शाळा व महाविद्यालये सुरू करा

भाजप शिक्षक आघाडीतर्फे उद्या शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

    20-Jan-2022
Total Views | 102

Schools
 
मुंबई : राज्यातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सरसकट बंदचा निर्णय मागे घेऊन कोरोना निर्बंधांसहीत शाळा महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने केली असून २० जानेवारीला याबाबत भारतीय जनता पक्ष, भाजप शिक्षक आघाडी व भाजपशी संलग्न शिक्षक संघटना राज्यातील सर्व तहसीलदार, जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन दिले जाणार असल्याचे भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश सहसंयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.
 
 
महाविकास आघाडी सरकारने सरसकट शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा घेतलेला तुघलकी निर्णय अत्यंत चुकीचा व तितकाच दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर दुरगामी परिणाम होत आहेत. ऑनलाईन शिक्षण हे सर्वसामान्य गोरगरीब विद्यार्थी व दुर्गम/अतिदुर्गम खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नाही. दोन वर्षांपासून शाळा,महाविद्यालये बंद असल्याने ग्रामीण व शहरी भागातील शैक्षणिक दरी वाढुन सर्वसामान्य जनतेची मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहापासून दूर फेकले जात आहेत. यामुळे मुलांचे शिक्षणाचे गांभीर्य नष्ट होत असून त्यांचे नुकसान होत आहे.
 
 
राज्यभरात सुमारे एक लाख कोचिंग क्लासेस आहेत यामधुन दहा लाखांपेक्षा जास्त खाजगी शिकवणी घेणारे शिक्षक व प्राध्यापक शिकवतात. यावर अवलंबून असणारे कुटुंब व इतर पन्नास लाख लोकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. शिवाय विनाअनुदानित व इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील शिक्षक यांची दोन वेळच्या जेवणाची भ्रांत आहे, त्यांचेवर उपासमारीची नव्हे तर अक्षरशः आत्महत्येची वेळ आली आहे.
 
 
महाविद्यालयीन विद्यार्थी अठरा वर्षे वयावरील आहेत, त्यांनी लसीचे दोन्ही मात्रा घेतलेल्या आहेत तर पंधरा वर्षांवरील लसीकरण सुद्धा वेगाने होत आहेत. केवळ कोरोनाची भिती दाखवून राज्यभरातील शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस बंदचा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. शाळा बंदच्या या निर्णयामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. राज्यभरात सर्वच व्यवसाय कोरोना निर्बंधासहीत सुरु आहेत. तेव्हा सरकारने कोरोनाचे नियम लावून शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी.
 
 
सरकारने दिनांक २६ जानेवारी पर्यंत शाळा, महाविद्यालये व कोचिंग क्लासेस सुरू करण्याचा आदेश द्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी तर्फे प्रत्येक जिल्ह्यात तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही अनिल बोरनारे यांनी सांगितले
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121