रितेशने अवलोकन करण्यास सुरुवात केली. त्याच्या लक्षात आले की, प्रवास करताना आपल्याला एक चांगले, परवडणारे हॉटेल हवे असते, पण आपल्याला मिळते एक वाईट दर्जाच्या खोल्या असलेले हॉटेल. तेवढंच वाईट दर्जाचं अन्न आणि उद्धट कर्मचारी! यातूनच त्याला प्रेरणा मिळाली एका व्यासपीठावर सर्व चांगल्या ठिकाणांची माहिती देणाऱ्या 'ऑनलाईन' मंचाची. रितेशने त्याचे सध्याचे बिझनेस मॉडेल बदलले आणि २०१३ मध्ये 'ओरवेल'ला 'ओयो रुम्स' म्हणून पुन्हा 'लॉन्च' केले. 'ओयो' म्हणजे 'ऑन युवर ओन.'
आधुनिक उद्योगाची भाषा हीदेखील आधुनिक झालेली आहे, ज्यास आपण 'डिजिटल' म्हणतो. या भाषेसोबतच उद्योग-व्यवसाय करण्याच्या पद्धतीमध्येदेखील बदल झाला आहे. पूर्वी एखादा उद्योग करायचा म्हटल्यास भांडवल लागायचे. मग त्यासोबत पायाभूत सुविधा आवश्यक असत. आता मात्र काळ बदलला आहे. यापैकी तुमच्याकडे काहीही नसेल, तरीही तुम्ही व्यवसाय करू शकता. फक्त आवश्यक आहे, ती 'आयडिया.' या 'आयडिया'च्या जोरावर 'स्विगी'सारखी कंपनी स्वत:चं हॉटेल नसतानादेखील घरोघरी अन्नपदार्थ पोहोचवित आहे. स्वत:ची कार नसताना 'ओला', 'उबेर' यांसारख्या कंपन्या 'कार सर्व्हिस' देत आहे. अशीच आणखी एक कंपनी आहे, जी स्वत:च्या मालकीचे एकही हॉटेल नसताना हॉटेल रुम्स पुरवत आहे. ही कंपनी म्हणजे रितेश अगरवाल याची 'ओयो रुम्स.'
रितेशचा जन्म ओडिशातील बिसम कटक येथे एका उद्योजकीय कुटुंबात झाला आणि तो ओडिशाच्या रायगडा येथील 'सेक्रेड हार्ट स्कूल'मध्ये शिकला. रायगडा, ओडिशाच्या त्या दिवसांमध्ये त्याच्यासाठी सर्व काही मनोरंजक आणि शिकण्यासारखे होते. परंतु, रितेश मुलांपेक्षा वेगळा विचार करणारा होता. कॉम्प्युटरवर चुका करण्याच्या त्याला जणू छंदच होता. पण, या छंदामुळेच त्याला 'सॉफ्टवेअर'मध्ये प्रचंड रस निर्माण झाला. सतत काहीतरी नवीन शिकत राहण्याच्या सवयीमुळे शाळेत असतानाच त्याने आपल्या मोठ्या भावाची 'प्रोग्रॅमिंग'साठी पुस्तके घेतली. 'बेसिक' आणि 'पास्कल'सारख्या काही मूलभूत भाषा शाळेतच शिकवल्या गेल्या आणि बाकीच्या 'गुगल'बाबाकडून शिकल्या. विशेष म्हणजे, तो अवघ्या आठ वर्षांचा असताना त्याने 'कोडिंग' सुरू केले होते. त्यामुळे साहजिकच 'सॉफ्टवेअर' हे त्याचे प्रेम बनले होते. दहावीला पोहोचेपर्यंत त्याने आपले मनाशी पक्के केले की, त्याला 'कोडिंग'मध्येच करिअर करायचे आहे.
२००९ मध्ये, रितेश आयआयटी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करण्यासाठी कोटा येथे गेला. काही दिवसांतच त्याला वाटले की, कोटा ही एक अशी जागा आहे, जिथे 'कोडिंग' शिकता येते. त्यामुळे 'कोडिंग'चे त्याचे स्वप्न पूर्ण झाले. रितेशच्या वडिलांनी त्याला 'बन्सल ट्यूटोरियल्स'मध्ये प्रवेश दिला होता. तिथे तो शिकू लागला. त्यानंतर त्याच्याकडे बराच वेळ शिल्लक असल्याने तो खूप फिरायचा. दरम्यान, त्याने एक पुस्तक लिहिण्यास सुरुवात केली. काहीच दिवसांत 'इंडियन इंजिनिअरिंग कॉलेजेस : टॉप १००' 'इंजिनिअरिंग कॉलेजेसचा संपूर्ण विश्वकोश' या नावाचं पुस्तक तयारदेखील झाले. हे पुस्तक 'फ्लिपकार्ट'वर प्रचंड गाजले आणि काही वेळातच ते विकलेही गेले. गंमत म्हणजे, तो ज्या 'ट्यूटोरियल'मध्ये गेला होता तिथे हे पुस्तक होतं आणि मुखपृष्ठावर रितेशचा फोटो होता.
