या सर्वसाधरण वातावरणात असलेली फळेच खावीत. फळे आणि दूध जसे फ्रूट मिल्कशेक, शिकरण, फ्रूट कस्टर्ड इ. खाणे टाळावे. फळ आणि दूध एकत्र खाणाऱ्यांमध्ये पुढे जाऊन त्वचेच्या कुरबुरी सुरू होतात. फळे खाताना ती अख्खी खावीत. त्याचा रस काढून घेऊ नये. तो पचायला जास्त जड होतो. बरेचदा ज्यूसमध्ये चवीसाठी साखर घातली जाते. ही अतिरिक्त साखर टाळणे शक्य आहे. जर अख्खे फळ खाल्ले, तर ही साखर लागत नाही. फळातील गोडी पुरेशी आहे. पित्ताचा त्रास, अ‍ॅसिडिटी, डोकेदुखी असताना खूप आंबट फळे खाऊ नयेत. अननस, किवी, स्ट्रॉबेरी ही फळे टाळावीत.
 
 
सध्या थंडीमध्ये गरमागरम चहा-कॉफी पिण्याचे प्रमाण वाढते. अतिरिक्त चहा प्यायल्याने पित्ताचे त्रास सुरू होतात, तसेच वारंवार कॉफी प्यायल्याने मलबद्धता, शौचास साफ न होणे इ. त्रास होतात, तसेच अतिरिक्त साखर पोटात जाते व त्याचा दुष्परिणाम होतो. तो वेगळाच चहा-कॉफी पिण्याऐवजी गरम पाण्यात थोडं आलं-लिंबू पिळून प्यायल्यास बरे वाटते तसेच गवती चहा, गुळाचा काढा, विविध भाज्यांचे सूप हे ‘हेल्दी ऑप्शन’ घ्यावेत. जम्मू-काश्मीरमध्ये ‘काहवा’ नावाचे पेय प्यायले जाते. त्यात चहाच्या पानांबरोबर लवंग, दालचिनी, वेलची, केशर इ. असते. पाण्याला उकळी आणून वरून ही जिन्नसे घालावित. दोन मिनिटे उकळून झाकून ठेवावे, थोड्या वेळाने त्यात साखर किंवा किंचीत सैंधव घालून प्यावे. याने शरीरात ऊर्जा, उष्णता निर्माण करण्यास मदत होते.
 
 
तसेच थंडीमध्ये तेल बियाणांचा वापर अधिक करावा. तीळ (पांढरे व काळे) शेंगदाणे इ. खाण्यात यावे. उडदाच्या डाळीचा वापर थंडीत उपयोगी पडतो. फक्त गरम खाल्ल्याने-प्यायल्याने (गरम मसाल्याचे/ तिखटाचे पदार्थ) पोटाला त्रास होऊ शकतो. ते टाळण्यासाठी आहाराबरोबर तुपाचा वापर जरूर असावा. अन्न खूप कोरडे व शुष्कखाऊ नये. भाजलेल्या गोष्टींबरोबर (थालिपीठे, भाकरी) लोणी अवश्य खावे, असे खाल्ल्याने पोट फुगणे, पोटात आग होणे, टोचणे, दुखणे इ.टाळता येते. शौचासही साफ होते. खडा होणे, टोचणे इ.तक्रारी उद्भवत नाही. केवळ मिरचीचा वापर न करता फोडणीसाठी आलं-लसूण, ओवा इ.पदार्थांचा ही वापर क्रियेला मदत होते.
 
 
शरीरात ऊर्जा उत्पन्न करण्यासाठी व्यायामाचाही खूप चांगला फायदा होतो. शरीराच्या विविध हालचालींमधून उष्णता निर्माण होते. शरीराची लवचिकता सुधारते. स्टॅमिना वाढतो व सकारात्मकता येते. व्यायाम, वयपरत्वे व वजनाप्रमाणे वेगवेगळे करावे. योगासने, पोहणे, सायकल चालवणे, धावणे, चालणे, झुम्बा, जिम्नॅस्टिक्स, विविध मैदानी खेळप्रकार यातील काहीतरी नित्यनियमाने करावेत. थंडीमध्ये जेवढी हालचाल होईल, तेवढे सांधे आखडणे, दुखणे, कमी राहील. व्यायाम करण्याची स्नायू व पेशींच्या ताकदीसाठी क्षमतेसाठी अभ्यंग केल्यास, उत्तम रोज अंगाला तिळाचे तेल, राईचे तेल किंवा आयुर्वेदीय अभ्यंग तेल अंघोळीपूर्वी लावावे, चोळावे, जिरवावे. शरीर सदृढ असल्यास कुठल्याही आजारातून लवकर बरे होणे शक्य आहे.
 
 
(लेखिका आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजिस्ट व पंचकर्मतज्ज्ञ आहेत.)
 
 
@@AUTHORINFO_V1@@