मुंबई (विशेष प्रतिनिधी) - ठाण्याच्या घोडबंदर परिसरातील चेना वनपरिक्षेत्रात मंगळवारी बिबट्याचे मृत्यू शरीर सापडले. एका जोरदार आघातामुळे शरीराअंतर्गत झालेल्या रक्तस्त्रावामुळे या बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता शवविच्छेदनाअंती वर्तवण्यात आली आहे. मात्र, रस्त्यापासून काही अंतरावर हा बिबट्या मृत्यावस्थेत सापडल्याने वाहनाच्या धडकेत त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'च्या येऊर वनपरिक्षेत्रामध्ये चेना हा भाग येतो. या भागाच्या हद्दीपासून घोडबंदर रस्त्यानजीक १०० ते १५० मीटर अंतरावर मंगळवारी सायंकाळी एक बिबट्या मृतावस्थेत सापडला. वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार हा बिबट्या तीन वर्षांचा नर बिबट्या आहे. त्याची ओळख पटवण्यात आली असून त्याच्या सांकेतिक क्रमांक 'सी-४०' आहे. हा बिबट्या मूळचा गोरेगावच्या आरे दुग्ध वसाहतीमधील आहे. मात्र, हद्दीच्या शोधात त्याने घोडबंदर परिसरात स्थलांतर केले होते. अशा परिस्थितीत त्याच्या मृत्यू झाला आहे.
'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील रुग्णालयात या बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. एका जोरदार आघातामुळे या बिबट्याचे यकृत फाटले आणि त्यामुळे अंतर्गत रक्तस्त्राव झाला. ज्यामुळे हायपोव्होलेमिक शॉक लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र, घोडबंदर रस्त्याच्या नजीकच बिबट्याचे मृत शरीर आढळल्याने रस्ता ओलांडण्याच्या नादात त्याला वाहनाची धडक बसल्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. यापूर्वी घोडबंदर रस्त्यावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचे मृत्यू झाले आहेत.
उपाययोजनांसाठी अभ्यास गट
घोडबंदर ते गायमुख रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा विचार करुन 'महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळा'ने (एमएसआरडीसी) या रस्त्याचे रुंदीकरणाचा प्रस्ताव मांडला आहे. 'एमएसआरडीसी'ला सद्याच्या रस्त्याचे चौपदरीकरण करुन त्यावर उन्नत पूल बांधायचा आहे. या उन्नत पूलावरुन कार्गो ट्रकसारखे अवजड वाहने जातील आणि खालच्या चौपदरी रस्त्यावरुन हलकी वाहने जाऊ शकतील. मात्र, या रस्त्यावर वाहनांच्या धडकेत बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. याचा विचार करुन गायमुख येथे हा प्रकल्प उन्नत स्वरुपाचा करण्याचा विचार 'राज्य वन्यजीव मंडळा'च्या बैठकीत मांडण्यात आला. ज्याठिकाणी बिबट्याचा भ्रमणमार्ग आहे, अशा साधारण ३५० मीटर क्षेत्रावरुन हा मार्ग उन्नत स्वरुपाचा नेण्यासंदर्भात वन्यजीव मंडळात चर्चा झाली असून अभ्यास गट स्थापन करण्यात आला आहे.