महाकाव्यांचा ‘काल’संशोधक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Jan-2022   
Total Views |

Prafful Mendki
 
 
रामायण, महाभारत या महाकाव्यांचा खगोलशास्त्रीय अभ्यास करून भारतीय प्राचीन इतिहासाची ‘काल’मिमांसा उलगडणारे ठाणे जिल्ह्यातील इतिहास संशोधक दिवंगत प्रफुल्ल वामन मेंडकी या असामान्य प्रभूतीविषयी...
 
 
इतिहास संशोधक आणि खगोल अभ्यासक, साहित्यिक प्रफुल्ल वामन मेंडकी यांचे नुकतेच निधन झाले. ‘कोविड’ आजाराने त्यांचा घात केला अन् वयाच्या ७२व्या वर्षी त्यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. व्यवसायाने ते विद्युत अभियंता होते. ‘खगोलशास्त्र’ हा त्यांचा आवडीचा विषय होताच, पण प्राचीन इतिहासात ते रमायचे. प्रगल्भ बुद्धिमत्ता, चौफेर वाचन आणि दांडगा जनसंपर्क ही त्यांची बलस्थाने होती. मुळचे लातूरचे असलेले मेंडकी ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे स्थायिक झाले होते.
 
वडिलांच्या नोकरी-व्यवसायाच्या बदलीमुळे प्रफुल्ल मेंडकी यांचे बालपण धुळे, गुजरात, दादर अशा अनेक ठिकाणी गेले. १९६५ मध्ये ते कल्याणमध्ये स्थिरावले. लहानपणापासून त्यांना वैज्ञानिक आणि यांत्रिक गोष्टींमध्ये रस होता. विविध यांत्रिक वस्तूंची त्यांनी निर्मिती केली. जसे की, प्रोजेक्टर, तबकड्यांचा ग्रामोफोन, अफलातून लाकडी खुर्च्या इ. लहानपणासूनच बौद्धिक नव्हे, तर शारीरिक कष्टांची सवय असल्याने त्यांनी कोणत्याही कामात कधी आळस केला नाही. घर उभारणीच्या वेळीही प्रत्येक कामात त्यांनी आईवडिलांना मदत केली. निसर्गाशी जवळीक असल्याने झाडांची तर त्यांना प्रचंड आवड होती. त्यामुळे घराजवळच त्यांनी स्वतःची बागदेखील निर्माण केली.
 
त्यांच्या आईचे शिक्षण केवळ चौथीपर्यंतचझाले होते. तरीही आई अतिशय चाणक्ष व बुद्धिमान होती. त्यांचे वडील रेल्वे पोलिसात कर्तव्य बजावत असल्याने त्यांचे व्यक्तिमत्त्व कणखर होते. आईवडिलांच्या व्यक्तित्त्वाचा त्यांच्यावर प्रभाव होता. शालेय व महाविद्यालयीन शिक्षणाचा पल्ला पार केल्यावर ‘व्हीजेटीआय’मधून प्रफुल्ल मेंडकी यांनी ‘इलेक्ट्रिक इंजिनिअर’ची पदवी घेतली.पदवी परीक्षेत संपूर्ण मुंबई विद्यापीठात त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला होता. त्यावेळची शालांत परीक्षा अकरावी इयत्तेत, तर त्यांनी बोर्डात ४०वा क्रमांक पटकावला होता. विविध शैक्षणिक कीर्तीमान पादाक्रांत केले, पण घरच्या परिस्थितीमुळे त्यांना ‘आयआयटी’ मधून ‘एम.टेक.’ पूर्ण करता आले नाही. पुढे ‘अ‍ॅपको’, ‘अ‍ॅपलॅब’, ‘अ‍ॅटको’ आदी कंपन्यांमध्ये रिसर्च डिपार्टमेंटमध्ये मोठ्या हुद्द्यावर त्यांनी नोकरी केली. ‘अ‍ॅपलॅब’मध्ये चाकरीला असताना अनेक परदेश वाऱ्या करून नवनवीन तंत्रांची माहिती घेऊन त्यांनी व्होल्टमीटर, मल्टीमीटर अशी अनेक इलेक्ट्रीक, इन्स्ट्रुमेंट्स बनवली. त्यातील काही इन्स्ट्रुमेंट्स विविध प्रयोगशाळा, शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये आजही वापरले जात आहेत. पुढील काळात त्यांना खगोलशास्त्राची आवड निर्माण झाली. तसेच संस्कृत वाचनाचा छंद जडला. रामायण, महाभारत, उपनिषदे, वेद अशा अनेक संस्कृत ग्रंथांचे वाचन झाले. त्यातूनच श्री राम जन्माची तारीख शोधून काढावी, असे त्यांच्या मनात आले. त्यानंतर लागलीच ‘शुभस्य शीघ्रम’ करीत त्यावर संशोधन सुरु केले.
 