रितेश १६ वर्षांचा असताना मुंबईतील 'टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च' येथे आयोजित 'आशियाई विज्ञान शिबिरा'त सहभागी होण्यासाठी २४० मुलांमधून त्याची निवड करण्यात आली. त्या काळात मोकळ्या वेळेत रितेश खूप प्रवास करायचा. लहानसहान हॉटेल्समध्ये राहायचा. कोटाविषयी जास्त काही रस नसल्यामुळे तो अनेकदा दिल्लीला जायचा. त्यावेळेस तो विचित्र अशा 'बेड अॅण्ड ब्रेकफास्ट' अशा ठिकाणी राहायचा. उद्योजकांना भेटण्यासाठी 'इव्हेंट्स' आणि 'कॉन्फरन्स'मध्ये हजर असायचा. बहुतांश वेळा नोंदणी शुल्क परवडत नसल्यामुळे अशा कार्यक्रमांमध्ये फक्त डोकावून जायचा. खऱ्या अर्थाने इथेच रितेशचा उद्योजकीय प्रवास सुरू झाला.
२०११ मध्ये, रितेश स्वतःचे काहीतरी सुरू करण्याच्या उद्देशाने आणि त्याच वेळी पुढील अभ्यासासाठी अमेरिकेला जाण्यासाठी 'सॅट'ची तयारी करण्याच्या उद्देशाने दिल्लीला गेला. अमेरिकेच्या महाविद्यालयात प्रवेश मिळविण्यासाठी 'स्टॅण्डर्डाईझ्ड टेस्ट' अर्थात 'सॅट' द्यावी लागते. पण, सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणा, 'सॅट' परीक्षा तो कधीच उत्तीर्ण झाला नाही. त्यामुळे रितेश अमेरिकेला गेला नाही. इथेच उद्योजकांना भेटणे, पुस्तके वाचणे त्याने सुरू ठेवले. रितेशच्या बाबतीत अजून एक मजेची बाब अशी की, त्याने लंडन विद्यापीठात प्रवेश मिळवला. मात्र, स्वत:चं काहीतरी सुरू करायचं, या प्रबळ इच्छेने त्याने त्या शिक्षणाला राम राम ठोकला.
दरम्यान, रितेशने त्याच्या या प्रवासाच्या दिवसांत पाहिले आणि अनुभवले होते की, भारतातील 'बजेट हॉटेल्स' प्रवाशांच्या अगदी मूलभूत गरजादेखील पूर्ण करत नाहीत. या संधीचा फायदा घेत त्याने २०१२ मध्ये आपला पहिला उपक्रम सुरू केला, तो म्हणजे, 'ओरवेल स्टे.' हे संपूर्ण भारतभर 'बेड अॅण्ड ब्रेकफास्ट'च्या मुक्कामाचे एकत्रिकरण होते. सोप्या भाषेत हे 'बेड अॅण्ड ब्रेकफास्ट' जॉईंट्स, खासगी खोल्या आणि 'सर्व्हिस्ड अपार्टमेंट'साठी अल्प आणि मध्यम मुदतीच्या भाडेतत्त्वावर असे. काही दिवसांतच त्याने अनेक गुंतवणूकदारांना एकत्र आणणाऱ्या 'व्हेंचर नर्सरी' या 'अॅक्सिलरेटर फर्म'कडून ३० लाख रुपयांचा निधीही मिळवला.
त्याच्या खिशात पुरेसा पैसा असल्याने त्याने त्याच्या या नवीन प्रकल्पावर काम करण्यास सुरुवात केली. त्याच वेळी त्याने आपली कल्पना 'थिएल फेलोशिप'मध्ये मांडली. ही एक २० वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी असलेली जागतिक स्पर्धा आहे. रितेश या स्पर्धेत पहिल्या दहामध्ये आला. 'पे पाल'चे (PayPal) सह-संस्थापक आणि 'फेसबुक'चे गुंतवणूकदार पीटर थिएल यांच्याकडून शाळा सोडून स्टार्टअप तयार करणाऱ्या अशा दहा विद्यार्थ्यांस दोन वर्षांसाठी एक लाख डॉलर्स (सुमारे २.७ लाख प्रति महिना) सोबत उद्योजकीय मार्गदर्शन आणि इतर पायाभूत सुविधा देतात.
