ठाणे : ठाणे शहरातील ‘तिसर्या डोळ्या’ची पुरती दैना उडाली आहे. तब्बल सहा कोटी खर्चून शहरात बसवण्यात आलेल्या १२०० ‘सीसीटीव्ही’ कॅमेर्यातून ‘लाईव्ह फिड’ आणि ‘बॅकअप’सुद्धा मिळत नसल्याने ठाणेकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरांमध्ये अधिक क्षमतेचे नवीन ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसवण्याची सूचना पोलिसांनी ठाणे महापालिकेला केली आहे. ठाणे पोलिसांनी नुकतीच महापालिका अधिकारी आणि ‘सीसीटीव्ही’ पुरवठा कंपनी यांच्यासोबत बैठक घेतली. यावेळी झालेल्या सविस्तर चर्चेनंतर ‘सीसीटीव्ही’ कॅमेरा यंत्रणेतील दोष व त्रुटी निदर्शनास आणून आवश्यक सुधारणांचा अहवाल सादर केला.
ठाणे शहरामध्ये कायदा-सुव्यवस्था तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी ‘स्मार्ट सिटी’ अंतर्गत नगरसेवक निधीतून १,२०८ आणि इतर निधीतून १,५९८ कॅमेरे बसवण्यात आले. परंतु, ठाणे पोलिसांनी या ‘सीसीटीव्ही’ यंत्रणेतील त्रुटी निदर्शनास आणल्या आहेत. ठाणे पोलिसांनी या संदर्भात ठाणे महापालिकेच्या ‘स्मार्ट सिटी’ प्रकल्प योजनेच्या अतिरिक्त आयुक्तांना पत्र लिहून याबद्दलचा अहवाल सादर केला आहे. तसेच, नव्याने बसवण्यात येणारे ३०० ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे कुचकामी ठरल्याचे निदर्शनास आणले आहे.
हे कॅमेरे सध्याच्या ‘सर्व्हर सिस्टीम’ला सपोर्ट करत नाहीत. पालिकेच्या हाजुरी येथील ‘कमांड सेंटर’मध्ये या सर्व कॅमेर्यांचे नियंत्रण केले जात असून ही यंत्रणा ठाणे पोलीस मुख्यालयाच्या ‘सीसीटीव्ही-कमांड सेंटर’मध्ये जोडण्यासाठी ४० ‘जीएसझेड’ भूमिगत वाहिनीची गरजेचे आहे. गुन्ह्यांच्या तपासात या चित्रीकरणाचा उपयोग होईल. सध्या सर्व्हरला २५ कॅमेरे जोडण्याची क्षमता आहे, ती १०० कॅमेरे जोडण्याइतकी करावी. तसेच, जुन्या कॅमेर्यांच्या जागी नवीन उच्च क्षमतेचे कॅमेरे बसवण्याची सूचनाही पोलिसांनी केली आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांत पोलिसांना ९०० ‘सीसीटीव्ही’ फुटेज दिल्याचा दावा पालिकेने केला आहे.
शहरात बसवलेले ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे ‘फिक्स बॉक्स’ कॅमेरे असून वारंवार नादुरुस्त होतात. यात ‘फेस डिटेक्टर’, ‘स्पीड डिटेक्शन’ सुविधा नाही. त्यामुळे अपघात नियोजन, ‘अलर्ट’ आणि संश्लेषण करण्यात अडचणी येतात. ‘स्ट्रीट लाईट’, ‘सिग्नल’च्या पोलवर लावलेल्या या कॅमेर्यांच्या सुस्पष्टतेची दिशा योग्य नसून ‘पॉवर बॅकअप’ही नाही. कॅमेरा उभारणी, देखभाल व इंटरनेट सुविधा देणारी वेगळी कंपनी, तर ‘सर्व्हर’, ‘व्हिडिओ वॉल’, ‘वर्क स्टेशन’ दुसर्या कंपनीचे आहे.
त्यामुळे तांत्रिक अडचण उद्भवल्यानंतर वेगवेगळ्या कंपन्यांना संपर्क करावा लागत असल्याने दुरूस्ती खोळंबते. ‘रेकॉर्डिंग’ सलग न होता त्यात खंड पडल्याने काही सेकंदाचे ‘रेकॉर्डिंग’ही उपलब्ध होत नाही. ‘नाईट व्हिजन’ स्पष्ट नसल्याने वाहनांचे क्रमांक समजत नाहीत. कॅमेर्याची क्षमता पाच ‘मेगा पिक्सेल’ची असताना प्रत्यक्षात एक ‘मेगा पिक्सेल’ क्षमतेने चित्रिकरण होते.