अनेक महिने, दिवस-रात्र जागून लाखो गणिते करून विविध संदर्भ लावून ‘नासा’च्या शास्त्रज्ञांची तसेच देशी-विदेशी वैज्ञानिकांची मदत घेऊन, त्यांनी रामायण व महाभारत या महाकाव्यातील विविध घटनांचा कार्यकाल निश्चित केला. या महाकाव्यातील निरनिराळ्या प्रसंगी वर्णन केलेली ग्रह-नक्षत्रांची स्थिती, पौर्णिमा-अमावस्येचा उल्लेख, चंद्र-सूर्य गृहणांचे संदर्भ, चांद्रमासात होणारा बदल लक्षात घेऊन संगणकाचा आणि आधुनिक गणिताचा वापर करून त्यावेळच्या घटना व प्रसंगांची कालमिमांसा केली. त्यानिमित्ताने ’रामायणाचा खगोलशास्त्रीय शोध’ आणि ’महाभारताचा कालनिर्णय’ ही पुस्तकेही लिहिली. त्यांची ही पुस्तके पुण्यातील ‘पुष्पक प्रकाशन’ने प्रकाशित केली. खगोलशास्त्रज्ञ मोहन गोखले, खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांना, ते आपल्या यशाचे प्रेरणास्थान मानत असत. गोखले व सोमण यांच्या ते कायम संपर्कात असत. पुण्याचे प्रसिद्ध साहित्यिक प. वि. वर्तक यांच्याशी संशोधनाबाबत सतत चर्चा होत, असे देशी-विदेशी विज्ञानाशी निगडित अनेक चर्चासत्रात त्यांनी सहभाग घेतला. रामायण, महाभारतातील घटनाकाळ यावर विविध ठिकाणी त्यांनी व्याख्यानेही दिली.
 
अतिशय प्रखर बुद्धिवादी तत्वनिष्ठ, विज्ञानधिष्ठित यम आणि नियम पाळणारे स्थितप्रज्ञ, कणखर प्रवृत्तीच्या मेंडकींचे राहणीमान साधे होते. आजच्या पिढीला आपल्या संस्कृतीचे ज्ञान व्हावे, तसेच संस्कृत भाषेतील आकलन व्हावे, मुलांना मातृभाषेत शिक्षण मिळावे, याबाबत ते आग्रही होते. आजकालच्या तरुण पिढीने आपला अमूल्य वेळ केवळ मौजमजा, आलस्य यात न घालवता नेहमी नवनवीन कल्पनांचा शोध घ्यावा. शारीरिक व मानसिकदृष्ट्या प्रत्येकाने नेहमी सक्षम असावे, अशा नवीन पिढीकडून अपेक्षाही त्यांनी बाळगल्या होत्या. त्यांच्या संशोधनाबद्दल अनेक वृत्तपत्रे, तसेच वृत्तवाहिन्यांवर लेख तसेच मुलाखती प्रसिद्ध झाल्या. त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात ‘अ‍ॅपलॅब’ कंपनीकडून त्यांनी केलेल्या संशोधनाबद्दल त्यांना अनेक पुरस्कार व प्रमाणपत्रांनी गौरवण्यात आल्याचे त्यांच्या कन्या मानसी गांगल यांनी सांगितले. अशा या इतिहास संशोधक प्रफुल्ल वामन मेंडकी यांचे नुकतेच रविवार, दि. १६ जानेवारी रोजी निधन झाले. अशा या इतिहास संशोधनात असामान्य कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रफुल्ल मेंडकी या संशोधकाला दै. ‘मुंबई तरुण भारत’ कडून विनम्र आदरांजली...
 
 
@@AUTHORINFO_V1@@