शिवसेनेतर्फे मुंबईत मालवणी पॅटर्न राबविण्याचा डाव !

विशिष्ट गटाला खुश करण्यासाठी हिंदूंचा गळा दाबण्याचे सेनेचे प्रयत्न ; मुंबई भाजप अध्यक्ष आ. मंगल प्रभात लोढांचे शिवसेनेवर गंभीर आरोप

    18-Jan-2022   
Total Views |
 
lodha ji
 
 
 
मुंबई : भायखळ्यातील आग्रीपाडा परिसरात प्रस्तावित असलेल्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीवरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. स्थानिकांच्या दाव्यानुसार ही जागा उर्दू भाषा केंद्रासाठी आरक्षित नव्हती मात्र स्थानिक प्रशासन आणि महापालिकेतील काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून या जागेवर उर्दू भाषा केंद्राची उभारणी केली जात असल्याचा आरोप स्थानिकांसह काही राजकीय पक्षांच्या वतीने केला जात आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांनी भाजप नेत्यांसह या जागेची मंगळावर, दि. १८ जानेवारी रोजी पाहणी केली. यावेळी आ. मंगल प्रभात लोढा यांनी या विषयावर 'दै. मुंबई तरुण भारत'शी विशेष संवाद साधला.
 
 
यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे भायखळा विधानसभा अध्यक्ष नितीन बनकर, भाजप नेते मधू चव्हाण, वॉर्ड 207 च्या स्थानिक भाजप नगरसेविका सुरेखा लोखंडे यांच्यासह भायखळा परिसरातील स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
 
 
आग्रीपाडा परिसरात प्रस्तावित असलेल्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीवर स्थानिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावर आपली भूमिका काय ?
'ही सर्व जागा आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षित होती. मात्र राजकीय हेतूसाठी आणि अल्पसंख्यांच्या तुष्टीकरणासाठी स्थानिक नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी काही महापालिका अधिकाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी करण्याचा घाट घातला आहे. मुळात उर्दूसाठी कधी प्रशिक्षण केंद्राची स्थापना केली जाऊ शकत नाही, त्यामुळे स्थानिक नागरिक हे भवन या ठिकाणी उभारू देणार नाहीत. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप स्थानिकांच्या पाठीशी उभी आहे. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मी स्वतः, भाजपचे सर्व नेते, विहिंप आणि बजरंग दलाचे सर्व उपस्थित असलेले कार्यकर्ते आम्हा सर्वांचा या प्रकल्पाला तीव्र विरोध आहे. आमच्या विरोधाला न जुमानता जर या ठिकाणी हे काम असेच सुरु राहिले तर त्यांना हे प्रकरण नक्कीच महागात पडेल, हे शिवसेनेने लक्षात घ्यावे.'
 
 
 
स्थानिकांच्या आरोपानुसार या परिसरात उर्दू भाषेसाठी ४ ते ५ उर्दू भाषा संबंधित केंद्र आहेत. मग अशा परिस्थिती आणखी एका नव्या उर्दू भाषा शिक्षण केंद्राच्या उभारणीमागे काय हेतू असू शकतो ?
'शिवसेनेला केवळ मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणासाठी संपूर्ण मुंबईमध्ये मुस्लिम वस्त्यांच्या वाढीसाठी प्रोत्साहन द्यायचे आहे. आताच्या शिवसेनेला मुस्लिम मतांची हाव आहे आणि यातूनच ते हिंदू समाजाचा गळा दाबण्याचे प्रयत्न सुरु आहेत.'
 
 
 
मुंबईतील मराठी शाळा आणि विद्यार्थी संख्येतील घट चिंताजनक आहे. अशा स्थितीत मराठीला पाठबळ देण्याऐवजी इतर भाषांना प्राधान्यक्रम देणे या मागे नक्की कुठला अजेंडा असू शकतो ?
'केवळ मतांसाठी मराठीचा मुद्दा पुढे करणाऱ्या शिवसेनेला हा प्रश्न विचारला जाणे अधिक संयुक्तिक ठरेल की मराठी भाषेसाठी आणि अस्मितेसाठी ते काय भूमिका घेत आहेत. या प्रश्नावर शिवसेनेने आपली भूमिका स्पष्ट करणे आणि लोकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देणे गरजेचे आहे.'
 
 
 
केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी हे प्रकार सुरु आहेत या आरोपात कितपत तथ्य वाटते ?
'हे पूर्ण सत्य आहे. केवळ अल्पसंख्यांक समाजाच्या तुष्टीकरणासाठी आणि त्यांच्या मतदानासाठी ही लाचारी स्वीकारणे हा शिवसेनेचा नवीन अजेंडा आहे. मात्र शिवसेनेचा हा प्रयत्न आम्ही चालू देणार नाही. निवडणुकीच्या राजकारणासाठी जे काही करायचे ते शिवसेनेने अवश्य करावे मात्र, या जागेवर कुठल्याही किंमतीवर आम्ही उर्दू भाषा शिक्षण केंद्राची उभारणी आम्ही होऊ देणार नाही.'
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.

ओम देशमुख

मूळ मराठवाड्यातील बीडचे.
'बॅचलर ऑफ जर्नालिझम'पर्यंत शिक्षण.
सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये पदविकेपर्यंतचे शिक्षण पूर्ण.
सध्या दै.'मुंबई तरुण भारत'चे मुंबई महापालिका प्रतिनिधी.
दै.'मुंबई तरुण भारत'पूर्वी काही वृत्तपत्र आणि पोर्टल्ससाठी लिखाण.