कोरोनाचे उगमस्थान कोणते, असा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला, तर काही देश आणि संघटना ‘चीन’ असे त्याचे स्पष्ट उत्तर देण्यात आजही कचरतात. कारण काय तर व्यावसायिक हितासाठी चीनला दुखवायला नको. पण, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प त्यांच्या पत्रकार परिषदांमध्ये कोरोनाचा सरसकट ‘चिनी विषाणू’ असाच उल्लेख करायचे तेव्हा त्यांना मात्र खुळचट ठरविण्यात डावे चीनसमर्थक आघाडीवर होते.
कालांतराने कोरोनाचा हाहाकार माजला. वुहान प्रयोगशाळेतील एक एक गोष्टी बाहेर येऊ लागल्या. तेव्हा मात्र जगाचे डोळे उघडले. तरीही चीनबद्दल ठोस भूमिका आजही कुणीच घेताना दिसत नाही. त्याच चीनमध्ये कोरोनाच्या नावाखाली नेमकं काय सुरू आहे, यावर नजर टाकली तर वाचून धक्काच बसेल! जगाला दाखवण्यासाठी हे चिनी ‘झिरो कोविड पॉलिसी’ असे गोंडस नाव देतात.
मात्र, या नियमांद्वारे हिटलरशाहीच देशात राबवत आहेत की काय, अशा भयानक घटना उघडकीस आल्या आहेत. एक रुग्ण जरी आढळला तर संपूर्ण शहरात टाळेबंदी लावली जाते. ‘लॉकडाऊन’च्या नावाखाली जनतेला वेठीस धरण्याचे तेथील प्रशासनाचे उद्योग सुरुच आहेत. शी जिनपिंग यांना विरोधकच नसल्याने त्यांच्याबद्दल कुणी बोलणारेही नाही. जे घरात बंद झाले, त्यांना इतर व्याधी सतावणार नाहीत का, याचा विचारच केला नाही. रुग्णालयात कोरोनाबाधितांशिवाय दुसरे रुग्णच नाहीत.
एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला, कुणी गर्भवती प्रसुतीकळांनी विव्हळत असेल, तर त्याबद्दल काहीच नियोजन नाही. एका गर्भवतीने असह्य होऊन रुग्णालय गाठले. परंतु, उदरातच तिच्या बाळाने प्राण सोडले. चिनी प्रशासन इतकं कठोर की, तिच्याकडे साधं लक्षही दिलं नाही. याच ‘झिरो कोविड पॉलिसी’त अनेकांवर उपासमारीची वेळ आली. शियान शहर कोरोनाने नव्हे, तर ‘लॉकडाऊन’मुळे त्रस्त आहे.
छातीत कळा आल्यावर रुग्ण रुग्णालयाच्या दरवाजात चकरा मारत राहिला, पण त्याला दाखल करण्यास रुग्णालयाने साफ नकार दिला. तो ‘कोविड मीडियम रिस्क कॅटेगरी’ शहराचा रहिवासी असल्याने त्याला दाखल करुन घेता येत नव्हते. अखेर तडफडून त्याचा मृत्यू झाला. अशी एक ना अनेक चीनमधील निर्बंधशाहीची धक्कादायक प्रकरणे आंतरराष्ट्रीय माध्यमांनी प्रकाशित केली आहेत.
‘लॉकडाऊन’ इतका कडक की, एका भुकेलेल्याने निर्बंध मोडत रस्त्यावर ठाण मांडले. जेवणासाठी पोलिसांकडे गयावया केली. मात्र, तिथल्या सरकारप्रमाणेच निष्ठूर प्रशासनाने त्याला बेदम चोप देत हुसकावून लावले. डिसेंबर अखेरपर्यंत हीच परिस्थिती कायम होती. शियान प्रांतात १ कोटी, ३० लाख घरे बंद आहेत. कितीही मोठी जागतिक अर्थव्यवस्था असली तरीही ‘लॉकडाऊन’ म्हटल्यावर गरीबांवर उपासमारीचीच वेळ येणारच! मुलांना दूध, वृद्धांना औषधे मिळणेही दुरापास्तच!
कोरोनाचा धसका घेणार्या चिनी सरकारने ‘झिरो कोविड पॉलिसी’ कठोर केली आहे. निर्बंध लादण्यासाठी वाटेल त्या थराला प्रशासन उतरलेले दिसते.
लोक उपासमारीने का मरेनात, पण कुणी कोरोनाने मरायला नको, असा त्यांचा अट्टाहास. कारण, कोरोना आकडे वाढले की, जग पुन्हा संशयाने पाहू लागेल. तिथल्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होईल, म्हणून जिनपिंग यांची एकाधिकारशाही सुरू आहे. निर्बंध इतके कठोर की, लाखो सुरक्षारक्षक रस्त्यावर ठाण मांडून बसले आहेत. तिथल्या माध्यमांना याबद्दल प्रश्न उपस्थित करण्याची कुठलीही सोय यापूर्वीही नव्हती आणि आताही नाहीच!
‘सर्व काही ठीक आहे’ असं जगाला भासविण्याच्या नादात स्वतःच्या जनतेचे सुरू असलेले हाल त्यांना दिसलेच नाहीत.ज्या रुग्णाचा हृदयविकाराने रुग्णालयाबाहेर तडफडून मृत्यू झाला, ज्या गर्भवतीने नऊ महिने बाळाला उदरात वाढवले, तिच्या बाळाचा जीव रुग्णालयाबाहेर तडफडून जातो आणि हा देश म्हणजे महासत्ता! याबद्दल कुणी सोशल मीडियावर बोलू पाहात असेल, तर त्यांची ‘अकाऊंट्स’ही ब्लॉक करून टाकली जातात. इथली ९५ टक्के जनता लसवंत आहे, तरीही निर्बंधांचा जुलूम सुरूच आहे. सरकार सगळं काही आलबेल असल्याची प्रतिमा निर्माण करण्याच्या नादात आपल्याच माणसांवर जुलूम-जबरदस्ती करताना दिसते. त्यामुळे चिनी जनताही त्रस्त आहे. लोकशाही न मानणार्या देशामध्ये दुसरे काय घडणार म्हणा?