नव्या आत्मविश्वासाने आणखी कठोरपणे मेहनत करण्यास रितेशने सुरुवात केली. परंतु, दुर्दैवाने त्याचे हे व्यावसायिक मॉडेल गटांगळ्या खाऊ लागले. रितेशने गुडगाव स्थित 'सिनॅमन स्टेज'च्या मनीष सिन्हा यांना सह-संस्थापक म्हणून नेमले. परंतु, दुर्दैवाने त्याचा फायदा झाला नाही. अखेरीस मनीषला कंपनी सोडावी लागली. खरंतर, त्यांनी 'AirBnB' मॉडेलची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला, पण तेदेखील चाललं नाही.
दरम्यान, रितेशने अवलोकन करण्यास सुरुवात केली. त्याच्या लक्षात आले की, प्रवास करताना आपल्याला एक चांगले, परवडणारे हॉटेल हवे असते, पण आपल्याला मिळते एक वाईट दर्जाच्या खोल्या असलेले हॉटेल. तेवढंच वाईट दर्जाचं अन्न आणि उद्धट कर्मचारी! या सगळ्यांमुळे प्रवास करण्याची मज्जाच जाते. त्याच्या हेदेखील लक्षात आले की, अनेकवेळा त्याने अत्यंत वाईट दर्जाच्या हॉटेल रुम्ससाठी जास्त पैसे मोजले होते. चांगल्या दर्जाच्या हॉटेलसाठी कमी पैसे. यातूनच त्याला प्रेरणा मिळाली एका व्यासपीठावर सर्व चांगल्या ठिकाणांची माहिती देणाऱ्या 'ऑनलाईन' मंचाची. रितेशने त्याचे सध्याचे बिझनेस मॉडेल बदलले आणि २०१३ मध्ये 'ओरवेल'ला 'ओयो रुम्स' म्हणून पुन्हा 'लॉन्च' केले. 'ओयो' म्हणजे 'ऑन युवर ओन.'
'ओयो रूम्स' ही भारतातील कार्यक्षम, प्रमाणित अशा नव्या खोल्यांची सर्वात मोठी शृंखला तयार करण्याची कल्पना होती. ज्यामध्ये 'स्टार हॉटेल्स'प्रमाणे 'स्पा', 'जिम' नसेल. परंतु, प्राथमिक गरजा पूर्ण करतील अशा खोल्या त्यादेखील अशा दरांत ज्यांची कधीच कल्पना केली गेली नव्हती.
'लॉन्च' झाल्यानंतर रितेशने 'ई-कॉमर्स' फर्म असलेल्या 'सेव्हेंटीएमएम'च्या माजी सीईओ भावना अग्रवाल यांना सोबत घेतले. यावेळी कोणतीही चूक न करण्याचे त्यांनी ठरवले. डझनभर हॉटेल्सशी 'टाय-अप' केले आणि त्यांच्या मदतीने त्यांच्या ग्राहकांना खोल्या दिल्या. ठरल्याप्रमाणे घडत होते. कामाचा पसारा वाढला. त्यामुळे दोन ते १५ आणि नंतर २५ लोकांची टीम वाढवावी लागली.
२०१४ मध्ये कंपनीने 'लाईटस्पीड व्हेंचर पार्टनर्स' (LSVP) आणि 'डीएसजी कन्झ्युमर पार्टनर्स'कडून चार कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवली. 'ओयो' दर महिन्याला एक कोटी रुपयांपेक्षा जास्त 'बुकिंग' करत होते. तेव्हापासून 'ओयो रूम्स' हे भारतातील पहिले तंत्रज्ञान आधारित प्रमाणित 'ब्रॅण्डेड बजेट हॉटेल्स'चे 'नेटवर्क' बनले आहे. भारत, चीन, नेपाळ, मलेशिया, नेपाळ यांसारख्या ५७ देशांतील दीड लाखांपेक्षा अधिक हॉटेल्स 'ओयो'कडे नोंदणीकृत आहे. ८ हजार, ७५१ कोटी रुपये इतके 'ओयो'चे आज मूल्य आहे. ५,१३० लोकांना 'ओयो' रोजगार देते.
याव्यतिरिक्त, त्यांचे 'ओयो रुम्स' मोबाईल अॅप काही लाखांहून अधिक वेळा 'डाऊनलोड' केले गेले आहे आणि आतापर्यंत लाखांपेक्षा अधिक 'बुकिंग' केली गेली आहेत. 'गुगल प्ले स्टोअर'वरील सर्वोत्कृष्ट 'रेट' केलेल्या अॅप्समध्ये या अॅपचा क्रमांक लागतो. एक लहान कल्पना काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे 'ओयो रुम्स' होय. त्यामुळे कोणतीही कल्पना छोटी समजू नका.